मिशन आयएएस चे संस्थापक संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान ह्या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचन सुलभतेसाठी पुढे देत आहे. प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे आणि दैनिक हिंदुस्थान या दोघांचेही न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक आभार.
– संपादक
माझी नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये आठ नऊ वर्षांपूर्वी लेखमाला सुरू होती. विषय होता, “स्पर्धा परीक्षा सक्सेस मंत्रा” हा लेख वाचून मला अनेकांचे फोन येत होते.
असाच एक फोन आला तो सरळ मंत्रालयातून. तो फोन होता श्री देवेंद्र भुजबळ यांचा. तेव्हा ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. सर्वप्रथम त्यांनी माझे अभिनंदन केले. त्यांना माझी लेखमाला आवडली होती. त्यांनी मला ‘लोकराज्य महान्यूज’ साठी लिहिण्याची विनंती केली.
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून फोन येतो. एक अधिकारी मला शासनाच्या नियतकालिकांमध्ये लिहिण्याची विनंती करतो,
ही गोष्ट मला अभूतपूर्व अशी वाटली. मंत्रालयातील एखाद्या अधिकाऱ्याने नागपूरचा पेपर वाचणे व मला फोन करणे म्हणजे नवलच. देवेंद्र भुजबळ साहेबांचा परिचय झाला तो असा.
असे कितीतरी लोक भुजबळ साहेबांनी आपल्या कार्यकाळात जोडलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हा माणूस लोकाभिमुख आहे. आमची मैत्री अजून घट्ट होत गेली. एक दिवस भुजबळ साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, दूरदर्शन वरील
महाराष्ट्र शासनाच्या “जय महाराष्ट्र” या लोकप्रिय कार्यक्रमासाठी तुमची मुलाखत आम्हाला हवी आहे. मला धक्काच बसला. जय महाराष्ट्र म्हणजे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील व देशातील दिग्गज लोकांच्या मुलाखती जय महाराष्ट्र मधून प्रसारित झालेल्या. त्यामुळे मला तो माझा बहुमान वाटला. मी लगेच त्यांना होकार दिला. भुजबळ साहेब पुढे म्हणाले, आम्हाला आकाशवाणीवरील दिलखुलास या कार्यक्रमासाठी देखील तुमची मुलाखत पाहिजे आहे.
ठरल्याप्रमाणे, ठरलेल्या दिवशी मी मुंबई गाठली. मंत्रालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नसतो.
मी मंत्रालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर श्री देवेंद्र भुजबळ यांना फोन केला. त्यांनी लगेच मला घ्यायला गाडी पाठवली. मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क कार्यालयात त्यांची व माझी अशा प्रकारे पहिली भेट झाली. ही पहिलीच भेट लवकरच घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली आहे.
चहापान झाल्यानंतर देवेंद्र भुजबळ साहेबांनी त्यांच्या सहकार्यांना बोलावून मला आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये नेण्यासाठी सूचना केली. त्या दिवशी दिवसभर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या स्टुडीओमधून माझ्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण झाले.
माझ्यासाठी हे सर्व नवीन होते. दूरदर्शनवरून माझी पहिली मुलाखत ध्वनिमुद्रित होत होती. आकाशवाणीवरील ही माझी मुलाखत सतत तीन दिवसासाठी ध्वनिमुद्रित करण्यात आली होती. कार्यक्रम संपला. अल्पोपहार चहापाणी झाले आणि देवेंद्र भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांनी मला सीएसटी रेल्वे स्टेशनवर शासकीय वाहनाने सोडून दिले. मला तो आश्चर्याचा धक्का होता. मला मुंबईला बोलावण्यात येते, माझ्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात येते, कार्यक्रम झाल्यावर शासकीय वाहनाने मला रेल्वे स्टेशन पर्यंत पोहचून देण्यात येते यावरून मी देवेंद्र भुजबळ साहेबांचे मूल्यांकन केले. हा माणूस माणुसकीला जपणारा आहे. संबंध वाढत गेले.
नवी मुंबईचे नगरसेवक श्री संजूभाऊ आधारवाडे यांनी मिशन IAS ची माहिती देण्या बाबत उपक्रमाचा पुढाकार घेतला होता. त्या नुसार साधारणपणे 18 हजार विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. हा उपक्रम राबवण्यासाठी श्री देवेंद्र भुजबळ साहेबांचे भरपूर सहकार्य लाभले. मला ते सतत प्रोत्साहन देत राहिले. मी आयुष्यात त्यांना कधीही विसरू शकणार नाही. कारण माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी मला दूरदर्शनवरून जय महाराष्ट्र सारख्या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी निमंत्रित करून माझा बहुमान वाढविला होता. माझी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील मुलाखत पाहून मला दोन हजारच्या वर फोन त्या वेळेस आले.
2015 सालची गोष्ट. श्री देवेंद्र भुजबळ यांनी मला जी दूरदर्शन व आकाशवाणी वर संधी दिली त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात पोहोचू शकलो. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव व आदर्श ठेवून त्यांना मिशन IAS च्या राज्य समन्वयक या पदावर नेमणूक करण्याचे ठरविले. आम्ही हा प्रस्ताव माननीय श्री भुजबळ साहेबांना समोर ठेवला आणि त्यांनी तो स्वीकारला शासकीय सेवेत असताना अनेक लोकांना जोडणारा हा माणूस मिशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी Mission IAS चा गौरव वाढविलेला आहे.
आमचे मिशन अमरावती पुरते महाराष्ट्रापुरते मर्यादित होते. त्या मिशनला त्यांनी पूर्ण भारतभर पसरवण्याचा प्रयत्न चालविलेले आहेत. सातत्याने लेखन करणे, सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणे, स्वतःहून फोन करणे, आलेला प्रत्येक फोन उचलणे, त्याच्याशी प्रेमाने बोलणे, त्याच्या या अडचणीवर उपाय शोधणे हे काम त्यांच्या रक्तात भिनले आहे. असा हा खऱ्या अर्थाने देवाचा इंद्र असलेला देवेंद्र आणि बाहू मध्ये बळ असलेला भुजबळ हे दोन्ही शब्द त्यांनी आपल्या आचरणाने कर्तुत्वाने व दिलखुलास वृत्तीने खरे करून दाखविले आहेत.
अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, समाजसेवेची आवड असणाऱ्या “मिशन आयएएस” चे कार्य दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचवीणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे आभार मानतो.
— लेखन : प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालक Mission IAS अमरावती कॅम्प महाराष्ट्र
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
देवेंद्र भुजबळ हे जसे उत्तम अधिकारी तसेच उत्तुंग असे लेखक व निर्माते आहेत नोकरीतील प्रत्येक पावलावर आपले लेखन साहित्य संपन्न गुण आणि नवीन संकल्पित निर्मिती जगासमोर आणली आहे त्यांचे लेखन कार्याला निर्मितीला आमचा सलाम आहे
विजय लोखंडे विभागीय अधिकारी सो म पा
Excellent article about Devendraji. I also know him as best journalist and best friend of mine.