“संवाद -हदयाशी”
‘संवाद -हदयाशी’ हा काव्यसंग्रह माणसांच्या मनाशी संवाद साधणारा आहे. माणसांच्या मनातील भावनिकता ओळखणारा आहे. हा कवयित्री अनिसा शेख यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.
काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार अरविंद शेलार यांनी सुंदर बनविले आहे. शिर्षकाला समर्पक असे रेखीव चित्र दिले आहे. ते बघताक्षणी वाचक पुस्तकाच्या मोहात अडकतो.
या काव्य संग्रहास ए.के शेख यांची बोलकी प्रस्तावना लाभली आहे. ती जणू या सर्व काव्यांचा गाभा आपल्या समोर ठेवते. त्या काव्यांची आकर्षकता वाचकास आकर्षूण घेते. एवढेच नाही तर मलपृष्ठावर डॉ. अक्रम ह.पठाण यांनी कवयित्रीचा दिलेला परिचय त्यांच्या वैचारिक लेखनाची उंची सांगून लेखन कौशल्याचा व्यासंग अनुभव सांगून जाते.
कवयित्री अनिसा सिकंदर शेख या पेशाने शिक्षिका आहेत. तसेच त्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र या संस्थेवर सहसचिव म्हणून काम पाहतात.तर स्पंदन या त्रैमासिकाच्या उपसंपादक आहेत. त्यांच्यावर उर्दू आणि हिंदी भाषेचा प्रभाव आहे. पण शुद्ध मराठी भाषेतून त्यांनी काव्य लेखन केले ही त्यांची विशेषतः त्यातून दिसून येते.
समाजातील उणिवा, समस्या त्यांनी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत. म्हणून त्यांचे काव्य मानवतेचे दर्शन करुन देते. काव्यातून वास्तवता दिसून येते. तद्वतच प्रत्येक काव्य समता, बंधुता, मैत्रीचा संदेश देते. अधूनमधून त्या अंधश्रध्देवर प्रहारही करतात.पण त्या बरोबर श्रद्धा जपतात.
आपल्या पहिल्याच ‘हमद्’ कवितेत त्या म्हणतात,
“तुच देतो दुःख
अन् देतो सुखही
घेते रोज पाच वेळ
नाव तुझे
“सजीव असो वा निर्जीव भूतलावर
जगी सर्व चराचरात
नाव तुझे”
या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता आहेत. त्यामध्ये समाजातील सर्वच विषयाला हात घातला आहे. बाल वाचकांपासून ते प्रौढांपर्यंत काव्यांची रसभरीत मनोरंजनाची मेजवानीच आहे.
‘संसार सुखाचा’ या कवितेत कवयित्री म्हणते..
“पती आणि पत्नी
संसाराचे चाक
एकमेकां असे
आदराचे धाक”
सुखी जीवनासाठी खुप मोलाचा संदेश या ओळीतून त्या देतात. कुटुंबात जीवन जगताना एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. चुका ह्या होतच असतात. एकमेकांचा आदर केला तर सर्व काही क्षम्य होत.कारण ही संसाराची दोन्ही चाक बरोबरीने चालायला हवीत.तरच ती यशापर्यंत पोहोचतील.
कवयित्री देशाभिमानी आहेत.राष्ट्रीय कार्यात त्यांचे वैचारिक भरपूर योगदान आहे. आपल्या ‘स्वातंत्र्य दिन’ या काव्यात त्या म्हणतात…
“आम्ही आहोत भारतीय
आम्हा त्याचा अभिमान
दिली प्राणांची आहूती
कार्य वीरांचे महान”
असे म्हणतात की “जेथें पोहचे ना रवी तेथे पोहचे कवी” या उक्तीप्रमाणे कवयित्री अनिसा शेख यांनी सर्व समावेशक तळागाळातील विषयाला हात घातला आहे.
मराठी भाषेविषयी त्यांना खुप आवड आहे. जणू मराठी भाषेचा खजिना त्यांनी जपला आहे. मराठी चा अभिमान जपत त्यांनी काव्यांचे सर्व प्रकार हाताळले आहेत. बालगीत, अभंग, गझल, पोवाडा, भावगीत, लावणी, आणि गीत इत्यादी.
मराठी बद्दल महानता सांगताना ‘माझी माय मराठी’ या कवितेत त्या म्हणतात..
“माझी माय गं मराठी
जन्मतः कानी बोल
बोलण्यात गं मधुर
शब्द संपत्तीने खोल”
कवयित्रीने भारतीय संस्कृती जपली आहे. आणि म्हणून सण, उत्सव, निसर्ग, समाजसुधारक, विचारवंत, मानवतेशी संबंधीत विशेषतः स्त्री जीवनावर लिहून स्त्री सबलीकरणास चालना दिली.याचा प्रत्यय माई फतिमा,नारी शक्ती, अभिव्यक्ती स्त्री मनाची,स्वयंसिद्धा, सबल करुया लेकीला, आई कुठे काय करते आणि समईची वात यातून वाचकांस येतो. तर महात्मा जोतिबा फुले, ईस्लाम धर्माची शिकवण,शेतकरी माझा बाप ,बाप ह्या कविता मनाला आत्मिक समाधान देतात.
शिक्षणाचे महत्त्व सांगताना ‘महात्मा जोतिबा फुले’या काव्यात त्या म्हणतात..
“कष्टून जोतिबा साऊने
खुले केले ज्ञानाचे दार
बनले शिक्षणाचे दीपस्तंभ
दिला साक्षरतेचा अधिकार
अनिसा शेख या जागृत कवयित्री आहेत. समाजातील प्रत्येक घटकांकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे.
‘आम्हाला ही जगू द्या’ या काव्याने तृतीयपंथीच्या जीवनातील वेगळेपणच त्यांनी मांडले.आणि तृतीयपंथीना न्याय दिला. हे एक उल्लेखनीय नोंद त्यांच्या नावावर जाते.
“काय !
मी तृतीयपंथी
किन्नर, हिजडा, छक्का, बायल्या
नाही ?
हे नाव आम्हाला समाजाने दिले”
त्यांच्या काव्यांचा क्रम हा चढता राहिला आहे. एकापेक्षा एक असा सरस हा काव्यबहार आहे. एकदा हातात घेतला तर वाचक संपूर्ण वाचल्या शिवाय सोडत नाही.
नवपिढीसाठी वाचकांसाठी “धुंद झाली आज प्रित, प्रेमा तुझा रंग कसा, तुझे रुपाच चांदणं, रुप तुझे गुलजार, तुझ्या ओठांच्या स्पर्शाने” ही वाचकांना मेजवानीच आहे. तर वंचित पिडीतांच्या वेध घेणाऱ्या कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यामध्ये संघर्ष, व्यथा कामगारांच्या, तप्त उन्हाच्या झळा, आम्हाला ही जगू द्या, जागतिकीकरण, जेव्हा जात आडवी येते हे काव्य नक्कीच वाचकांना विचार करायला लावते.
कवयित्री अनिसा शेख यांची प्रत्येक कविता मानवतेचा कल्याणकारी संदेश देवून जाते. त्यामध्ये काही गेय काव्य आहे. एकंदर हा काव्यसंग्रह वाचकांना सोप्या आणि सुलभ भाषेत मनोरंजन करुन समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या राष्ट्रीय मूल्ये शिकवण देणारा आहे.
वाचक मंडळीच्या मनावर मनोराज्य करणारा हा काव्य संग्रह आहे. कवयित्री अनिसा शेख यांच्या काव्याचे वाचक स्वागतच करतील, ही आशा. मी त्यांचेअभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
— परीक्षण : बाबुराव पाईकराव. डोंगरकडा, जि.हिंगोली
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर समिक्षण. कवयित्री अनिसा शेख आणि समिक्षक श्री पाईकराव यांचे हार्दिक अभिनंदन. काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा.
दखलपात्र समिक्षा .
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !