साहित्य हे वैश्विक असते,असावे असे आपण म्हणतो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा दरवर्षी, तीन दिवसांचे भव्यदिव्य मराठी साहित्य संमेलन आयोजित करीत असते. आता पर्यंत ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. असे असताना जात निहाय साहित्य संमेलने असावीत की नसावीत ? या विषयावर आपण मते, दृष्टिकोन मागविले होते. त्या अंतर्गत बंजारा समाजाचे स्वतंत्र साहित्य संमेलन का हवे? या विषयी विचार मांडले आहेत, कवी, लेखक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांनी. वाचू या त्यांचे अनुभव, विचार, कल्पना…
— संपादक
पार्श्वभूमी : साहित्य हा कोणत्याही समाजाचा आरसा असतो. The Literature is the Mirror of Social Life. असे जॉन मिल्टन या प्रसिद्ध ब्रिटीश साहित्यिकाने म्हटले आहे. आपण ही गोष्ट विचारात घेतली तर, कोणत्याही समाजातील विविध समाज घटकांना अन्न, वस्त्र, निवारा ही त्रिसुत्री जीवन जगण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची गरज असते. ही बाब आपण विसरता कामा नये, असे मला वाटते.मात्र, कोणत्याही समाजाच्या विशेषत: वंचित, पिडीत, भटके-विमुक्त, दलित – पददलित आणि बंजारा समाजाच्या मुख्य व प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी, शेती, शेतमजुरी व अन्य कामकाज केल्या शिवाय त्यांचे उदरभरण अथवा उदरनिर्वाह होणार नाही. म्हणून समाजात शिक्षणाप्रती जनजागृती करणे आवश्यक आहे. ही जनजागृती शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण घ्यायचे म्हणजे साहित्य निर्मिती आलीच. कोणत्याही समाजात जोपर्यंत शिक्षणाचा ओनामा सुरू होणार नाही, तोपर्यंत शिक्षणाचा प्रसार – प्रचार झाल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होणार नाही.
महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडात बंजारा समाज पिढ्यानपिढ्या मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेला समाज आहे. बंजारा समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मागासलेपणा सांगायची गरज वाटत नाही. कारण, बंजारा समाज संपूर्ण भारतात अनेक नावाने ओळखला व संबोधल्या जाणारा आणि मेहनतीचे काम करत जगणारा समाज आहे.
बंजारा समाजाची सांस्कृतिक व मौखिक परंपरेने चालत आलेली संस्कृती जगावेगळी म्हणावी लागेल. ही संस्कृती अतिशय सुंदर आणि मौलिक स्वरूपाची असून या समाजाची एकच भाषा, समान खान-पान सेवा, एकच संस्कृती – सांस्कृतिक धरोवर, देव-देवता बहूतेक मंडळी संत सेवालाल महाराज बापू यांना पुजक आहे. विशेषतः निसर्ग पुजक आहे. मात्र बंजारा भाषेची स्वतःची लिपी नाही. या समाजाची लिपी नसल्यामुळे पाहिजे तशी साहित्य निर्मिती झाली नाही, ही बाब सत्य आहे.
बंजारा समाजाची स्वतंत्र लिपी नसली तरी, या समाजाने महाराष्ट् राज्याचे दीर्घकालीन मुख्यमंत्री राहिलेले, कृषी क्रांतीचे जनक तथा महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन आपले सामाजिक, आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट पद्धतीने उच्च शिक्षणाच्या माध्यमातून प्रस्थापित समाजाच्या वरिष्ठ अधिका-यांपासून तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्यापर्यंत मजल मारली आहे. ही गोष्ट आपल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे शक्य झाली आहे.
आता बंजारा समाजाला साहित्य संमेलनाची गरज का आहे ? याचा आपण ऊहापोह करू या.आपणांस विदित आहेच की, आजमितीस सर्व भारतीय समाजातील प्रस्थापित, विस्थापित, दलित पददलित, समाजातील, भटक्या विमुक्तांचे, विद्रोही साहित्य संमेलने दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात. कारण, या सर्व समाजात विविध साहित्य प्रकारातील ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सर्व समाजातील प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक संस्था, मराठी साहित्य मंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माध्यमातून या सर्व प्रस्थापित – विस्थापित समाजाची संमेलने होतात . त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात .प्रस्थापित समाजाच्या साहित्य संमेलनाचे भारतीय आणि जागतिक स्तरावर आयोजन करण्यासाठी शासनाकडून मोठे व भरघोस अनुदान देण्यात येते. मात्र, दुसरीकडे विस्थापितांच्या, दलितांच्या विद्रोही, भटके विमुक्त समाजातील साहित्य संमेलनासाठी शासनाकडून एक दमडीही अनुदान देण्यात येत नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट वाटते. तरीही, या विस्थापित, दलित पददलित शोषीत, वंचित, विमुक्त – भटक्या समाजाची साहित्य संमेलनाचे माफक दरात व स्वरूपात आयोजित करण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन बंजारा समाजात विविध स्तरावर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा विचार होणे आवश्यकता वाटते.
आता, प्रस्थापित – विस्थापित, दलित पददलित, वंचित पिडीत भटके-विमुक्त समाजाचे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे या सर्व समाजाला काय फायदे मिळालेत,ते पाहू या.
१. साहित्य संमेलनाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असल्यामुळे या प्रस्थापित व विस्थापित समाजात साहित्याविषयी आवड – गोडी निर्माण झाली.
२. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये सर्व मागासवर्गीय , दलित पददलित वंचित पिडीत व बहूजन समाजासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व शिक्षण घेण्यासाठी सोयी सवलती स्कॉलरशिप देण्यासाठीची तरतूद करण्यात आली. परिणामी या सर्व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळाली आणि या समाजाने संधीचे सोने करून, आज हा मागासलेला, वंचित, शोषित समाजाने शिक्षण, संशोधन आणि साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे.
३. याशिवाय, भारतीय संविधानातच मुलभूत अधिकाराची (Fundamental Rights) तरतूद करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे (Directive Principles) निर्माण करून मागास प्रवर्गामधले सुटलेले भटके – विमुक्त जाती जमाती मधील तसेच बहूजन समाजातील प्रवर्गासाठी संबंधित राज्य सरकारने यथायोग्य निर्णय घेऊन उर्वरित समाज प्रवर्गाला शैक्षणिक , आर्थिक, सामाजिक सोयी सवलती स्कॉलरशिप देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, बंजारा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट, दर्जेदार व सर्वांगीण विकासाची दारे उघडली.
४. आज विमुक्त जाती भटक्या जमाती मधील अनेक जाती जमाती विशेषतः बंजारा समाजातील मुले – मुली उच्च शिक्षणा माध्यमातून आपली व समाजाच्या ऐतिहासिक साहित्यासह अनेक क्षेत्रांत प्रगती करत उंच भरारी घेत आहेत.
५. बंजारा समाजातील अनेक अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर तसेच ग्रामीण भागातील तांडा – वस्तीवरील राहणारे अनेक किर्तनकार, प्रवचनकार, गायक, भजन्या, लेखक – कवी मंडळी कडून प्रबोधनात्मक विचारांचे साहित्य निर्मिती करताना दिसतात.
६. ही साहित्य निर्मिती बंजारा बोली भाषेसह मराठी, इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात बंजारा समाज स्थायी झाला आहे. त्या राज्यातील स्थानिक भाषेत त्यांची साहित्य निर्मिती होत आहे.
७. जर एवढ्या मोठ्या संख्येने विविध राज्यात वसलेला बंजारा समाज आज साहित्याबरोबरच अनेक क्षेत्रांत प्रगती करतो आहे. त्या बंजारा समाजातील नवतरूणांच्या आंतरीक भावनेच्या साहित्यिक लिखाण रूपी हुमाळ्याला (Strong Feelings and Throbbing) जागा मोकळी करून देण्यासाठी कोणते तरी विचारमंच नको ?
८. मग हा विचारमंच म्हणजेच बंजारा समाजाच्या विविध स्थित्यंतराचा, परास्तेपणाचा, १८७१ च्या कलंकित कायद्यामुळे लागलेल्या चोर, दरोडेखोर, निगराणी बदमाश अशी विशेषणे लागलेल्या व ओळख असलेल्या एका मोठ्या समाजातील नवतरूणांच्या मनातील भावभावनांचा “उद्रेक” “कल्लोळ” आणि “हुमाळो” (The Conflict of Inner Strong Feelings and Throbbing) व्यक्त करण्यासाठीच “बंजारा समाजात साहित्य संमेलनाची गरज नसणार काय ?*
९. कारण, आज आपण २१ व्या शतकाचे साक्षीदार आहोत, त्यास केवळ बंजारा समाजाच नाहीत, तर इतर अनेक समाजातील विस्थापित, वंचित पिडीत, भटके- विमुक्त, व कलंकित समाजाच्या जगण्याचे प्रश्न अतिशय तीव्र होणार आहेत. त्यामुळे प्रस्थापित व विस्थापित, परास्तजन समाजाच्या विविध स्तरातील पराकोटीचा वैचारिक भेद, संघर्ष वाढत जाणार आहे. त्यामुळे या समाज घटकात अशा सार्वजनिक व सामाजिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले पाहिजे. त्याद्वारे वैचारिक सामंजस्य निर्माण झाले पाहिजे असे मला वाटते आणि हे काम साहित्यिक व साहित्यच करू शकते.
१०. म्हणूनच बंजारा समाजात साहित्य संमेलनाची गरज काय ? यासंदर्भात वरील सर्व वैचारिक विवेचनावरून “वंचितांच्या विश्वातील” तसेच बंजारा समाजातील नवतरूण – लेखक, कवी, साहित्यिक यांच्या मनातील सामाजिक “वेदनेच्या हूंदक्यांना” वाट मोकळी करून देण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे असे मला वाटते.

— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800