हरित क्रांतीचे जनक : वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. हा दिवस “कृषीदिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पाहू या वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान. वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
“अन्नदाता शेतकरी जर समृद्ध झाला, तर राज्यासह देशही सुजलाम सुफलाम होईल”, हा संदेश देणारे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयाच्या पुसद तालुक्यातील गहुली येथे फुलसिंग नाईक यांच्या बंजारा समाजाच्या शेतकरी कुटुंबात झाला. अन् जणू भटक्या अन् विमुक्त जातींचा कैवारी उदयास आला.
महत्वाचे म्हणजे १ मे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतरावांनी महसूल मंत्री म्हणून धुरा सांभाळली होती. इतकेच नव्हे तर, नाईकसाहेबांनी पुढे सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केले. राज्याच्या राजकारणात त्यांची अजातशत्रू व वादातीत राज्यकर्ते म्हणून ओळख झाली.

नाईकसाहेबांना आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविताना अग्नीदिव्यातून जावे लागले होते. कारण त्यांच्या कार्यकाळात दोन युद्धे झाली होती. त्यांना तीन दुष्काळांना सामोरे जावे लागले. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांचा महाराष्ट्र हा ताठ मानेने उभा राहिला. कोणापुढे झुकला नाही.
दर्जेदार कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असा शेतकऱ्यांना संदेश देऊन नाईकसाहेबांनी हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल केली. १९७२ च्या भीषण दुष्काळाने साऱ्या राज्यात कहर केल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार व हातावर जीवन जगणाऱ्या कष्टकरी लोकांसमोर उदरनिर्वाह करण्याचा जटिल प्रश्न उभा राहिला होता. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेची संकल्पना मांडली. या योजनेअंतर्गत शेती व शेतीपूरक कामे मिळत गेल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला. ही अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य गणले गेले.
भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी रोजगार हमी योजनेची मुक्तकंठाने प्रशंसा करून तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं अभिनंदन केलं होतं. राज्यातील लोकांना अवर्षण काळात धीर देताना नाईकसाहेब म्हणाले की, “दुष्काळाच्या परिस्थितीतही महाराष्ट्रातील माणसं कुणाच्या दयेवर जगणार नाहीत, तर काबाडकष्ट करून, मानाची चटणी-भाकर मिळवतील, पण कोणापुढे हात पसरणार नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमानी इतिहास कोणाला बदलता येणार नाही”. वास्तविक पहाता, वसंतरावांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी कामगार, शेतमजूर यांना संकटकाळातही ताट मानेनं जगण्याची शिकवण दिली. राजकारणातून समाजकारण कसं करावं, हे बाळकडू नाईकसाहेबांनी राज्यकर्त्यांना दिला.
नाईकसाहेबांच्या नावाने राबविलेले “वसंत बंधारे” ही योजना राज्यात सर्वदूर राबविण्यात आली.”पाणी अडवा, पाणी जिरवा “हे ब्रीद सर्वच शेतकऱ्यांनी आत्मसात करून आपल्या कृषीक्षेत्रात कार्यान्वित केलं.

नाईकसाहेबांच्या मते आजचा शेतकरी हा उद्याचा कारखानदार व्हावयास पाहिजे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यात साखर कारखाने, सुत गिरण्या, कुक्कुटपालन पशुपालन,दुग्धव्यवसाय सुरू करण्यास चालना दिली. वास्तवात त्यांनी शेतकऱ्यांना उद्यमशील होण्याचा महामार्ग दाखविला. नाईकसाहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. कृतज्ञतेच्या भावनेतून तत्कालिन राज्य सरकारने १९८४ मध्ये भटक्या व विमुक्त जातींच्या लोकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी अल्पदरात कर्ज मिळावे, या उद्देशाने वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळ स्थापन केले.
मराठी ही राज्यातील लोकांची बोली भाषा असल्याने, नाईकसाहेबांनी आपल्या कार्यकाळात प्राधान्याने तिला राजभाषेचा दर्जा देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य लोकांना शासकीय कामकाजातील नियम, कायदे समजणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय अन् संवाद साधणे सुकर झाले. सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य झाल्याने शासनस्तरावर जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तथा कामे यांचा निपटारा जलदगतीने होऊ लागला. मराठी राजभाषेला लोकाभिमुख करण्याचे सर्वस्वी श्रेय नाईकसाहेबांना जाते.याबद्दल राज्यातील मराठी माणूस हा त्यांचा सदैव ऋणी राहील.हाच धागा धरून राज्यातील महायुती सरकार हे केंद्रातील मोदी सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात यशस्वी झाले आहे. याबद्दल राज्यातील जनतेने केंद्रातील मोदी सरकार अन् राज्यातील महायुती सरकारचे शतशः आभार मानले आहेत.
स्व.वसंतराव नाईक यांचा आदर्श घेऊन राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यातील महायुती सरकार हे यशस्वी वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध लाभदायक योजना राबविल्या. त्यात एक रुपयाची कृषी विमा योजना व अन्य योजनांचा समावेश आहे. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी महायुतीचे सरकार हे “आपलं सरकार” आहे, ही जाणीव शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे प्रतिबिंबित होते.
चला तर, आपण सर्वजण लोकसहभागातून राज्यात पुनश्च हरित क्रांती निर्माण करण्यास सरकारला हातभार लावूया अन् लोकनेते वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार करूया !

— लेखन : रणवीर राजपूत. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा आहे.नाईक साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला.म्हणून त्यांचा जन्मदिवस कृषीदिन म्हणून संपन्न होतो ही आनंदाची बाब आहे.