Monday, September 15, 2025
Homeलेखदिवाळी माहात्म्य

दिवाळी माहात्म्य

धनत्रयोदशी व गुरुद्वादशी

“दिवाळी माहात्म्य” या लेख मालेत आपण काल वसू बारस चे महत्व समजून घेतले. आज जाणून घेऊ या, धनत्रयोदशी व गुरुद्वादशी चे महत्व….
– संपादक
      
दीपावलीच्या पर्वात पशू, गुरे, ढोरे यांची पूजा असते आणि पशूपतीची ही ! गुरुद्वादशीनिमित्त पशुपतिनाथ महादेवांची पूजा होते. अज्ञानाच्या अंधकारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा आदिगुरू महादेव आपल्या संस्काराने पशुवत जीवन उन्नतीकडे नेणारा तो आदिनाथ म्हणून गुरुद्वादशी दिवशी त्याची पूजा. आदिनाथ महादेवांच्या अनेक विचारांचा वारसा जपत वेगवेगळ्या गुरु शिष्य परंपरा भारतामध्ये विकसित झालेली दिसून येतात. ‘आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा’असा सार्थ गौरव महादेवांच्या कार्याचा झालेला आहे.

नटराज अनेक कलांचा निर्माता. महादेव शिव म्हणजे विविध कलांचा अधिष्ठाता. विविध कलांचे गुरु शिष्य परंपरेमध्ये महादेवांचे गौरवशाली स्मरण नेहमी होत राहते. वैद्यनाथ महादेव औषधी शास्त्राचे प्रणेते आयुर्वेदाचे जाणकार म्हणून महादेवांना वैद्यनाथ असे म्हणतात. महादेवांचा प्रिय बेल औषधी गुणधर्म असलेला. हा त्रिगुणी बेल त्रिदोषाला मारक आहे. भगवान शिव विविध शस्त्राचे उद्गाते. भगवान शिवांशी त्रिशूल हे अस्त्र आणि शस्त्र ही जमिनीच्या मशागत करताना त्रिशूल तिफन सदृश्य होऊन राहते. तर युद्धप्रसंगी अपरिमित हानी करणारे शस्त्र होते. शिव आणि शिवप्रभावळीतील देवतांच्या हाती त्रिशूल हे शस्त्र असतेच. महादेव हा रणधुरंधरांचा, रणविरांचा प्रेरक देवता आहे. ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करीतच रणांगणावर समशेरी तळपतात. महादेवांकडून पाशुपातास्त्र प्राप्तीसाठी परशुराम, अर्जुन इत्यादी वीरांनी शिव आराधना केली आहे. पौराणिक मान्यतेनुसार देव श्रीविष्णू देवाधिदेव महादेवांची आराधना करून सुदर्शनचक्र प्राप्त केली ही कथा प्रसिद्ध आहेच. अनेक शूरवीरांच्या गुरुपरंपरेमध्ये आदीगुरु महादेवांचे पुण्यस्मरण होतच राहते.

अनेक गुरु शिष्य परंपरा मध्ये देवादिदेव महादेव शिवशंकर आदिनाथ, नटराज, योगीराज, वैद्यनाथ, पशुपतिनाथ, अनेक कलांचे अधिष्ठाते महादेव नृत्य, वाद्य, गायन कथानिवेदन इ कलांचे निर्माते म्हणूनच मरणीय आहेत. पौराणिक संदर्भाने अगदी परशुरामाचा अवतारांपर्यंत शिवमहादेवांचे शिवोहsम हे एकच एक सूत्र आपल्याकडे दिसून येते.

डॉ. वाय जी बोधे यांच्यामते शैववादी पंथात कालांतराने वृषभ ऋषींनी ज्ञान पद्धत निर्माण केला. तो ज्ञान पंथ म्हणजेच जैन पंथ होय. त्यामुळे काही हिंदू जैन सांप्रदायी बनले त्याचे एक कारण म्हणजे त्यांनी मानलेली उपास्य देवता आदिनाथ ही होय, आदिनाथ म्हणजेच शिवशंकर महादेव. अर्थात अनेक गुरुपरंपरा ज्यांचे पासून सुरू झाल्या त्या देवाधिदेव महादेवांना आदिगुरूंना गुरुद्वादशी निमित्त नमन होते.

आज धनत्रयोदशीही आहे. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असते. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी शेतीतील धान्य, शेतीची अवजारे, सोने, चांदी, भांडी इ. वस्तूंचे व आरोग्यदायी वनस्पतींचे  पूजन होते.

शेतकऱ्याबरोबर कारागिरही आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात. तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच खरी संपत्ती त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. अवजारे व देवतांना धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखविल्या जातो. सोने, चांदी व उपयुक्त वस्तू इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ समृद्धी आणतात अशी ही लोक श्रद्धा आहे.

आपल्या कृषी संस्कृतीमध्ये कष्ट करणाऱ्यांचा सुद्धा सन्मान आहे. त्याचेविषयी कृतज्ञता आहे. मग तो प्राणी असो वा वस्तू. प्रत्येक सणाला जोडून येणारी स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून स्वच्छतेला सहाय्यक असणाऱ्या वस्तू ही आपल्याला पुज्यनिय आहेत. सणांचा राजा असलेल्या दिवाळीत झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. धन आणि समृद्धीसाठी कुबेर, कुबेर पत्नी हरिती आणि कुबेराचे आराध्य भगवान महादेव पूजा होते.

अलिकडील परंपरेत श्री गणेश, हरिती लक्ष्मी यांची पूजा केली जाते. यादिवशी आयुर्वेदाचे तज्ञ उपासक धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशीला पूजा केली जाते. असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमदीप दानाची वेळ असते. एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करावी आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.
‘‌अपमृत्यू टळावा यमदेवा !’ अर्थात धनत्रयोदशी समयी उत्तम आरोग्याची आराधना सातत्याने करण्याचा संकल्प सोडावा. कालाचा काल महाकाल शंकराचे स्मरण करीत दीपदान करुन यमाची प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

राजेंद्र गुरव.

— लेखन : राजेंद्र बाळकृष्ण गुरव.
वंशपरंपरागत पूजक
श्री यमाई मुळपीठ भवानी औंध, जिल्हा सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा