Sunday, September 14, 2025
Homeयशकथादेवेंद्र भुजबळ : एक कर्तृत्ववान मुसाफिर

देवेंद्र भुजबळ : एक कर्तृत्ववान मुसाफिर

मुंबई येथील सर्वद फाऊंडेशन, महाराष्ट्र ही समाजसेवी संस्था साहित्य, सामाजिक कार्य व उत्तम पत्रकारिता यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देत असते. यंदाचा हा सर्वद पुरस्कार मा देवेंद्रजी भुजबळ यांना १० फेब्रुवारी २०२४ अभय इंटरनॅशनल स्कूल विक्रोळी, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. या निमित्ताने आपण जाणून घेऊ या देवेंद्रजींचा प्रेरणादायी जीवन प्रवास….

श्री देवेंद्र भुजबळ हे मूळचे विदर्भातले ! त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण अकोल्याला झाले. ते चौथीत असतांनाच अचानक त्यांचे वडील वारले. कुटूंबाचा आधारच गेला, त्यामुळे आर्थिक स्थिती खूपच खराब झाली. अडचणींना सामना देत शिक्षण सुरू होते. एकीकडे काम करण्याची धडपड व अभ्यासही करायचा. त्यात विज्ञान आणि गणिताची नावड. यामुळे ते दहावीच्या परीक्षेत नापास झाले. दहावीत नापास झाल्याने सर्वांना तोंड दाखवायची त्यांना लाज वाटू लागली, म्हणून त्यांनी अकोला सोडले आणि पुण्याला मोठ्या भावाकडे गेले. स्वभाव खूप स्वाभिमानी ! कष्ट करण्याची मनाची पूर्ण तयारी ! मिळेल ते काम प्रसंगी अगदी वेटरचे सुद्धा काम त्यांनी केले. असे वर्ष गेले आणि त्या अनुभवांनी शिक्षणाचे महत्व पटले. दीड वर्षाने दहावीची सप्लीमेंटरी परीक्षा दिली. गोरे सरांनी विज्ञान, गणिताची तयारी करून घेतल्याने ते दहावी पास झाले. पुण्यात परत आल्यावर बी.कॉम ची पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यावर ते अहमदनगरला दुसऱ्या भावाकडे आले. येथेही काम मिळविण्याची त्यांची धडपड सुरूच होती. कारण स्वाभिमानी स्वभावामुळे भावाकडे पैसे मागणे त्यांना आवडत नसे. त्यांच्या मेहनती स्वभावामुळे नगर शहरातील स्वीट होम या मोठ्या आईस्क्रीम पार्लरचे मालक श्री छगनसेठ बोगावत ह्यांनी त्यांना पी.ए ची नोकरी दिली. तसेच त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे तेथील दै. समाचार मध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधीही मिळाली.

मग काय विद्यार्थी, पी. ए, पत्रकार अशा तिन्ही भूमिका ते करु लागले. कामाचा अजिबात कंटाळा नाही हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, आजही कायम आहे. नुकतेच त्यांचे एक मोठे ऑपरेशन झाले आहे, तरीही कामाचा झपाटा तरुणांना लाजविणारा आहे. देवेंद्रजींचे आईवडील खूप धार्मिक, श्रद्धाळू वृत्तीचे होते. परंतु लहान वयात ज्या विपदांना तोंड द्यावे लागले त्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला. ते नास्तिक झाले. पुढे नगर कॉलेज मधून बी. कॉम झाल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठात पत्रकारितेचे रितसर शिक्षण घेतले. तिथे प्रा. ल. ना. गोखले ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिलेच विद्यार्थी ! हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ दैनिक केसरीत उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर साप्ताहिक सह्याद्रीचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. पुढे मुंबई दूरदर्शन केंद्रात निवड होऊन ते १ मार्च १९८६ रोजी सहायक निर्माता म्हणून रुजू झाले. तिथे विविध कार्यक्रम त्यांनी केले.

देवेंद्रजीना राष्ट्रीय प्रसारणासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहितीपट बनविण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी अक्षरशः सोने केले असे म्हटल्यास चूक होणार नाही कारण या माहितीपटामुळे देवेंद्रजीचे कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरातून त्यांचे कौतुक झाले. दूरदर्शन मध्ये असतानाच अलकाताईंशी त्यांचे लग्न झाले. त्यावेळी अलकाताई मुंबईलाच महानगर टेलीफोन निगम मध्ये नोकरीला होत्या. देवेंद्रजी दूरदर्शनच्या आहे त्या नोकरीवर समाधानी न राहता, नोकरी करीत, डोंबिवली ते वरळी असा रोजचा भयानक प्रवास करत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत राहिले. त्यांची चिकाटी, जिद्द यामुळे त्यांची १९९१ मध्ये वृत्तपत्र व संज्ञापन अधिव्याख्याता (शिवाजी विद्यापीठ) यूपीएससी मार्फत आकाशवाणी व दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी (३ पदे), सिनियर ग्रेड – भारतीय माहिती सेवा अशा ५ पदांवर त्यांची निवड झाली. त्यापैकी दूरदर्शनमध्येच असल्याने तिथेच ते कार्यक्रम अधिकारी या पदावर रुजू झाले. पण काही महिन्यातच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग – १ या पदासाठी निवड झाली.

खरं म्हणजे त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव टिव्ही वाहिनी होती. प्रचंड ग्लॅमर होते. पण त्या मोहजालात न फसता, सारासार विचार करून ते अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले. येथे एक गोष्ट मला सांगितलीच पाहिजे ती म्हणजे, या पदावर रुजू होण्यापूर्वी ते आईचा आशीर्वाद घेण्यासाठी नगरला गेले तेंव्हा साहजिकच आईला खूप आनंद झाला. पितृछत्र हरविल्यावर, आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असतांना स्वाभिमान न सोडता तिच्या लेकराने विविध क्षेत्रात घेतलेली गरूडझेप पाहून ती माऊली अतिशय सुखावली. पण त्याला निरोप देत असताना तिने आपल्या मुलाला जी शिकवण दिली ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणाली बाळा, पुढील प्रगतीसाठी माझे तुला खूप आशीर्वाद आहेतच पण त्याबरोबरच एक गोष्ट कधी विसरू नकोस, नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वाग, माणुसकी सोडू नकोस ! तुझ्या वागण्याची सगळे आठवण ठेवतील असे वाग ! कुणाला दुखवू नको ! आणि देवेंद्रजीचे आजचे वागणे अजूनही तसेच आहे. पदाचा अभिमान त्यांनी कधीच बाळगला नाही.

माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, संचालक अशा विविध पदांवर त्यांनी सतत लोकाभिमुख राहून काम केले. अनेक मान सन्मान, लोकांचे प्रेम मिळविले. दूरदर्शन च्या सेवेत असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवी परीक्षेत ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले. तसेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली, यशदा, पुणे या संस्थांचे देखील अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. देवेंद्रजीनी सेवेतून निवृत्त झाल्यावर आरामाचे जीवन न जगता विविध माध्यमातून लोकसेवा सुरूच ठेवली आहे. त्यापैकी एक प्रमुख उपक्रम म्हणजे ‘न्युज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल हे होय.

कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना दिलासा मिळावा म्हणून इंग्रजी पत्रकार असलेली कन्या देवश्री ने हे पोर्टल सुरू केले. त्याचे कामकाज आई, वडील यांना शिकविले. येथे देवेंद्रजींच्या कामाचा, स्वभावाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टल साठी मी जे साहित्य पाठविले ते त्यांनी ताबडतोब प्रकाशित केले. वास्तविक मी एक सामान्य स्त्री ! मोठ्या स्तरावर कुठेही माझी ओळख नाही. तरीही त्यांनी माझ्या लिखाणाची दखल घेतली. यासाठी मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन. मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर आज देवेंद्रजी ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टलचे यशस्वी संपादक आहेत. तर अलकाताई वेबपोर्टल ची निर्मिती आणि तांत्रिक कामकाज बघतात. हे आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टल आज ९० देशात पोहचले असून पाच लाखाहून अधिक ह्याचे व्ह्यूज आहेत.

मराठी भाषा, बातम्या, लेख, साहित्य संस्कृती, पर्यटन, कला, आरोग्य, विकास, यशकथा अशा अनेक क्षेत्राचे जतन व संवर्धन व्हावे ह्यासाठी हे पोर्टल कार्य करते. यात प्रसिद्ध झालेल्या विविध विषयांवरील जीवनप्रवास, समाजभूषण, मी पोलीस अधिकारी (न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन) या लेखमाला पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. या बरोबरच या वर्षात न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनने चंद्रकला ( कादंबरी), पौर्णिमानंद (कविता संग्रह) हुंदके सामाजिक वेदनेचे (वैचारिक लेख संग्रह) अंधारयात्रीचे स्वप्न (चरित्र), अजिंक्यवीर (चरित्र) ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

या पोर्टलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील लेखक, कवी व संबंधितांचे स्नेहमिलन घेतले जाते. अतिशय साधासुधा, अनौपचारिक असा हा कार्यक्रम एखाद्याच्या घरी घेतला जातो. तिथे अध्यक्ष, मुख्य अतिथी, सूत्रसंचालक किंवा हारतुरे नसतात. ओळखी पालखी होतात. मनमुराद गप्पागोष्टी होतात. हास्याची कारंजी मन प्रसन्न करतात. हा अनोखा कार्यक्रम आतापर्यंत संगमनेर, नाशिक, मुंबई, विरार, पुणे, नवी मुंबई, सातारा, ठाणे इथे झालेला आहे. आश्चर्य वाटेल पण अमेरिकेत न्यु जर्सी इथे सुद्धा हा कार्यक्रम घेतला गेला. अनेक लिहित्या हातांना या वेबपोर्टल मुळे प्रसिद्धी मिळाली आहे. देवेंद्रजीनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून अतिशय विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडल्याने ते सतत सक्रिय राहिले.

दूरदर्शनवर गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाचे चार वर्षे (२०० भाग) रिसर्च अँड रिसोर्स पर्सन व आकाशवाणीवरील “दिलखुलास” या कार्यक्रमाच्या पहिल्या पाचशे भागांचे टीमलीडर म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबपोर्टल साठी “करियरनामा” हे सदर त्यांनीच सुरू केले. या सदरात त्यांनी २५० सरकारी अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांची माहिती दिली. विविध वृत्तपत्रात हे सदर प्रसिध्द होत असे. पुढे या लेखांचे संकलन होऊन “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तकही प्रकाशित झाले. याशिवाय भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, प्रेरणेचे प्रवासी, समाजभूषण ही त्यांची यशकथांची ४ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता जिद्द, चिकाटीमुळे आपण आपली प्रगती कशी करू शकतो, याचे सुंदर चित्रण या पुस्तकांतून केले आहे. थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित “अभिमानाची लेणी” हे त्यांचे ई पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने कोरोना काळात प्रसिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात, त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावरील व्याख्यान खूप गाजले. पुढे याच व्याख्यानावर आधारित त्यांचे मराठी – इंग्रजी पुस्तक देखील खूप गाजले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. त्यांचा “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा वैचारिक संशोधनपर लेख अनेक भाषांत प्रसिद्ध झाला आहे.

देवेंद्रजींना फिरण्याची खुप आवड आहे. ते भारतात अनेक ठिकाणी फिरले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मलेशिया, थायलंड, चीन, रशिया, जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया, दुबई, नेपाळ, नेदरलांड्स, फ्रान्स, इटली, स्वित्झरलांड्स, जर्मनी, व्हिएतनाम, कंबोडिया इत्यादी देश फिरून आले आहेत. आणखी काही देशात फिरण्याचा त्यांचा इरादा आहे.

सर्व माध्यमात सक्रिय असणारे देवेंद्रजी दुर्बल घटकासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांमध्येही काम करतात. देवेंद्रजींना मिळालेल्या मानसन्मानाची यादी बरीच मोठी आहे. गेल्यावर्षी ६ जानेवारी या पत्रकार दिनी विकास पत्रकारितेतील कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेच्या हस्ते, “अप्रतिम मीडिया” तर्फे चौथा स्तंभ पुरस्कार, एकता सांस्कृतिक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तर ८ जानेवारीला त्यांच्या पत्नी, न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टलच्या निर्मात्या सौ अलकाताई भुजबळ यांना माळी समाज मंडळ, ठाणे या संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार, नाशिक येथे माणुसकी सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. हा दुग्ध शर्करा योग दोघांच्या कष्टाचे प्रामाणिक मेहनतीचे व कामाच्या जिद्दीने अथक परिश्रमाचे गोड फळ आहे. एकाच आठवड्यात तीन तीन मानाचे पुरस्कार मिळविणाऱ्या या आनंदी , कष्टाळू जोडप्याचे कौतुक तरी किती करावे ? देवेन्द्र जी बद्दल माहिती मिळवितांना नवीन नवीन माहिती मिळतच राहिली. कुठे थांबावे हे मलाच समजेनासे झाले आहे, इतके उतुंग व्यक्तिमत्व असणारे देवेंद्रजी आहेत.

आपल्या नेहमीच्या परिचयाचे वाक्य असे की, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते. पण भुजबळ कुटूंबासाठी हे वाक्य पुरेसे नाही. कारण अलकाताई देवेंद्रजीच्या मागे नाही तर बरोबरीने उभ्या राहिल्या. संसार तर यशस्वी केलाच पण सार्वजनिक क्षेत्रातही समाजासाठी दोघांनीही जे योगदान दिले ते शब्दातीत आहे. अलकाताईं कॅन्सर वर मात करून जिद्दीने उभ्या राहिल्या आहेत. या अनुभवावर आधारीत त्यांनी “कॉमा” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर आधारीत माहितीपट तयार करण्यात आला असून तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्याहस्ते त्याचे राजभवनात विमोचन झाले आहे. देवेंद्रजी रितसर निवृत्त झाले. तर अलकाताईंनी चार वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली. दोघेही नोकरीतून निवृत्त झाले असले तरी सेवेतून मात्र निवृत्त न होता, निष्क्रिय न होता उलट विविध प्रकारे सक्रिय राहून, होईल तेव्हढे समाज कार्य करीत आहे, ही खरंच आपण आदर्श घ्यावा, अशी बाब आहे. माझ्या प्रत्येक लेखनाला त्यांनी न्यूज स्टोरी मध्ये स्थान दिले ! त्यांचा जीवनप्रवास असाच पुढेही प्रगतीकडे वाटचाल करीत राहीन यात संशय नाही.

नवीन वर्षात इतक्या यशस्वी व्यक्तिमत्वाबद्दल मला जे सुचले ते लिहिण्याची मला संधी मिळाली हे माझें भाग्य ! माझा प्रयत्न त्यांना व वाचकांनाही आवडावा ही प्रार्थना. कारण देवेंद्रजी बद्दल लिहिणे वाटते तितके सोपे नव्हते पण हे देवेंद्र धनुष्य उचलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती.

— संपादन : देवेंद्र भुजबळ ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. आपण सर्वांनी जी भरभरून दाद दिली,त्याबद्दल आपला तसेच माझा जीवन प्रवास सुंदर रेखाटल्याबद्दल
    सौ प्रतिभा पिटके मॅडम यांचा मनःपुर्वक आभारी आहे.आपला लोभ असाच कायम असू द्या.

  2. देवेंद्र जी च्या बहुपैलू जीवनाची मीहिती आश्चर्यचकित करणारी आहे. प्रतिभा ताईच्या लेखातून झालेले ओझरते दर्शन इतके उत्कंठा वाढविणारे आहे की मूळ आत्मचरित्र वाचायलाच हवे असे वाटते.

  3. देवेंद्रजी हे मंत्रालयातील माझे एक सहकारी. त्यांचा माझा फार जुना परिचय आहे माझ्या पुस्तक प्रकाशनालाही ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते, मात्र पिटके मॅडमनी त्यांच्या बद्दल जे लिखाण केले आहे ते वाचून त्यांचा जीवनपट उलगडला.
    त्यांच्या जीवनशैलीला आणि कर्तुत्वाला आमचा सलाम.

  4. श्री देवेंद्रजी सादर प्रणाम
    आपला आजवरचा संघर्षमयपण सुयश प्राप्त जीवन प्रवास कळला. तेव्हा आपणास शत शत नमन.
    पुढेही सत्कार्यासदेवबळ प्राप्त होवो हीच इच्छा
    पिटकेताईंना या लेखासाठी अनेक धन्यवाद
    विजया केळकर_______
    नागपूर

  5. देवेंद्र भुजबळ हे पत्रकारितेतील आदर्श. सर्वसामान्य लेखक आणि संस्थांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या पोर्टलची नोंद चांगल्या पध्दतीने घेतली आहे.

  6. श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब, आपले मनापासून अभिनंदन करतो तसेच पुढील कार्यास व सुखी , समृद्ध जीवनास खुप खुप शुभेच्छा !!!

    आणि आपला हा प्रवास शब्दबद्ध केल्याबद्दल प्रतिभाताई पिटके यांना अनेकवार धन्यवाद..!!
    डॉ जयाजी के नाथ, मा. नगरसेवक ,नवी मुंबई

  7. प्रतिभाताई पिटके यांनी मान.देवेंद्रजी व मान.अलकाताई
    यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिलेला सुंदर लेख मनाला खूपच भावला
    प्रतिभाताईंच्या लेखणीला सलाम 🙏
    मान.देवेंद्रजी व मान.अलकाताई आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  8. देवेंद्र जी मनापासून अभिनंदन व शुभेच्छा

    दिलीप खन्ना
    मुंबई

  9. प्रतिभाताईंनी अगदी लीलया
    देवेंद्र धनुष्य उचलले
    वाचून मन अगदी आनंदून गेले
    देवेंद्रजी आणि अलकाताईंच्या
    महान कर्त्रुत्वाने मन थक्क झाले
    प्रतिभाताई पिटके यांच्या सुंदर लेखणीने
    लाखो वाचकांना हे प्रेरणादायी सूर्यफूल दिले
    आदरणीय देवेंद्रजी व अलकाताईंना
    अर्पितो हार्दिक अभिनंदनाची काव्यफुले
    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏

  10. आदरणीय स्वाभिमानी पत्रकार जिद्दी अशा देवेंद्रजी भुजबळ सरांना मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!

    💐💐

    शुभेच्छूक गोविंद पाटील
    जळगाव जिल्हा जळगाव.

  11. देवेंद्रजी , आपले मनापासून अभिनंदन !!
    आणि आपला हा प्रवास शब्दबद्ध केल्याबद्दल प्रतिभाताई पिटके यांना अनेकवार धन्यवाद..!!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा