आनंदी असणे ही माणसाची मूलभूत गरज आहे हे ओळखून संयुक्त राष्ट्र संघ 2013 पासून 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा करीत आहे.
आनंदी राहावं, सतत आनंद मिळावा,vयासाठी सर्व माणसांची धडपड असते. नव्हे, तशी ती असावीच अन्यथा आयुष्य हे नीरस, कंटाळवाणे होऊन जगणेच निरर्थक वाटू लागते. यातूनच मग नैराश्य, विविध मानसिक, शारीरिक आजार मागे लागतात. दुर्दैवाने काही व्यक्ती टोकाचे पाऊल उचलतात.
असे सर्व काही नकारात्मक बघितले की, सतत वाटते या व्यक्तींना हे सुंदर, आनंदी जग सुंदर, आनंदी का वाटत नाही ? या व्यक्तींच्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या असतात, घडत असतात त्याच किंबहुना त्याहून अधिक कठीण घटना इतर व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या असतात. घडत असतात. पण ते कसे त्या त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतात ? सर्वच व्यक्ती काय, सख्खे दोन भाऊ सुद्धा एकसारखे नसतात, हे मान्य. पण किमान काही गोष्टी सर्वांसाठी समान असू शकतात का ? सर्वांसाठी काही “किमान समान कार्यक्रम” असू शकतो का ? याचा विचार करायला हवा.
आनंदाची ज्याची त्याची व्याख्या वेगवेगळी असू शकते. पण आपला आनंद हा दुसऱ्याला त्रास देणारा, त्याचा आनंद हिरावून न घेणारा असावा, याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे.
आनंदी जगण्याविषयी, सतत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, लोकांना दिलासा मिळावा, मार्ग दिसावा म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील असले पाहिजे. त्या दृष्टीने www. newsstorytoday.com या पोर्टलवर आपण विविध उपक्रम, लेख, यश कथा देत असतो. उद्देश हाच की, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी खचू नका. धीर धरा. प्रतिकूल परिस्थिती बदलेल यासाठी आशावादी रहा. त्या साठी योग्य प्रयत्न करा. आपल्या जीवनाचे निश्चित ध्येय ठरवा. हे ध्येय तरुणपणीच ठरविले पाहिजे, असेच काही नाही. तरुणपणी मुख्य ध्येय असते, ते आपले करिअर ठरविण्याचे, त्या प्रमाणे ते आत्मसात करण्याचे. या दृष्टीने मी तरुणांना व त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी केवळ सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा असे बाह्य निकष विचारात न घेता, मुख्यतः याचा विचार करायला हवा की, मला काय करायला आवडते ? आपल्या आवडीचे क्षेत्र, काम करिअर म्हणून निवडल्यास त्यांना कधी ही ताण तणाव, वैफल्य, अनारोग्य अशा बाबींशी सामना करावा लागणार नाही. कारण प्रत्येक क्षणी त्यांना त्यांच्या कामातून आनंदच मिळत राहील. ही बाब विचारात घेऊनच मी डॉक्टर, इंजिनियर,
अधिकारी या व्यतिरिक्तचे शेकडो अभ्यासक्रमांची माहिती असलेले “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातील सर्व लेख महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज पोर्टल वर प्रथम प्रकाशित झाले आहेत. विविध वृत्तपत्रांत ही ते प्रसिध्द झाले आहेत.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण असे ध्येय ठरवू शकतो. ते फार मोठे असले पाहिजे, फार महान असले पाहिजे, असेही काही नाही. साध्या वाटणाऱ्या ध्येयातून पुढे कदाचित मोठे काम उभे राहू शकेल. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मार्गदर्शन, दिव्यांग व्यक्तींना मदत, आपल्या परिसरात असलेल्या सामाजिक संस्थेच्या कार्यात, उपक्रमात सहभाग, आपले छंद जोपासणे, नियमित व्यायाम, योग, ध्यान धारणा अशा किती तरी गोष्टी आहेत, ज्या तुम्ही आम्ही आपले ध्येय म्हणून ठरवू शकता.
एकदा असे काही धेय्य ठरविले की मग सतत सक्रिय रहा. यातूनच तुम्हाला तुमचा आनंद गवसेल. जीवनाला अर्थ प्राप्त होईल. जीवन जगावेसे वाटू लागेल. कधी एकदा आजचा दिवस संपतो, असे न वाटता, कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि मी कामाला लागतो, असे वाटत राहील. निदान माझा तरी हाच अनुभव आहे.
इथे मला आवर्जून उल्लेख करायला हवा की, २५ वर्षांपूर्वी मी कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना फार दौरे करावे लागत. कारण मुख्यमंत्री, अनेक मंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी मान्यवर मंडळी मुंबईतून जरी निवडून आलेली असली तरी, ती सर्व मूळ कोकणातील असल्याने कोकण विभागात सतत कार्यक्रम, बैठका, उपक्रम होत. सतत ताण तणावाची परिस्थिती असे. अशा वेळी ज्येष्ठ ऑर्थोपेडीक सर्जन डॉ अशोक पागृत यांनी मला मोलाचा सल्ला दिला, तो म्हणजे चोवीस तासातील एक तास तरी तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी देत चला. मग ही आवडीची गोष्ट म्हणजे वाचन, लेखन, चालणे, फिरणे, मित्र मंडळींशी बोलणे, आपला छंद जोपासणे, अशी काहीही असू द्या. तो तुम्ही तुमच्यासाठी दिलेला एक तास तुम्हाला सतत ऊर्जा देत राहील ! आणि खरोखरच मी त्यांचा सल्ला आजपर्यंत पाळण्याचा प्रयत्न करीत आलो आहे.डॉ पागृत सरांचे मानावे, तेव्हढे आभार थोडेच.
मी स्वतःच नेहमी म्हणत असतो की, जगात अजूनही काही अशी व्यवस्था नाही, ठिकाण नाही, दुकान नाही की मॉल नाही, जिथे जाऊन आपण म्हणू शकतो, हे दोन लाख रुपये घ्या आणि मला दोन किलो आनंद द्या ! किंवा अजूनही अशी काही व्यवस्था नाही की, हे दहा कोटी रुपये घ्या आणि मला पुढील दहा वर्षे काही होणार नाही, याची गॅरंटी द्या. काही झालेच तर विम्याचे पैसे मिळतील. पण होऊच नये यासाठी काही व्यवस्था नाही आणि म्हणुनच आपले आरोग्य, आनंद कशात आहे, ते शोधू या आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील राहू या.
आजच्या दिवशी आपण आनंदाने जगण्याचा आणि आनंदाने जगू देण्याचा संकल्प करू या आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.
आपल्या आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आपल्या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टल वरील,आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेले” चला,आनंदाने जगू या”हे आव्हानात्मक अप्रतिम लिखाण वाचले ,खर तर माझ्यासारख्या ८०व्या वर्षाकडे झुकलेल्या शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या,सेवेमध्ये चाकुरीबद्ध जीवन जगलेल्या व्यक्तीला या लिखाणामुळे उभारी आली ,चैतन्य निर्माण झाले आणि शक्य असल्यास काही तरी करावे असे मनोमन वाटू लागले, हे लिखाण वाचणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांचे मनात नक्कीच हेच विचार आले असावेत ,केव्हढी ताकद आहे आपल्या लिखाणात हेच.दिसून येते,आपल्या पोर्टल ला असाच जगभर उत्तम प्रतिसाद मिलु देत एव्हढीच आम्हा दोघांची इच्छा