Thursday, September 18, 2025
Homeयशकथाजिचे तिचे आकाश : ८

जिचे तिचे आकाश : ८

“माधवी कुंटे”

लेखिका माधवी कुंटे ह्यांनी वयाच्या ४५ वर्षी १९८९ मध्ये पहिले पुस्तक तर २३ मार्च २०२४ रोजी शंभरावे पुस्तक प्रकाशित केले, हे किती कौतुकास्पद आहे ना ? किती तावचे ताव लिहीले असतील ना त्यांनी ?

माधवी ताईंनी (लग्ना आधीच्या मोने) मानसशास्त्र हा विषय घेऊन सेंट झेवियर्स मधून बी.ए.ऑनर्स केले. त्यानंतर त्या बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि बी.एड. या दोन्ही अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत चमकल्या. शिक्षणानंतर त्या अध्यापन क्षेत्रात २२ वर्षे कार्यमग्न होत्या.

माधवी ताईंचे पती मर्चंट नेव्हीत अधिकारी होते. त्या त्यांच्या बरोबर नेहमी सागर सफारीवर जात असल्यामुळे, त्या अनुभवावर आधारित त्यांनी “मी एक खलाशी” ही कादंबरी प्रथम लिहीली. त्याची दुसरी आवृत्तीही लगेच निघाली. ती कुसुमाग्रज, व. पु. काळे, शंकर वैद्य अशा नामवंतांसह तत्कालीन नौवहन सल्लागार सुधीर नाफडे, भारताचे मुख्य ऍडमिरल भास्करराव सोमण इ. अनेक नौदल अधिकारी यांना आवडली. तिला दलीत साहित्त्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच १९८९ सालच्या दहा उत्कृष्ट कादंबऱ्यामध्ये तिची निवड झाली. मग मात्र माधवी ताईंनी रोज लिहायची सवय लावून घेतली आणि त्यामुळेच त्या १०० पुस्तकं लिहू शकल्या.

माधवीताईंनी सर्व प्रकारचे लिखाण केले. त्यांच्या ९ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. कथा प्रकार त्यांचा आवडता आहे. मानसशास्त्र विषय घेतल्यामुळे माणसं वाचणे, त्यांचे अनुभव ऐकणे ह्यातून त्यांना अनेक कथाबीजं मिळत गेली आणि त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत, त्यावर कथा गुंफल्या. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषयांवर लेख लिहीले. त्या लेखांची शेवटी अनेक पुस्तकं निघाली. “सय” हे त्यांचे निवडक आठवणींचे, स्मृतीपर लेखांचे पुस्तक आहे. त्यांचे ५ ललित लेख संग्रह आहेत. त्यांची नांवे पण किती छान आहेत. बिलोरी, गप्पांगण, हिरवी पालवी, ऋतू मनभावन, वृक्ष संस्कृती ही नांव वाचूनच पुस्तक वाचायची इच्छा होते.

कवितेत ही माधवीताई रमल्या आहेत. त्या अतिशय रसिक आहेत. रोज पहाटे उठून त्या गच्चीत फेऱ्या मारतात. सुर्योदय, आकाशाचे रंग, सकाळी फुललेली फुलं, आजूबाजूचा सुंदर निसर्ग पाहिल्यावर, त्यावर ४ ओळी लिहील्या शिवाय त्यांना रहावत नाही. मग त्या सर्व सुंदर शब्दांनी गुंफलेल्या कवितांची निसर्गायन, आरास, त्रिदल, मृण्मयी अशी कवितांची पुस्तकं होतात.

सकारात्मक जीवनावरची माधवीताईंची ६ पुस्तकं आहेत. स्त्री रंग, स्त्री सूक्त, स्त्री पर्व अशी त्यांची स्त्री जीवनावरील लेखांची पुस्तकं आहेत. स्त्री पर्व हे त्यांचे पन्नासावे पुस्तक आहे. सुदृढ मानसिकतेसाठी, सफर मनाची, स्थानाची, जीवनमूल्य अशा इतर विषयांवरचे ६ लेखसंग्रह आहेत.

माधवीताईंनी मोठ्यांसाठीच पुस्तकं लिहीली आहेत असं नाही. त्या अतिशय उत्तम प्रकारे गोष्टी सांगतात. मुलांशी गप्पा मारतांना त्या मुलांना खिळवून ठेवतात. त्यांनी मुलांसाठी ३ बालकविता संग्रह आणि १६ कथासंग्रह लिहीले आहेत.

माधवीताईंनीश्रुती लिमये हिचे जलतरण अनुभवांचे शब्दांकन करून “सागरी झेप” ह्या पुस्तकातून सर्वांपर्यंत ते पोहोचवले आहेत. आध्यात्मिक आणि तत्वज्ञानांवर त्यांची ६ पुस्तकं आहेत. ओशों वर ३ पुस्तक लिहीली आहेत. त्यांचे विचार आपल्या सोप्या शब्दात त्यांनी कथन केले आहेत.

माधवी ताईंनी हिंदी व इंग्रजी भाषेतील मान्यवर लेखकांचे लिखाण खूप वाचले आहे. त्यामुळेच इतर भाषेतल्या अनेक मान्यवर लेखकांच्या कथांचे, कादंबरीचे, दीर्घकथांचे, त्यांच्या तत्वज्ञानांचे मराठीत अनुवाद करून, ते पुस्तक रूपात आणले आहे. वेद राही ह्यांचीच ५ पुस्तकं त्यांनी अनुवादित केली आहेत.
अनेक प्रकाशन संस्था त्यांची पुस्तकं काढायला उत्सुक असतात.

माधवी ताईंनी लोकसत्ता, तरूण भारत, नवशक्ती इ. वृत्तपत्रांमध्ये तसेच किर्लोस्कर, स्त्री, विपुलश्री, चारचौघी, इ. नियतकालिकांमध्ये स्तंभलेखन केले आहे, लेख, मुलाखती लिहील्या आहेत. अनेक मासिकं, दिवाळी अंक, चरित्रकोश, महिला चरित्रकोश ह्यांच्यासाठी संपादक, उपसंपादक, अतिथी संपादक, सहसंपादक अशा भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पडल्या आहेत .

माधवी ताईंनी आकाशवाणी साठी अनेक कथा, रूपकं, ह्यांचे लेखन केले आहे. नभोनाट्य केली आहेत. दूरदर्शनवर त्यांनी सुंदर माझे घर, ज्ञानदीप साठी काही भागाचे लेखन व सादरीकरण केले. “तुझ्या गळा माझ्या गळा“ ह्या मालिकेचे संवाद लेखन केले. ई टि.व्ही च्या सखी ह्या कार्यक्रमाच्या ५० भागाचे लेखन केले.

“मणी मंगळसूत्र” या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन माधवी ताईंनीच केले आहे. त्यांच्या आणखी दोन चित्रपटाची तयारी चालू आहे.

माधवीताईं अनेक संस्थेत सल्लागार, अध्यक्ष, कार्यवाह, कार्यकारिणी मंडळाच्या सदस्य आहेत. त्यांनी आणि लेखिका चारूशिला ओक ह्यांनी १० वर्षापूर्वी एक अनोखा उपक्रम सुरू केला. एक लेखनाची कार्यशाळा घेऊन त्यातल्या २० जणींसाठी कथाक्लब सुरू केला. महिन्यातून एकदा भेटून लेखनाचे वेगवेगळे प्रकार शिकवून, ह्या वीस जणींना लिहीते केले. सराव, मार्गदर्शन, प्रोत्साहन देऊन ह्या सर्व जणी आपली पुस्तकं काढण्या इतपत तयार केल्या. काहींची २/३ पुस्तकं आहेत. त्यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. अतिशय प्रेमळ सूचना, लाघवी, आनंदी, उत्साही स्वभाव ह्यामुळे कथाक्लब च्या गुरू असल्या तरी मैत्रिणीसारख्या त्या सगळ्यांशी वागतात. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. कारण मी पण कथाक्लबची एक सदस्य आहे. माझे पुस्तकही माधवी ताईंच्या मुळेच झाले आहे आणि माझ्या त्या पुस्तकाला पण त्यांचीच प्रस्तावना आहे.

माधवाताईंना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, यादी खूपच मोठी आहे. साहित्य संमेलनात अध्यक्षपद मिळाले आहे, पुस्तकांच्या आवृत्या निघाल्या आहेत. जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला विशेष प्रशंसा मिळाली आणि ह्या उत्तेजन देणाऱ्या सुरवातीनंतर, पुढच्या ९९ पुस्तकांना, त्यांच्या इतर उपक्रमांना मान्यवरांची शाबासकी मिळतच गेली आणि त्यांच्या यशाचा आलेख ऊंच ऊंचच जात राहिला.
तरी त्या या यशानी हुरळून गेल्या नाहीत. कायम हसतमुखाने त्यांनी सर्वांना मदत केली आहे, मार्गदर्शन केले आहे, प्रेमाने वागून सगळ्यांना जिंकले आहे.
वयाची ऐंशी वर्ष ओलांडली तरी सकाळी माधवीताई कॅाटवर बसून, आपल्या सुवाच्च मोत्या सारख्या अक्षरांनी ताव च्या ताव लिहीत असतात. त्यांना अशीच शक्ती, कायम राहू दे आणि त्यांच्याकडून अजून खूप पुस्तकं लिहून होऊ देत, यासाठी शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 986984800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप छान. कौतुकास्पद. त्यांच्या मायेची पाखर माझ्या व पारले साहित्य कट्टा च्या सर्वच सभासदांवर कायम असते. त्या माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा