Sunday, July 20, 2025
Homeसेवाआनंदी सी.के. सुब्रमण्यम

आनंदी सी.के. सुब्रमण्यम

क्रिकेट आणि लेखनप्रेमी सी.के. सुब्रमण्यम यांचा आज, ७ जुलै रोजी ७५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या, त्यांच्या आनंदी, आरोग्यदायी जीवनाचे रहस्य….
— संपादक

आज महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांची संख्या ही जवळपास १ कोटी ४० लाख इतकी आहे. त्यातील असंख्य जण निवृत्ती वेतन धारक आहेत. परंतु सेवानिवृत्ती नंतरचा काळ कसा घालवायचा, याचा अनेकांना प्रश्न पडतो. म्हणून आपला वेळ, अनुभव समाजाच्या कल्याणासाठी वापरला तर आपल्याबरोबराच समाजाचेही भले कसे करता येऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे श्री. सी. के. सुब्रमण्यम हे होत.

श्री. सी. के सुब्रमण्यम सिंडिकेट या राष्ट्रीयकृत बँकेतून १५ वर्षापूर्वी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले. वस्तुतः प्रदीर्घ काळ सेवा करून निवृत्त झाल्यावर अनेकांना प्रश्न पडतो, तो म्हणजे रिकाम्या वेळेचं काय करायचं ? पण सुब्रमण्यम यांना क्रिकेट खेळण्याची आणि वृत्तपत्रातून लेखन करण्याची आवड असल्याने आणि त्यांनी या दोन्ही आवडी निवृत्तीनंतरही जोपासल्याने त्यांना असा प्रश्नच पडला नाही

श्री. सुब्रमण्यम चेन्नई येथे शाळेत असल्यापासून त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली. शाळेतर्फे तसेच पुढे महाविद्यालयाच्या संघाकडून ते खेळत राहिले. ते या संघाचे कप्तान ही होते.

सुब्रमण्यम १९७१ साली सिंडिकेट बँकेत रुजू झाले. तिथे रुजू झाल्यावर ते बँकेतर्फे क्रिकेट खेळत राहिले.दिल्ली, चेन्नई येथे सेवा बजाविल्यानंतर त्यांची १९९५ मध्ये मुंबईत बदली झाली. प्रत्येक ठिकाणी ते क्रिकेट संघात सहभागी होत राहिले. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनतर्फे चेन्नईत अंपायर म्हणूनही त्यांनी १९८९ ते २००० पर्यंत काम पाहिले आहे. बैंक स्पोर्टस् बोर्डाचे ते ४ वर्षे सचिव होते. इंडियन बैंक असोसिएशनच्या अंतर्गत हे बोर्ड काम करते. त्यामुळे त्यांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या बँकेच्या क्रिकेट स्पर्धांना जाता आले.

आवडता क्रिकेटपटू आर अश्विन सोबत…

सुब्रमण्यम १५ वर्षांपूर्वी बँकेतून निवृत्त झाले त्याच बरोबर बँकेने दिलेले वाशी येथील निवासस्थानही सोडावे लागले. त्यामुळे ते सानपाडा येथे रहावयास आले. पण क्रिकेटची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून यावर त्यांनी अभिनव उपाय शोधला, तो म्हणजे सानपाडा येथील मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना क्रिकेटचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्याचा. ऐपत असणाऱ्या मुलांकडून ते माफक फी घेत तर गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देत. मुलांना क्रिकेट शिकविण्याचा आनंद काही औरच असे, असे ते म्हणतात.

सी. के सुब्रमण्यम यांची दुसरी आवड म्हणजे लेखनाची. गेली ५५ वर्षे ते विविध वृत्तपत्रांमधून सामाजिक समस्यांवर सातत्याने लेखन करीत आहे. विशेषतः सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या ते प्रखरपणे मांडतात. १९७१ साली त्यांनी पहिले पोस्ट कार्ड वेंकट राघवन या क्रिकेटपटूविषयी लिहिले होते. ते टाईम्स ऑफ इंडियाच्या दिल्ली आवृत्तीत प्रसिध्द झाले. त्यानंतर त्यांची पत्रं विविध वृत्तपत्रात प्रसिध्द होत राहिली. लंडन मॅगझिन, क्रिकेटर इंटरनॅशनल अशा आंतरराष्ट्रीय मासिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिध्द झाले आहे. २०१३ रोजी ‘मिंटस् लाऊंज’ या वृत्तपत्रातर्फे भारतातील ५ उत्कृष्ट लेखकांमध्ये त्यांची निवड करण्यात आली. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघासाठी पत्र लेखन, वृत्तपत्रांमध्ये बातम्या देणे आदी कामे ते हौसेने करतात. शिवाय अन्य सामाजिक कामे करीत असल्याने वेळ पुरत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

सानपाडा जेष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार….

श्री. सुब्रमण्यम यांना दोन मुले आहेत. एक कुवेतमध्ये तर दुसरा मुंबईत त्यांच्याबरोबर राहतो. मी मुलांना क्रिकेट शिकविले तर त्यांनी मला संगणक वापरायला शिकविले याचा ते गंमतीने उल्लेख करतात. मुलांनी क्रिकेट सोडले तरी मी मात्र संगणक न सोडता त्याचा अधिकाधिक वापर करीत असतो, असे ते अभिमानाने सांगतात. पत्नी, मुलगा, सून व नातू यांच्यासह एकत्र कुटुंब असल्याने घरातील वेळही अत्यंत आनंदात व समाधानात जातो असे ते म्हणतात.

सुब्रमण्यम मूळ चेन्नईचे असल्याने तेथे त्यांचे स्वतःचे घर आहे. मात्र मुंबईच्या संस्कृतीने आपल्याला मुंबईतच खिळवून ठेवले आहे आणि इथे आपल्या हातून सामाजिक कार्यही घडते याचा त्यांना आनंद वाटतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या डिग्निटी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख पुरस्काराबरोबरच त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले असून पुढेही मिळत राहतील, असा विश्वास वाटतो.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. श्री. सी. के. सुब्रह्मण्यम् यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन
    आणि आगामी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!!
    … प्रशान्त थोरात,
    पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?