प्रिय सखी अलका,
हो, सखीच आहेस तू माझी. जिव्हाळ्याची आणि हक्काची सुध्दा.
अगं, तू नी मी वेगळ्या कां आहोत ? वेगळेपण आहे तो फक्त आपल्या दोन मनांच्या धारणेचा. म्हणून तर आज मनाचिये गुंती…. गुंफणार आहे मी शब्दशेला… आणि पत्रातून ह्या मनीचे त्या मनीला सांगणार आहे गूज. असो.
आज मी जी कांही आहे, सुखी समाधानी ती केवळ तुझ्यामुळेच सखे, कारण तू माझ्या नकारात्मक विचारांना डिलीट करायचीस आणि मला सकारात्मक विचार डाऊनलोड करायला लावायचीस. म्हणून तर आयुष्याच्या तिन्हीसांजेला आनंदी आणि शांत जीवन जगतेय मी. किती आभार मानू ग तुझे ?
तू वेळोवेळी सांगायचीस बघ मला, अलका थोडं स्वतःसाठी जगायला शिक आता. स्वत:मधल्या क्षमता ओळख. अस्सा राग यायचा नं तेव्हां तुझा. कित्ती जवाबदाऱ्या होत्या माझ्यावर, कळत कसं नाही तुला ? असं वाटायचं. पण आता उशीरा कां होईना मला तुझं ते म्हणणं कळलं आणि वळलं सुध्दा.
मग आधी केली स्वतःशी मैत्री, साधला स्वत:शीच संवाद आणि काय सांगू ? माझ्यातली मी उमगत गेले अन् उमलतही गेले की हळूहळू ! आत्मनिरिक्षण करता करता माझी बलस्थान कोणती आहेत ह्याचा शोध लागला मला. स्त्रीमध्ये जात्याच असलेल्या सृजनशक्तीचा अन् उर्जेचा वापर कसा कुठे करायचा हे नेमकं कळू लागलं आणि मिळाली एक स्वतंत्र ओळख. हा आत्मविश्वास तू निर्माण केलास माझ्यात …thank you so much dear.
ए हसू नकोस हं.. सगळ्यांकडून ऐकून असलेली एक बकेट लिस्ट पण केली मी. टाकत गेले एकेक इच्छा अन् होत गेली बाई इच्छापूर्ती. अर्थात प्राधान्य, माझ्या अतिशय आवडीच्या लेखन कलेला. ….ती बहरताना विचारात परिपक्वतता आली. साहित्य क्षेत्रात प्राविण्य मिळवताना होणारा माझा आनंद शब्दातीत आहे सखे. नविन तंत्रज्ञान शिकतांनाची विद्यार्थी दशा तर मला आव्हानात्मक वाटली. आज मी त्याचा हात धरुन चालतेय ह्याचा कुठेतरी थोडा अभिमान आहे मला.
ग दि मां नी किती चपखल शब्दात आयुष्याचं वर्णन केलंय…एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे.…. आयुष्याचं वस्त्र विणताना मी हा अनुभव घेतलाय. पण त्या दु:खातून, नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तूच दाखवलास सखे !
एकत्र कुटुंबातील माझं कर्तेपण पुढच्या पिढीवर सोपवून मी जेव्हां दुय्यम भूमिकेत शिरले होते, तेव्हां खूष झाली होतीस नं ? मला जाणवलं ते. तुझ्याच धाकानी ते पाऊल उचललं होतं ग बाई. ए पण एक सांगून ठेवते, वेळोवेळी माझी कान उघडणी करण्याचा राखीव हक्क तुझाच आहे हं. आणि बरं का ग, तू न सांगता शरीराची पण मशागत करत असते मी. आरोग्यम् धन संपदा .. पटलंय बरं मला. असो.
सखे आज जेव्हां मी स्वतःला प्रश्न विचारते, कोहम् ? तेव्हां आंतून आवाज येतो....सोहम् | तुझाच नं तो ?
एक गंमत सांगू ? हल्ली मी काय गुणगुणत असते माहित्ये ? झूले उंच माझा झोका….
तुझीच सखी,
अलका
(म्हणजे तूच नाहीं का?)
— लेखन : अलका वढावकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अलका, तुझ्या मनात च एक उत्साहाचा झरा आहे जो भरभरून वाहत असतो. त्याला सर्वांचे कौतुक करायचं असतं , सर्वाना प्रोत्साहन द्यायचं असतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुझ्या कडे ते प्रेम भरभरून दुप्पटीने परत येते . त्यामुळे तुझं सर्व आयुष्य आनंदमय आणि उत्साहाने झाले आहे.अशीच रहा सखे !
सखे तू हसत रहा आनंद वाटत रहा!
मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
अलका ताई, नेहमीच हसतमुख राहणं, खुसखुशीत बोलणं, इतरांची तोंडभरून स्तुती करताना गोड गोड शब्द पेरणी करणं ; खरंच कसं हो जमतं हे सर्व तुम्हाला? मला नेहमीच प्रश्न पडायचा; पण आज तुमच्या ह्या पत्र लेखनातील सखीने तुमच्या स्वभावाची सुंदर उकल केली आणि समजले,हे सर्वच उत्स्फूर्त आहे, आतून उचंबळून आलेले आहे आणि मनापासून आनंद लुटणारे जीवन कसे असावे ह्याचा आदर्श दाखला देणारे आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐