Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ३२

दुर्मीळ पुस्तके : ३२

“श्वेतरात्री” भाग – ३

बापुडी काल्पनिक कथा

अवघ्या काही तासांपूर्वी खिडकीतून उडी मारुन जिने आत्महत्या केली आहे अशा बायकोचा पती, तिचा मृत देह मेजावर ठेवलेला आहे अशावेळी गोंधळलेला आहे. त्याच्या विचारांची घडी विस्कटून गेली आहे. घरातील खोल्यांमधून येरझार्‍या घालत आहे. जे काही घडून गेले त्याचे आकलन करण्याचा तो प्रयत्न करतो.

भाग १

मी कोण होतो आणि ती कोण होती

त्याला आठवते ‘आवाज (‘गोलस’ पीटरबुर्गमधून प्रकाशित होणारे दैनिक ) मध्ये नोकरी पाहिजे अशी जाहिरात द्यायला पैसे हवे म्हणून ती तिच्या वस्तू गहाण टाकायला त्याच्याकडे आली होती. तिला गव्हर्नेसची नोकरी हवी होती. तिच्या वस्तू पाहून तो हैराण झाला होता. सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची कर्णभूषणे, एक फालतू लाॅकेट या वस्तू तिच्या दृष्टीने खूप मौल्यवान होत्या. तिच्या आई – वडीलांनी तेवढ्याच गोष्टी तिच्यासाठी त्यांच्या माघारी ठेवल्या होत्या. तो एकदाच तिच्या वस्तूंना पाहून कुत्सित हसला. एकदा ती सशाच्या कातड्याच्या जाकीटाचे उरलेले काही तुकडे घेऊन आली तेव्हा त्याचा संयम सुटला आणि तो काहीतरी चुकून कुत्सित बोलून गेला तेव्हा ती शरमून ते तुकडे उचलून निघून गेली होती. तेव्हा तिचे विशेषपण त्याला जाणवते. ती वयाने खूप लहान सोळा वर्षांची होती. दुसऱ्या दिवशी ती परत त्याच्याकडे येते. त्या आधी ती ते जाकीट घेऊन दोब्रोनरावोव व मोसेरकडे गेली होती. पण ते दोघे सोन्याच्या वस्तूंशिवाय दुसरे काही गहाण घेत नव्हते. तो सुद्धा सोन्याचांदीशिवाय दुसरे काही गहाण घेत नसतो पण तिच्या तो नक्षी कोरलेला खडा घेतो.

मोसेरकडून परतल्यावर ती त्याच्याकडे तृणमण्याचा सिगार-होल्डर घेऊन येते. तो कोरडेपणाने वागतो पण तिच्या हातावर दोन रुबल ठेवतो. नंतर जेव्हा ती आली तेव्हा त्याच्या ध्यानात येते की ती दयाळू आणि बापुडवाण्या स्वभावाची आहे. आरंभी ती जाहिरातींमध्ये दिमाखदार शब्द वापरत. नंतर मात्र कोणतीही नोकरी करण्यास तयार आहे अशी आणि त्यानंतर ‘पगाराची अपेक्षा नाही, फक्त जेवणावारी’ अशी ती जाहिरात देऊ लागली. तिच्या निराशेचा कडेलोट झाला. तिला नोकरी मिळाली नाही.

एके दिवशी ती तिची देवाची तसबीर गहाण टाकायला येते. पवित्र मेरीची मुलाबरोबरची ती तसबीर होती. सोनेरी मुलामा चढवलेली चांदीची चौकट तिच्याभोवती होती. तो सांगतो चौकट गहाण ठेवा आणि तसबीर घरी घेऊन जा. दुसरा पर्याय ती तसबीर तो दुसर्‍या तसबिरीबरोबर दिव्याखाली ठेवतो, दहा रुबल घेऊन जा. पण ती दहा नको पाच रुबल द्या म्हणते. तो तिला त्याची मानू लागला होता

२. विवाहाचा प्रस्ताव

तो तिच्याबद्दलची गुपिते शोधून काढतो. तिचे आई-वडील तीन वर्षांपूर्वी वारले होते व ती नालायक मावश्यांच्या ताब्यात होती. त्याला अनुकूल अशी तिची परिस्थिती होती. तो सेवानिवृत्त कनिष्ठ कप्तान होता. त्याची सावकारी पेढी होती. ती मावश्यांच्या मुलांना शिकवायची, त्यांचे कपडे शिवायची, धुणी करायची , फरश्या धुवायची. तिला मारहाण व्हायची आणि तिचा उध्दार व्हायचा. अखेर तिला विकायचा मावश्यांचा इरादा होता.शेजारचा लठ्ठ दुकानदार ज्याची दोन किरणा दुकाने होती, जो ५० वर्षे वयाचा होता आणि दोन बायका ज्याने थडग्यात पाठवल्या होत्या त्याची नजर तिच्यावर पडते. तो सोयरिक जमवतो. ती घाबरते. ती वस्तू गहाण टाकायला निवेदकाकडे येते. तिला ‘आवाज’ मध्ये नोकरीसाठी जाहिरात देण्यासाठी पैसे हवे असतात. ती मावश्यांकडे विचार करायला अवधी मागते.संध्याकाळी दुकानदार तिला भेटायला जातो. निवेदक तिला निरोप पाठवतो की तो तिची फाटकापाशी वाट पाहत आहे. फाटकापाशी तो तिला विवाहाची मागणी घालतो. ती आश्चर्यचकित होते. विचारात गढून जाते. ती कोणाची निवड करील असा निवेदकाला प्रश्न पडतो.

३. लोकांमधील सर्वात उदात्त, पण माझा मात्र विश्वास नाही

त्याला झोप लागत नाही. निवेदक ४१ वर्षांचा होता आणि ती अवघ्या १६ वर्षांची होती. ही विषमता त्याला आकर्षक वाटते. लग्नाची मागणी घातल्यानंतर मुलीच्या पालकांना भेटण्याची प्रथा असते. निवेदक तिच्या मावशांना भेटतो आणि त्यांचा वाटा देऊन टाकतो.शिवाय प्रत्येकी १०० रुबल बक्षिसी. ही बाब तो तिला सांगत नाही. तिच्यापाशी काही नव्हते पण ती कशाचीही अपेक्षा धरत नव्हती. शेवटी नवरीचा पोषाख तोच करील असे तो तिला कसेबसे पटवतो. आरंभापासून त्याच्यावर ती प्रेमाचा वर्षाव करते. संध्याकाळी तो घरी परतायचा तेव्हा ती त्याचे अधीरतेने स्वागत करायची. तिच्या लहानपणाबद्दल, तिच्या घराबद्दल, तिच्या आई-बापाबद्दल मधुर निष्पाप खूप बडबड करायची. पण तिच्या उत्साहावर तो थंडगार पाणी ओतायचा. प्रथम तिने त्याच्याशी कडाक्याचा वाद घातला, मग हळू हळू ती कमी बोलू लागली, पुढे पूर्ण गप्प बसू लागली. अचानक त्याला तिच्या मुद्रेवर अविश्वासू, मूक, वाईट स्मित उमटलेले दिसते. त्याने तिला घरात आणले तेव्हाही तिच्या मुद्रेवर तेच स्मित होते.

४. केवळ योजनाच योजना

लग्नापूर्वीच त्याने तिला खुलासा केला होता की तिला त्याच्या जागी पेढीवर बसावे लागेल. वस्तू गहाण घेऊन लोकांना पैसे देण्याचे काम करावे लागेल आणि तेव्हा ती काहीही बोलली नव्हती. तिने ते काम उत्साहाने हाताळले होते. लग्नापूर्वी तो तिला म्हणाला होता की खाण्यासाठी दिवसाला एक रुबल खर्च त्याला मंजूर होता. तिने काही आक्षेप घेतला नव्हता. नाटके बघायला जाणे वगैरे छंद चालणार नाही असेही तो तिला म्हणाला होता. तरीही महिन्यातून एकदा तिला तो नाटकाला नेत होता. मात्र मौन बाळगून. सुरुवातीला त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकण्याची तिला सवय होती. त्याने मात्र मौनाचा अतिरेक केला. तिच्या बापुडवाण्या चेहर्‍याचे हळूहळू मग्रूर मुद्रेत रुपांतर घडते. तिला तो किळसवाणा वाटू लागला होता. अचानक ती नाटकांना जायला नकार देऊ लागली. तिच्या चेहर्‍यावरील तिटकारा अधिकाधिक वाढत गेला.

५. बापुडी बंड करते

अचानक तिने स्वतःच्या मनानुसार कर्जे देण्याचा निर्णय केला व त्यांची भांडणे सुरु झाली. गहाण वस्तूंच्या किंमती तिने अधिक ठरवल्या आणि एक – दोनदा त्या विषयावर त्याच्याशी वादसुद्धा घातला. कप्तानाची विधवा, एक म्हातारी बाई, तिच्या नवर्‍याने तिला भेट दिलेले लाॅकेट गहाण टाकायला येते. तो तिला ३० रुबल देतो. पाच दिवसांनंतर ती लाॅकेटच्या बदल्यात एक कंकण आणते, ज्याची किंमत ८ रुबलसुद्धा नव्हती. अर्थात तो त्या म्हातारीला नकार देतो. तो पेढीवर नसताना ती म्हातारी परत येते आणि लाॅकेटच्या बदल्यात कंकण ठेवून जाते.त्या व्यवहाराबद्दल त्याला कळते.ती घरातून निघून जाते. सायंकाळी उशीरा घरी येते. दुसर्‍या दिवशीही निघून जाते. तिच्या मावशांकडे ती गेलेली नसते. मावशा सांगतात ह्या भानगडीत येफीमोविच हा लष्करी अधिकारी गुंतलाय ज्याने निवेदकाचे रेजिमेंटमध्ये नुकसान केलेले असते. त्याची बायको येफीमोविचकडे जाते, त्यांची संकेत भेट झाली असे मावशा सांगतात.यूलीया साम्सोनोव्ना या विधवेमार्फत हे सर्व चालले होते. त्यांची जेव्हा एकांत – भेट होईल तेव्हा त्यांचे बोलणे चोरुन ऐकण्याचे तो ठरवतो. बापुडी माणसे काहीवेळा स्वतःच्या मर्यादा एवढ्या ओलांडतात की बघणार्‍यांचा त्यावर विश्वास बसत नाही. द्वंद्व खेळायला घाबरलात म्हणून रेजिमेंटमधून हकालपट्टी करण्यात आली हे खरे आहे का असे ती विचारते. खरं तर आॅफिसरांच्या कोर्टाने निवेदकाला रेजिमेंट सोडून जायला सांगितले होते पण त्या आधीच त्याने राजीनामा दिलेला होता. त्यांच्या निवाड्यात त्याला भित्रा ठरवण्यात आले होते पण त्याने द्वंद्व खेळायला नकार दिला तो केवळ त्यांचा जुलमी न्याय त्याला मान्य नव्हता म्हणून.तो स्वतःचे समर्थन करतो. तीन वर्षे तो पीटरबुर्गच्या रस्त्यावरुन भीक मागत फिरत होता हे खरे आहे का असेही ती त्याला विचारते. त्याच्याकडून खुलासे घेणे आणि त्याचा अपमान करणे हाच तिची इच्छा होती.लग्नाआधी त्यापैकी काही सांगितले नाही याबद्दल ती विचारते. तो उत्तर देत नाही. ती निघून जाते. दुसर्‍या दिवशी तो दारामागे उभा राहतो. खिशात रिवाॅल्वर असते. ती संकेत मीलनासाठी टेबलापाशी नटून थटून बसली होती. येफीमोविच तिच्या भोवती गोंडा घोळत होता. तासभर तो त्यांचे संभाषण ऐकतो. मात्र तिच्या विशुध्दतेबद्दल त्याची खात्री पटते. एकदम दरवाजा उघडून तो त्या प्रसंगाची अखेर करतो. तिच्या हाताला धरुन तिला घरी घेऊन जातो. खिशातले रिवाॅल्वर टेबलावर काढून ठेवतो. ती त्याच्यापाशी न निजता दिवाणावर जाऊन झोपते.

६. भयानक आठवण

सकाळी तो जागा होतो. ती टेबलापाशी उभी होती व तिने हातामध्ये रिवाॅल्वर धरलेले होते. अचानक ती त्याच्या दिशेने चालू लागते. तो डोळे मिटून झोपेचे सोंग घेतो. ती त्याच्या कानशीलापाशी रिवाॅल्वरची नळी लावते. तो डोळे उघडून परत झोपेचे सोंग घेतो. जणू तो द्वंद्व खेळत होता. पुन्हा जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा ती खोलीत नसते. तो समोवारपाशी येतो. तिच्याकडून चहाचा पेला घेतो. ती पांढरीफटक पडलेली असते. तिला समजते की त्याने सर्व पाहिले होते. रात्री ती बरळत राहते व तापाने फणफणते. सहा आठवडे ती आजारी पडते.

भाग – २

१. अभिमानाचे स्वप्न

दिवस-रात्र तो आणि लूकेर्या तिची सुश्रुषा करतात. ती शुध्दीवर येते तेव्हा तो तिच्या नजरेआड राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ती संपूर्ण बरी होते तेव्हा त्याच्या खोलीत शांतपणे येऊन बसते. नंतर ते बोलू लागतात पण फुटकळ.

२. बुरखा अचानक पडला

एप्रिलमध्ये तो पेढीवर बसून हिशेब तपासत होता.ती टेबलाशी बसून शिवणकाम करत असते. अचानक तिचे मंद आवाजातील गुणगुणणे त्याच्या कानी पडते. ते कुठलेतरी प्रेमगीत होते. ती त्याच्या देखत गात होती. त्याचा तिला विसर पडला होता. त्याच्या डोळ्यांवरचा बुरखा खाली पडतो.

३. मला फारच समजते

तो सावकारी पेढी बंद करतो आणि धंदा दोब्रोनरावोवकडे सोपवतो. ती त्याला म्हणू लागली की, ती गुन्हेगार आहे, तिच्या गुन्ह्यापायी संबंध हिवाळाभर तिने मानसिक छळ सोसला. त्याच्या मनाचा मोठेपणा तिला बहुमोल वाटतो. विश्वासू पत्नी होईन, त्याचा आदर करीन असे ती त्याला सांगते. तो तिला वेड्यासारखी मिठी मारतो. तो परदेश प्रवासाच्या परवान्यासाठी बाहेर जातो. परततो तर फाटकाशी लोकांची गर्दी. लूकेर्या त्याला सांगते की तो गेल्यानंतर आणि परतीच्या आधी वीस मिनिटे ती काहीतरी मालकीणीला विचारायला गेली होती तो तिने पाहिले की तिची देवाची पवित्र मेरीची तसबीर भिंतीवरुन खाली काढलेली होती आणि मालकीणबाई प्रार्थना करीत होती. दहा मिनिटांनी लूकेर्या परत जाते तर मालकीणबाई भिंतीपाशी खिडकीजवळ विचारात उभी असते. इतक्यात खिडकी उघडल्याचा आवाज ऐकू येतो. थंडी वारा बाधेल असे सांगायला लूकेर्या पुढे जाते तोच मालकीणबाई हातात तसबीर घेऊन खिडकीत उभे राहून बाहेर उडी टाकतात.

४. फक्त पाच मिनिटे उशीर झाला

कशासाठी ही बाई मेली असा त्याला प्रश्न पडतो. जर तिचे दुसर्‍यावर प्रेम बसले असते तर खुशाल त्याच्याबरोबर हसत गेली असतीस आणि रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने पहात तो उभा राहिला असता. पुन्हा त्याच्यापुढे रितेपणा उभा राहतो आणि ही कथा संपते.

एका विचित्र वल्लीचे स्वप्न (काल्पनिक कथा)

या कथेत निवेदक स्वतः वल्ली आहे. तो स्वतःला विचित्र वल्ली संबोधतो. बाकीचे त्याला वेडपट म्हणतात. त्याला हसतात. पूर्वी त्याला त्याबद्दल दु:ख व्हायचे. वैषम्य वाटायचे. त्याचा गर्विष्ठपणा वर्षांगणिक वाढत गेला होता. त्याने विचार करणे सोडून दिले होते. त्याला पर्वा नव्हती. विषण्ण पाऊस पडत होता. गॅसच्या उजेडात सगळं खिन्न करणारं दृश्य दिसत होतं. तो आकाशाकडे नजर टाकतो. काळोख्या आकाशात फाटकेतुटके ढग असतात. त्यांच्या खड्ड्यात त्याला एक छोटा तारा लुकलुकताना दिसतो. त्या छोट्या तार्‍याने त्याच्या मनात कल्पना दिली:त्या रात्री तो आत्महत्या करीन असे तो ठरवतो. त्याने रिवाॅल्वर घेऊन ठेवलेले असते. दोन महिने रोज रात्री तो आत्महत्या करण्याच्या इराद्याने घरी जात होता. योग्य क्षणाची वाट पहात होता. या तार्‍याकडे पाहून तो आत्महत्येचा निर्धार करतो. हीच ती रात्र असावी असे त्याला वाटते. तेवढ्यात अचानक एक छोटी आठ वर्षांची मुलगी त्याचा कोपर धरते. तिला कसली तरी भिती बसलेली असते. ती किंचाळत असते. तो पुढे चालू लागतो तर त्याच्या पाठी धावू लागते. तिची आई कुठेतरी मरणाच्या पंथाला लागलेली असते किंवा आणखी काही संकट तिच्यावर कोसळलेले असते. तो तिच्याबरोबर जात नाही. तिला हाकलण्याचा विचार करतो. पोलीसात जायला सांगतो. पण ती काही त्याचा पिच्छा सोडत नाही. अचानक ती त्याला सोडून रस्त्यावरुन चाललेल्या दुसर्‍या माणसामागे धावते. तो भाड्याच्या खोलीत राहत असतो. रोज रात्री तो पहाटेपर्यंत झोपत नसतो. त्या रात्री त्याने खरेच गोळी झाडून घेतली असती जर ती लहान मुलगी नसती.

२.

त्याला वेदना जाणवत होती. वाईट वाटत होते. त्या लहान मुलीला मदत करु शकत असताना मदत का केली नाही असा त्याला प्रश्न पडतो. त्या मुलीने त्याचे आयुष्य वाचवले होते कारण त्याची आत्महत्या लांबणीवर पडली होती. त्याला टेबलसमोर खुर्चीतच झोप लागते. नकळत तो गाढ झोपतो. त्याचा भाऊ ५ वर्षांपूर्वी वारलेला होता. तो त्याच्या स्वप्नात येतो. त्याच्या सर्व कारभारात तो भाग घेतो. त्याला स्वप्न पडते. त्या स्वप्नाने त्याला सत्य दाखवलेले असते. त्याच्या स्वप्नाने त्याला नव्या थोर, पुनरुज्जीवित, जोमदार जीवनाचा लाभ होतो.

त्याला स्वप्न पडते की त्याने रिवाॅल्वर उचलले आणि सरळ स्वतःच्या हृदयावर टेकवले. तो घाईघाईने चाप ओढतो. स्वप्नात त्याला वेदना जाणवत नाही. स्वप्नात त्याला शवपेटीत घालून नेत होते. नंतर त्याला जमिनीत पुरत होते. सगळे जातात. तो एकटा राहतो. त्याला थंडी वाजते. पायाची बोटे बधीर झाली होती. त्याचे थडगे उघडून एक काळी अनोळखी व्यक्ती त्याला उचलते व ते अंतराळात उडतात. त्याला भीती वाटत नाही याचे त्याला कौतुक वाटते. त्या अंधारात अचानक तो एक छोटा तारा पाहतो. हा तोच तारा असतो जो त्याने आधी पाहिलेला असतो. पण तो त्याला थडग्यातून उचलून नेणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असतो. अचानक तो सूर्य पाहतो. तो पृथ्वीवरचा सूर्य नसावा. त्याच्या दफनानंतर त्याला प्रथमच जीवन जाणवते. तो पृथ्वी कोठे आहे ते विचारतो. पापाने बरबटलेली नव्हती अशा पृथ्वीवर तो उतरतो. साथीदार त्याला सोडून गेलेला असतो. तिथे निष्पाप माणसांची वस्ती होती.

तो म्हणतो :खुशाल ते स्वप्न असू दे. पण त्या सुंदर आणि निष्पाप लोकांनी त्याच्यावर प्रेम केल्याची संवेदना त्याचजवळ सदैव राहील असे त्याला वाटते.त्यांच्या पृथ्वीचे तो चुंबन घेतो. त्याच्या पृथ्वीवर प्रत्येकजण त्याच्या तोंडावर हसतो. तो सांगत असलेला सर्व तपशील स्वप्नात दिसणे कधीही शक्य नाही. त्याच्या स्वप्नात त्याने केवळ त्याच्या संभ्रमावस्थेत त्याच्या काळजात आकार घेतलेली काही संवेदना पाहिली व अनुभवली असावी आणि हा सारा तपशील जाग आल्यानंतर त्यांनी रचला असावा असे सगळे म्हणतात. सगळे त्याची टिंगल करतात.

एक सत्य तो उघड करतो. त्या सर्वांना भ्रष्ट केल्याचे सांगतो. त्याच्या स्वप्नाने हजारो वर्षांची झेप घेतली. त्यांच्या अध:पाताला तो कारणीभूत होतो. त्या संपूर्ण सुखी पृथ्वीला त्याने संसर्गाने ग्रासून टाकले. ते खोटे बोलायला शिकले. लौकरच विषयवासना जन्मली. तिच्यातून मत्सर उगम पावला. त्यातून क्रौर्य उत्पन्न झाले. मग रक्तसिंचन झाले. मग पुढे धर्म निर्माण झाले. त्यांची स्वर्गतुल्य पृथ्वी त्यांनी भ्रष्ट केल्यानंतर पूर्वीपेक्षा त्याला अधिक आवडू लागली. कारण तेथे दु:ख आले. दु:ख व शोक त्याला आवडत असतात. त्याला जाग येते. त्याला टेबलावर रिवाॅल्वर दिसते. पटकन तो ते दूर लोटतो. तेव्हा त्याला जीवन हवे होते. त्याला जगायची इच्छा होती आणि सत्याबद्दल प्रवचन द्यायचे होते.तो प्रवचन देतो. ह्या पृथ्वीवर राहण्याची क्षमता न गमवता माणसे सुंदर आणि सुखी बनू शकतात. आपले जीवन म्हणजे स्वप्न. ते कधीही खरे होऊ नये. स्वर्ग कधीही निर्माण होऊ नये. स्वतःवर प्रेम करतोस तसे इतरांवर प्रेम कर हे जुने सत्य आहे. त्याचा वारंवार पुनरुच्चार झाला आहे व ते वाचले गेले आहे पण त्याने अजून मूळ धरलेले नाही. तो त्या छोट्या मुलीला शोधून काढतो आणि त्याच्या वाटेने जाईन असे ठरवतो. अशी ही कथा आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८