Sunday, July 20, 2025
Homeलेखकरवंदे

करवंदे

गेली अनेक वर्षे घरच्या सर्व शेतावर चक्कर मारली नव्हती. भारत भेटी बरेच वेळा अतिशय घाई गडबडीत होतात. प्रत्येक वेळी भारतात गेलं की काही ना काही कार्यक्रमांना जाणे भाग पडते. गोतावळ्यातील कोणाचे लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, किंवा काही सामाजिक कार्यक्रम असतात. भारत भेटीत ह्यावेळी मुद्दाम दोन दिवस गावी जाऊन सर्व शेतांना चक्कर मारण्याचा बेत ठरवला होता. सकाळी सकाळीच पुतण्या मला नेण्यासाठी पुण्याला आला. गावी निघण्याच्या तयारीत असतानाच ताईने सांगितले की जाताना आळंदीवरून माऊलींचे दर्शन करून घरी जा. शांततेत दर्शन झाल्यावर लहानपणाच्या सवयीप्रमाणे घरच्यांसाठी व ताईला तेथील प्रसादाचे पुडे घेतले व गावाकडे निघालो. घरच्यांना कल्पना दिली होतीच की ह्यावेळी कुठल्याही कार्यक्रमाला न जाता आपल्या चार-पाच शेतावर व रानात मला काही वेळ घालवायचा होता. शेतावर चक्कर टाकल्यावर मनाला एक छान विरंगुळा मिळत असे.

लहानपणी एप्रिल-मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडील शेतावर असलेल्या फळझाडांचा सानिध्यात घालाविलेल्या काही स्मृती परत अनुभवाच्या होत्या. नदीकाठी असलेल्या अंबराईत व जांभळांच्या गडद सावलीत बसून शांततेत काही वेळ घालवावा म्हणून ही खास शिवारफेरी योजली होती. रब्बी हंगाम संपल्यामुळे बहुतेक सर्व पिके काढून झाली असतील आणि आता गावाकडील यात्रांचा हंगाम सुरू झाल्यामुळे आमराईत कोणी नसेल व एकांत मिळेल असे वाटले होते. उन्हाळ्यात फळांनी बहरलेली ताजी ताजी जांभळे, करवंदे, पाडाचे आंबे, चिंचा खाण्याचा आनंद लुटायचा होता.

घरी आल्यावर वहिनींनी नेहमीप्रमाणे आवडीचे पदार्थ करून ठेवले होतेच. ते खाल्यावर पुतण्याने मोटरसायकल काढली आणि म्हणाला चला जाऊया शेतावर. मी पायीच चालत जाऊया असे त्याला सांगत होतो. थोडाफार व्यायाम झाला असता आणि शेतावर पायी चालत जाऊन फेरी मारण्यात एक वेगळीच मजा असते. दुसरा पुतण्या लगेच म्हणाला कशाला मोटरसायकल, निष्कारण तुम्हाला खाच खळग्यामुळे अनेक गचके बसतील. आपल्या व्हॅन मधूनच जाऊया त्यामुळे कमी वेळातच सर्व शेतांची चक्कर तुम्हाला आरामात मारता येईल. व्हॅन काय सगळ्या ठिकाणी जाईलच असं नाही त्यामुळे तुमचे पायी चालणेही होईल. कोणाचा फोन येऊन ठरविलेल्या बेतात अडथळा नको म्हणून मी फोनही घरीच ठेवला व शेतांचा फेरफटका मारायला निघालो.

गावी काही वर्षांपूर्वी मोठा बंधारा झाल्यामुळे मुबलक पाणी असल्याने सगळीकडे भर उन्हाळ्यातही हिरव्यागार पिकांनी शिवार बहरले होते. उन्हाळी भुईमूग, बाजरी, काकड्या, खिरे आणि ऊस सगळीकडे तरारून आलेले दिसत होते. त्या भरलेल्या पिकांच्या शेतातून जाताना आल्हाददायक वाटत होते.
जस जसा पुढे चाललो तसतसा एका मागून एक धक्का बसू लागला. सगळीकडे बांधांची रुंदी पूर्ण कमी झाली होती. काही ठिकाणी तर बांध राहिलेच नव्हते. शेताजवळील पोटखराबा व मोकळ्या जागेत असलेली चिंचा, बोरी, जांभळे, टेंभुर्णी, भोकरी, फणस यातले एकही झाड दिसत नव्हते. ती झाडे काढून तिथे पिकं काढणे सुरू झाले होते.
खाली मळईत असलेली जांभळाची झाडे दिसत होती. या झाडाकडे जाऊन पिकलेल्या जांभळांनी भरलेले झाड पाहून तोंडाला पाणी सुटले होते. एक पुतण्या झाडावर चढून त्याने पिकलेली ताजी ताजी जांभळे काढून आम्हाला दिली. मिटक्या मारत मारत गर्द सावलीत बऱ्याच जांभळांवर ताव मारला. थोड्यावेळाने नदीकाठी असलेल्या आमराईकडे निघालो. तिथे आता फारच कमी आंब्याची झाडे राहिली होती. पाडाचे काही आंबे मिळतात का हे माझा एक पुतण्या पाहत होता. शेंदऱ्या वाणाचा आंबा लवकर पाडाला लागतो. शेंदऱ्या आंब्याच्या झाडावर त्याला काही पाडाचे आंबे मिळाले. तेथेच आंब्याच्या शांत सावलीत बसून काही गोड आंबट पाडाचे आंबे खात खात मुलांबरोबर तेथे सध्या लावलेल्या आंब्याच्या झाडांबद्दल बोलत होतो.

भर उन्हाळा असूनही बंधाऱ्यामुळे आमराई जवळ भरपूर पाणी होते. पाणी म्हणजे शेतकऱ्यांचे जीवन संगीत ! त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात झालेला कायापालट पाहून मिळणारा आनंद शब्दात सांगणे कठीणच होते. सगळे हिरवेगार शिवार व पिकांनी भरलेली शेती, डोलणारी पिके त्या संगीताची साक्ष देत होती. भरपूर पाणी असल्यामुळे नवीन नवीन अनेक जातीच्या पक्षांनी या ठिकाणी आता आपलं वास्तव्य केलं होतं. त्या पक्षांच्या हालचाली आणि चाललेली कुजबुज मनाला उल्हासित करत होती.

थोड्या वेळाने खंडितील जमिनीकडे निघालो. जवळ ओढ्याच्या काठी असलेल्या उतारावरील रानात करवंदाच्या जाळी असायच्या. तिथे काही करवंदे खायला मिळतील या आशेने तिकडे निघालो. उन्हाळी बाजरी खंडित लावली होती. शेतीच्या पश्चिम टोकाला उतारावर पिकलेली करवंदे अजून असतील ना असे पुतण्यांना विचारले. ते दोघेही हसू लागले. ते म्हणाले आता कोठेही इथे करवंदाच्या जाळी राहिल्या नाहीत. मी म्हटलं ठीक आहे समोरच्या टेकडीवर जाऊ. तिकडे जायला खूप वेळ लागेल त्यामुळे तिकडे जाणे त्यांनी टाळले. एक पुतण्या दूर बाजूला जाऊन फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याचे बोलणे झाल्यावर आम्ही दाण्याने टचाटच भरलेली बाजरीची काही कणसे तोडून बरोबर घेतली. मधल्या शेतात उशिरा लावलेल्या शाळूची भरगच्च दाण्यांनी भरलेली ताटे डुलत होती. हुरड्यासाठी शाळूची काही कणसेही तोडून घेतली.
आता आमचा मोर्चा निघाला तिसऱ्या जमीनेकडे. पूर्वी तिथे जनावरांचे चरावू राणंच जास्त होते. तिथे बिबूट्या आणि टेंभुर्णीची झाडे होती. शेतातच विस्तवावर भाजलेल्या बिबूट्या खूप खूप वर्षांपूर्वी खाल्ल्या होत्या. बिबूट्यांचा हंगाम होता म्हटलं यावेळी काही खायला मिळतील. तिथे जाऊन पाहिलं तर एकही झाड दिसत नव्हते. बरेच रान सपाट केले होते आणि नांगरून कसाऊ जमिनी केल्या होत्या. त्या जमिनीमध्येही आता पिके घेतली जात होती.

नंतर आम्ही सोळा मनातील शेतीकडे गेलो. तिथे मात्र आश्चर्यचकित झालो. पुतण्याने शेतालगत बांधलेल्या घराजवळ डाळिंब, सिताफळ, पेरू, चिकू, पपई, नारळ, या सारखी अनेक फळझाडे लावली होती. त्याने पिकलेली एक पपई कापून आमच्या पुढे त्याच्या खापा ठेवल्या. घरच्या सेंद्रिय पद्धतीने वाढविलेल्या गोड गोड पपया खाताना एक वेगळाच आनंद मिळत होता. स्वतःच्या शेतात वाढविलेल्या या फळांचे विशेष कौतुक वाटत होते आणि त्याची चव आगळीच वाटत होती.
काही वेळाने घराकडे निघालो. घरी आल्यावर वहिनीकडे काही जांभळे, पाडाचे आंबे आणि हुरड्यासाठी आणलेली कणसे देऊन वट्यावर घरा शेजारील आंब्याच्या सावलीत गप्पा मारत बसलो. थोड्या वेळातच मोटरसायकलवर आलेला एक अनोळखी मुलगा आमच्या समोर आला. पुतण्याने त्याला जवळ बोलाविले. मोटर सायकलवर पाठीमागच्या सीटवर बांधलेली टोपली घेऊन तो आमच्याकडे आला.

पिंपळाच्या पानांनी झाकलेली टोपली ताज्या ताज्या करवंदांनी भरली होती. त्यांच्या खमंग वासाने तोंडाला पाणी सुटले होते. आता लक्षात आले पुतण्याने रानात कोणाला फोन केला होता तो. तो मुलगा पिंपळाच्या पानावर त्यातील काही करवंदे काढून आम्हाला देऊ लागला. पुतणे ती करवंदे मिटक्या मारत खाऊ लागले पण मी हातात घेतल्यावर वहिनी लगेच आतून जोरात बोलल्या थांबा. मी तुम्हाला ती चांगल्या उकळलेल्या पाण्याने धुऊन देते. ज्या मुलाने ती करवंदे आणली होती त्यांनी सांगितले की ही कोये गावाजवळील टेकडीवरच्या रानातील करवंदे आहेत. त्या ठिकाणी कुठलेही औषध मारले जात नाही. तिथल्याच पिंपळाची पाने टोपलीत घालून ती करवंदे आणलीत. वहिनी मला म्हणाल्या की मोटरसायकलवर आणताना धुळ लागली असेल. निष्कारण तुम्हाला त्रास नको. तुम्हाला आता सवय नसल्यामुळे तसं खाणे तब्येतीला साथ देईल असे नाही. पोटात काही बी झाले तर. अशी काळजी घेणार्‍या वहिनींना कोण नको म्हणणार. त्यातील काही करवंदे वहिनींनी चांगली धुवून मला दिली. करवंदे आणलेल्या मुलाला वहिनींनी चहा व काही बिस्किटे दिली. गप्पा करत करत ती करवंदे आम्ही मिटक्या मारत खात होतो.

करवंदे आणलेल्या मुलाला विचारले बाळा तुझे नाव काय रे ? मुरलीधर असा तो म्हणाला. त्याला काही पैसे देण्यासाठी मी माझे पाकीट उघडले व काही नोटा त्याला देऊ लागलो तर तो नको नको म्हणाला. मी परत आग्रह केला पण तो म्हणाला माझ्या आई व आजोबांना जर पैसे घेणे समजले तर मला खूप बोलणी खावी लागतील. मी त्याला म्हटलं आम्हालाही तू पैसे घेतले नाही तर बरे वाटणार नाही. तुझ्या आजोबांचे नाव काय रे ? तो उतरला – हरी. तुमच्या वाड्यात ते अनेक वर्ष कामावर होते. वाड्यातील सर्व माणसे त्यांना घरच्यासारखेच वागवत होते. काम करणारा गडी म्हणून त्यांना कधीच वागणूक दिली नाही. तुझे आजोबा मला माहित आहेत. त्याच्या आजोबांची मी चौकशी केली. ते आता बरेच थकले होते. लहानपणी सुट्टीत गावी आलो त्यावेळी दोन-तीन वेळा एकादशीला हरिभाऊ बरोबर आम्ही आळंदी वारीला गेलो होतो. हरिभाऊंनी एकादशीची आळंदी वारी कधी चुकवली नव्हती. पांढरा सदरा, धोतर, टोपी व गळ्यात तुळशीची मोठी माळ, कपाळावर चंदनाचा गंध ते नेहमीच लावत असत. आळंदीहून ते लाह्या व काजूचा प्रसाद आणून आम्हा सर्वांना वाटत असे. आम्ही सर्व मुले त्यांचे दर्शन घेत असे. त्या आठवणी भराभर डोळ्यासमोर येऊ लागल्या. बाकीचे वारकरी चाकण बाजारात थांबत असत. हरिभाऊ मात्र लवकर परत येऊन आम्हाला प्रसाद देऊन जनावरांची काळजी घेत असे. विशेषता दुभत्या गायींकडे ते खूपच लक्ष देत असत.

थोड्यावेळाने मुरलीधर निघतो असे म्हणाला. मी वहिनींना हाक मारली व सकाळी आळंदीहून गावी काही व पुण्याला नेण्यासाठी आणलेल्या लाह्या काजू आणि पेढ्यांचे प्रसादाचे पुडे बाहेर आणायला सांगितले. वहिनींनी मला आत बोलावले व म्हटले तुम्हाला हा प्रसाद पुण्याला न्यायचा आहे ना. सगळा मुरलीधरला देण्यापेक्षा काही पुण्यासाठी ठेवते. मी वहिनींना म्हटलं हरिभाऊ तुम्हाला माहित नाहीत. हा प्रसाद ते घराजवळील सर्व मुलांना आणि शेजारी पाजारी सगळ्यांना प्रेमाने देतील. देहूत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन परत जाताना मी पुण्याला ताईला नेण्यासाठी प्रसाद घेऊन जाईल असं वहिनींना सांगितले. बागेतून एक स्पोर्ट टी शर्ट व प्रसाद घेऊन बाहेर आलो.

ते प्रसादाचे पुडे त्याला दिले. सांगितले की तुझ्या आजोबांना सांग विठ्ठलाच्या एका भक्ताने आळंदीहून आणलेला माऊलींचा प्रसाद तुमच्यासाठी दिलाय. मी मुरलीधरची साईज पाहून त्याला एक स्पोर्ट टी शर्ट पण दिला. तो नकोच म्हणत होता. त्याला मी म्हणालो बाळा तुझे आजोबा तुला सांगत होते ना ते आम्हाला घरच्यासारखे होते. तूही आम्हाला घरच्यासारखाच आहेस. जसे माझ्या पुतण्यांनी ते टी-शर्ट घातले आहेत असा तुही घरचा म्हणूनच तो घे. प्रसादाची पिशवी व टी-शर्ट घेत त्याने माझे दर्शन घेतले. आमचा निरोप घेऊन त्याच्या मार्गे मोटरसायकलवर निघून गेला.

पण मी मात्र ती ताजी ताजी गोड करवंदे खात खात आळंदी आणि देहू वारी नियमित करणारे, दुभत्या गायींची विशेष काळजी घेणारे, मुलांवर प्रेम करणारे हरिभाऊ वारकरी यांच्या आठवणीत गुंग झालो होतो.

माधव गोगावले

— लेखन : माधव ना. गोगावले. शिकागो, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मधावा , गावाकडची ओढ व बालपणाच्या आठवनिया वयात जास्त उपहाळून येतात. नुसती करवंदे किंवा बिबुट्या अथवा शेंद्री गोटीरामजी आंब्याच्या पदाची चवच वेगळी. अकल्पित व अप्रूक बाजारात नाही मिळू शकत. वाचताना जुन्या बालपणीच्या आठवणींनी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूना वाट करून दिली इतक्या शेलक्या शब्दात समर्पक वणीने हा लेख तुम्ही लिहिला आहे. तुमचे व माझे गांवाची शिवा एकच. डोंगरावर पलीकडे वडगांव पाटोळे हेमाझे गांव. कोये गावातही लहानपणीनातेवाईकांकडे नेहमी जात असे. मळपट्टी दहामणी किंवा बाराखंडी अशी जमिनीची ओळख आमच्याकडेही आहे. पाण्याचा सुकळी आणी बांध किंवा जुनी अब्याची झाडे गायब होणे हे बदल छान टिपले आहेत. आमच्याकडे ही एक राम नावाचे ग्रहस्त जाणवरे सांभाळायला होते. रोजी आमच्या बरोबर जेवायला बसत. दिवाळीला आमच्या बरोबर त्यांनाही कपडे केले जात. आमच्या प्रत्येक सणात व आनंदाच्या दुःखाच्या क्षणात ते भागीदार असत.
    माधवराव आपल्या लेखामुळे माझीही vertual शिवारफेरी पर पडली. छान लिहिताय, लिहीत रहा. इतरांनाही आनंद मिळत राहील .धन्यवाद 👍👏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?