ठाणे येथील मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळाचा १९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मायबोलीच्या सभासदांनी मराठी बोलीभाषेची वेगवेगळी पद्धत, लहेजा यावर आधारित ‘बोलीभाषेची फोडणी’ नावाचे सादर केलेले प्रहसन उपस्थितांची छान दाद मिळवून गेले. विशेष म्हणजे या प्रहसनाचे संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण हे कुणा एका व्यक्तीचे नव्हते तर सगळे काही मायबोलीच्या सदस्यांचे होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रमुख पाहुण्या डॉ.वंदना बोकील यांनी ‘इये मराठीचिये नगरी’ या विषयावर विद्वत्तापूर्ण आणि ओघवत्या शब्दात विवेचन केले. माय मराठीचा आतापर्यंतचा प्रवास, त्यात झालेले बदल हे सगळं त्यांनी दाखले देऊन साध्या, सोप्या आणि सहजसुंदर शैलीत सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
मंडळाच्या अध्यक्षा सुषमा ताम्हाणे यांनी अध्यक्षीय भाषणात मंडळाच्या कार्याचा आढावा आणि भविष्यातील योजना सांगितल्या.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. पाहुण्यांची ओळख आणि कार्यक्रमाचे संचलन ज्योती शहाणे यांनी केले. सचिव अमृता प्रधान यांनी मंडळाचा अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

अतिशय उत्साहात साजरा झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री.मनोहर डुंबरे, समाजसेवक श्री.महेंद्र देशमुख, ब्रह्माण्ड कट्ट्याचे श्री.राजेश जाधव तसेच ब्रह्माण्ड परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
श्री. देवेंद्र भुजबळ व सौ. अलका भुजबळ यांना मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळ(ब्रह्मांड, ठाणे) यांच्यातर्फे मन:पूर्वक धन्यवाद🙏 त्यांच्या पोर्टल वर आपल्या मंडळाच्या वर्धापन दिनाची बातमी छापून मायबोलीच्या प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यात खूप मोलाचा हातभार लावला आहे. लाखो लोकांपर्यंत मायबोलीचे कार्य यामुळे पोहोचेल आणि अनेक मराठी प्रेमींना त्यापासून प्रोत्साहन मिळेल याचा विश्वास वाटतो. श्री. व सौ. भुजबळ यांचे हे पोर्टल लाखो मराठी जनांच्या प्रती प्रेमींचा दुवा ठरावा आणि ह्यानिमित्ताने समस्त मराठी जन एकत्रित येऊन आपल्या मायमराठीला पुन्हा एकदा पूर्वीचे गतवैभव मिळवून देईल.
पुन्हा एकदा श्री संत रामदास स्वामींच्या उक्तीनुसार..
“मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा
आहे तितुके जतन करावे
पुढे आणिक मेळवावे
महाराष्ट्र राज्य करावे
जिकडे तिकडे ll