Homeलेखअखेर अंजली जिंकलीच !

अखेर अंजली जिंकलीच !

पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिटय़ूट मधील वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम करतानाची आमची वर्ग भगिनी; तेव्हाची अंजली जोशी आणि लग्नानंतरची प्रा डॉ अंजली रानडे अखेर काल हे जग सोडून गेली. पण एखादा शूरवीर योद्धा ज्या असीम धैर्याने मृत्यूला सामोरे जातो, त्याच धैर्याने ती आयुष्यभर तिला झालेल्या लुपस या असाध्य आजाराशी झुंज देत राहिली. गेली काही वर्षे ती कधीही जाऊ शकेल, अशा परिस्थितीतच होती. त्यामुळे ती गेल्याचा धक्का जरी बसला नाही, तरी वाईट मात्र खूप वाटतेय. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नियती इतकी क्रूर, कठोरपणे का वागत असते ? हेच कधी कळत नाही.

आमची दुसरी एक वर्ग भगिनी, प्रा डॉ उज्वला बर्वे (पूर्वाश्रमीची उज्वला लेले) ही जेव्हा रानडे इन्स्टिटय़ूटची प्रमुख झाली, तेव्हा तिने विविध उपक्रम धडाडीने राबविले. आमच्या 1983-84 बॅचच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम म्हणजे तिने अतिशय कष्टपूर्वक मिळतील त्यांचे मोबाईल नंबर मिळवून BCJ 1983-84 हा WhatsApp समूह स्थापन केला. त्यामुळे जवळपास पस्तीसछत्तीस वर्षांच्या अंतराने आम्ही वर्ग बंधू, भगिनी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. रानडे इन्स्टिट्यूट च्या दरवर्षी होणार्‍या स्नेह संमेलनात आमच्या भेटी होऊ लागल्या. अंजली मात्र तिच्या आजारपणाच्या स्वरूपामुळे ; तिची इच्छा असूनही कधीच येऊ शकली नाही. पण WhatsApp मुळे मात्र आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो.

डॉ अंजली रानडे.

मी संपादन करीत असलेले www.newsstorytoday.com हे पोर्टल तिला मी नियमितपणे पाठवित असे. एखादा लेख, मजकूर, माहिती आवडल्यास ती मोजक्याच शब्दात दाद देत असे. तिच्या “जागतिक राजकारण” या पुस्तकाचे परीक्षणही मी या पोर्टल वर लिहिले होते.

तिला माझी काही पुस्तके हवी होती. मलाही तिला भेटण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे एकमेकांच्या सोयीने वेळ ठरवून दोनेक वर्षांपूर्वी मी तिच्या अंधेरीतील घरी गेलो होतो. दार तिच्या मुलीने उघडले. हॉलमधील बेड वर बसलेल्या अंजली ला पाहून मला प्रचंड धक्का बसला. आपल्या सोबत शिकत होती ती उंच, गोरीपान, सुंदर, बुद्धीमान, चेहर्‍यावर कायम बाणेदारपणाचे भाव असलेली अंजली आणि आता बघत असलेली अंजली एकच आहे का ? असा मला प्रश्न पडला. कारण तिच्या आजारासाठी घेत असलेल्या औषधांमुळे तिचे वजन प्रचंड वाढलेले होते. फार वेळ बसुन बोलूही शकत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. मलाही खूपच अवघडल्यासारखे वाटत होते. दरम्यान तिचे पती आले. तिने आमची ओळख करून दिली. चहापाणी घेऊन मी निघालो पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे तिचा आत्मविश्वास आणि आशावाद कायम होता. होती त्या परिस्थितीतही ती कार्यरत होती. त्यामुळे ती इतक्यात जाईल असे वाटत नव्हते. पण शेवटी नियतीपुढे कुणाचे काय चालते ?

उज्ज्वलाच्या लग्नात अंजली आणि अन्य दोन वर्ग भगिनी; राजश्री जाधव, सरोजिनी कुलकर्णी माटे

काही योगायोगाच्या गोष्टी म्हणजे अंजलीने वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम करतांना मुंबई दूरदर्शन केंद्रात इंटर्नशिप केली होती. पुढे त्याच दूरदर्शन केंद्रात मी नोकरीस लागलो. तर वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात नोकरीस लागून लोकराज्य मासिकासाठी काम करू लागली. पुढे मी दूरदर्शन सोडून माहिती खात्यात नोकरीस लागलो. पण मी तिथे रुजू होण्यापूर्वीच ती माहिती खाते सोडून गेलेली होती. तिने एम ए राज्यशास्त्र ही पदवीही उत्कृष्ठ गुणांनी संपादन केली होती. त्याच विषयात पीएच.डी देखील केली होती. त्यामुळे ती रुईया महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापक म्हणून रुजू झाली.

अध्यापन करीत असतानाच अंजलीने काही पुस्तके देखील लिहिली. एका पुस्तकाचा उल्लेख वर आलाच आहे. तर “स्त्रिया आणि दहशतवाद” या अतिशय वेगळ्या आणि ज्वलंत विषयावरही तिने पुस्तक लिहिले आहे. तिच्या धैर्याची कमाल म्हणजे जो आजार तिला जडला होता आणि अजूनही सर्व सामान्य माणसाला ज्याची माहिती नाही, त्या आजाराची शास्त्रोक्त माहिती आणि स्वानुभव अशा पद्धतीने तिने “लुपसचे महाभारत” हे पुस्तक लिहिले आहे. आपल्याला कधीच काही होऊ शकणार नाही, अशा भ्रमात राहणार्‍या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे, असे आहे.

आजाराशी तोंड देत अंजली घर, अध्यापन, लेखन अशा बाजू खंबीरपणे पहात होती. पण काही वर्षांपूर्वी मात्र तिला अंधेरीहून दादर येथील महाविद्यालयात जाणेयेणे जिकिरीचे होऊ लागले होते. तेव्हढी सुद्धा दगदग तिला सोसवेना. म्हणुन मग तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी ती घरी कधीच रिकामी रहात नसे. वाचन, लेखन आणि शिवाय घरातील जमतील ती कामे ती करीत असे. तिच्या मूळ स्वभावानुसार, तिच्या दुर्धर आजारपणातसुद्धा तिचा बाणेदारपणा कायम होता. तिने कुणाकडूनही सहानुभूतीची अपेक्षा केली नाही, की आपल्या आजारपणाचे भांडवल केले नाही.

अशी ही अंजली गेली पण कायमचा ठसा उमटवून गेली. तिच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. तिला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

देवेंद्र भुजबळ.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments