1) कधी पडशील…
कधी पडशील रे पावसा भिजवण्या तृषार्त माती आता !!
आतुरतेने वाट पाहतो
तुझ्याच आगमनाची
कुठे दडलाशी हेच ना कळे रे
सांग ना बाबा का रूसलाशी !१!
शेतकऱ्यांचा अंत का पाहसी
चोही बाजुने तोही जाते नडला
तुच त्याचा आहे उद्धारकर्ता
हे का न कळते रे तुजला !२!
बेजार झाला तोही बिचारा
कोण देईल आधार त्याला
सरकारी पोकळ घोषणेला
आता तोही कंटाळलेला !३!
उसन उधारीवर त्याने
कसे आणले बी बियाणे
औषधी खतांची बेगमी
अजूनही केली नाही त्याने !४!
जून आता संपत आला
तरी तू का अजूनही रूसला
सांग एकदाचा कधी पडणार
का बरे तुला नाही कळवळा !५!
रखरखलेली शेती पाहून
उदास झालेत सारे शेतकरी
काही कळेना काय करावे
कोसळून जारे झडकरी !६!
कोसळून जारे झडकरी !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
2 ) मेघ राजास साकडे
वरुण राजा मेघ राजा
नको करुस रे मस्करी l
निज कर्तव्याला जाग तू मेघा ll
बरस आता तू भूवरी अवघा l
नको कोपू तू चराचरवरी ll
तुज विनंती असे परोपरी l
वर्षा करी आनंदाची ll
थेंबा थेंबातून नव चैतन्याची l
पावसाची असे आतुरता ll
शिणला जीव आता पुरता l
ये रे ये रे पावसा सत्वर ll
फुलव भूवरी नवीन अंकुर l
धान्याचे भरू दे शिवार ll
दुःख दैन्य करी हद्द पार l
जगताचा पोशिंदा बळीराजा ll
तयाच्या कष्टा फळ दे मेघराजा l
जगाचे सुख भाकरी बळीराजाच्या हाती ll
खरेच आहे शेतकरी जगज्ज्योती l
जगज्ज्योती करी सुखे प्रकाशित ll
करी पृथ्वी अवघी प्रमुदित ll

— रचना : अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️व9869484800
