Saturday, April 13, 2024
Homeलेखमतदान : ४ चुटकुले

मतदान : ४ चुटकुले

देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विविध पक्षांचे उमेदवार, जाहीरनामे जाहीर होण्याच्या बेतात आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्वाची बाब म्हणजे अधिकाधिक संख्येने मतदान करणे ही होय. वाचू या मतदाना विषयीचे ४ चुटकुले
– संपादक

१) मतदान आणि सुट्टी :

“बाबा, आज मतदान आहे.” चहा घेताना पिंट्या म्हणाला.
“होय ! माहिती आहे. आज- आता मतदानाला जाणार आहे. अरे, तुम्ही मतदान करणार आहात ना ?”
“बघूया. जमले तर दुपारी येऊ.”
“जमले तर म्हणजे ? आज सुट्टी नाही ? काल तर टीव्हीवर सुट्टी आहे म्हणून बातमी होती.”
“हो. पण सायंकाळी सुट्टी रद्द झाल्याची सूचना आली.”
“हा अन्याय आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मतदानासारख्या पवित्र आणि हक्काच्या कामासाठी सुट्टी देत नाहीत म्हणजे काय ?”
“बाबा, व्यवस्थापनाचेही बरोबर आहे. बहुतांश लोक मतदानाच्या दिवशी मतदान न करता, हक्काची सुट्टी असल्याप्रमाणे कुटुंबासह कुठे तरी फिरायला जातात.”
“हेही चूक आहे. सुट्टी तर मिळालीच पाहिजे आणि त्याच बरोबरीने राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे म्हणजे मतदान केले पाहिजे. यासाठी एक उपाय करायला पाहिजे तो म्हणजे मतदान केले असल्याची खूण बोटावरची शाई दाखवा तरच सुट्टी मान्य होईल अन्यथा त्या दिवसाचा पगार कपात करावा.”
“बरोबर आहे, तुमचे. शेवटी दोन तासांची सुट्टी मिळाली आहे.”
“चला. दोन तास तर दोन तास ! भागते की लंगोटी सही ! पण तुम्ही मात्र मतदान करण्याची सुवर्ण संधी गमावू नका बरे.”
“नाही. बाबा, करतो आम्ही मतदान.” पिंट्या म्हणाला आणि ते दोघे पती-पत्नी निघाले.

२) दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान :

मतदान करून बाहेर आलेल्या दादासाहेबांच्या जवळ वाहिनीचा एक प्रतिनिधी आला. त्याने विचारले, “काका, मतदान केले का ?” तर्जनी दाखवत दादासाहेब म्हणाले,
“तर मग, सोडतो की काय ? बरे, एक विचारतो, तुम्ही मतदान केले का ?”
“नाही हो, काका.”
“का ? तुमचे वय तर वीसपेक्षा अधिक दिसतेय. दूरच्या किंवा गावाकडे मतदान आहे का ?”
“नाही हो. कुठेच मतदान यादीत नाव नाही. काय करणार, ही आमची नोकरी म्हणजे ना, धामधूम असते. नोंदवू नोंदवू म्हणता नाव नोंदवायचे राहून गेले.”
“व्वा ! नोकरी ही पळवाट झाली. तुमचे नाव मतदार यादीत नाही. तरीही तुम्ही मतदान करण्याचे आवाहन करता ? मतदान केलेल्यांच्या मुलाखती घेता. खरे तर तुम्हाला तो अधिकार नाही. ‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण !’ अशी तुमची अवस्था…” दादासाहेब तावातावाने बोलत असताना बाजूने जाणाऱ्या बँडपथकाने त्यांचे लक्ष वेधले. पन्नास-साठ स्त्री-पुरुषांचा एक जत्था घोषणा देत मतदान केंद्राच्या दिशेने येत होता.
“हा कशाचा मोर्चा म्हणावा ? यांची नावे मतदान यादीतून वगळलीत की काय ?” दादा त्या मुलाला विचारत असताना त्यांचे लक्ष तो जत्था देत असलेल्या घोषणांनी वेधले…
‘चला हो चला… मतदानाला चला…’
‘आम्ही चाललो मतदानाला… तुम्हीही चला…’
त्या मिरवणुकीच्या समोर त्यांच्या वसाहतीच्या नावाचा फलक होता. एकाच वसाहतीतील सारे मतदार एकत्रितपणे वाजतगाजत मतदान करण्यासाठी निघाले होते. जाताना रस्त्यात भेटणाऱ्या व्यक्तिंना, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरातील लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत होते.
‘व्वा ! हे असे जिवंत, अनुकरणीय उदाहरण असावे. मतदानाचा दिवस हा इतर सणांप्रमाणे राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा. मतदारांनी घरापुढे रांगोळ्या काढून गुढ्या उभारल्या पाहिजेत. तरच मतदानाचा टक्का वाढेल. चला. मतदान केले. एक राष्ट्रीय कर्तव्य पार पडले…’ असे पुटपुटत आणि तर्जनीवरील शाईकडे अभिमानाने बघत दादासाहेब तिथून निघाले.

३) कावळा अरे,‌ काव काव :

मतदान केंद्राच्या बाहेर येताच दादांना समोरच एक मोठ्ठे हॉटेल दिसले. पोटात दडून बसलेल्या कावळ्यांनी एकदम कावकाव सुरू केली. दादासाहेबांना वाटले, ‘पोटातले कावळे एक मिनिटाचा उशीर सहन करत नाहीत आणि तिकडे गंगेवर असलेले कावळे तासनतास पिंडाला शिवत नाहीत.’
मतदान केल्यानंतर एका सामाजिक संस्थेने दिलेल्या कुपनची दादांना आठवण झाली आणि ते हॉटेलमध्ये शिरले. हॉटेल नुकतेच उघडले होते त्यामुळे धूप, उदबत्ती यांचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. अगोदरच प्रसन्न असलेले दादासाहेब त्या सुवासाने अधिकच प्रसन्न झाले.
“या. काका, या…” हॉटेलच्या व्यवस्थापकाने त्यांचे आदराने स्वागत केले. तो दादांना खुर्चीपर्यंत घेऊन गेला. एक खुर्ची थोडी मागे ओढून दादासाहेबांना विनयाने बसण्याची विनंती केली. दादा स्थानापन्न होताच दुसऱ्या एका पोऱ्याने मेनूकार्ड त्यांच्यासमोर ठेवले. त्यावरील खाद्यपदार्थांची यादी पाहत वेटरची फिरकी घ्यावी या हेतूने त्यांनी विचारले,
“यह सब पदार्थ तैयार है ना ?”
“जी सर ! आप जो चाहे, माँग लीजिए। मै कुछ ही मिनिटों मे पेश करूंगा।”
“तुला मराठी येते का ?” दादांनी विचारले.
“काका, मी महाराष्ट्रीयन आहे.”
“अरे, मग हिंदी का बोलतोस ? बरे, मी मतदान केले आहे. ही बघ शाई ! सारे पदार्थ फ्री आहेत ना ?”
“होय. एकदम फ्री आहेत.”
“असे असते बघ, आपल्या मराठी लोकांचे ! आपण आधी हिंदीतून बोलत होतो आणि आता इंग्रजी बोलतोय. ‘फुकटात’ हा शब्द वापरायची आपल्याला लाज वाटते. बरे, जा. नाष्ट्याचे जे जे पदार्थ तयार आहेत ते सारे एक-एक प्लेट आण.. अरे, असा पाहतोस काय ? मी बकासूर नाही. फुक्कट म्हटले की, आपण कसे तुटून पडतो याचा नमुना पेश केला. एक इडली, एक वडा आणि नंतर एक कडक, फक्कड कॉफी आण.”
“आणतो…” असे म्हणत तो वेटर हसत निघून गेला.

४) सर्व काही फुकटात :

दादासाहेब हॉटेलमधून बाहेर पडले. त्या संस्थेने दिलेले सारे कुपन्स काढून बघितले. पॅथॉलॉजीत जाऊन साऱ्या तपासण्या कराव्यात या हेतूने त्यांनी कुपनवरील पत्ता पाहताच त्यांच्या लक्षात आले की, तो दवाखाना अगदी जवळ आहे. एक वळण घेऊन दादासाहेब पॅथॉलॉजीत पोहोचले. तिथली स्वागतिका त्यांच्याकडे बघत असताना दादासाहेबांनी तिला करंगळी दाखवताच मनमोहक हसत तिने विचारले,
“काका, युरीन टेस्ट करायची आहे का ?”
“तसे सांगता येणार नाही. मी मतदान करून आलोय. आज तुमच्याकडे साऱ्या तपासण्या फुकटात आहेत ना ? विचार केला, वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत…”
“काका, मग शाई लावलेली तर्जनी दाखवा ना. करंगळी का दाखवता ? तुम्हाला कोणता आजार आहे का ? कशाची तपासणी करायची आहे ?”
“कशाची तपासणी करु या ? तुम्ही कशाची तपासणी करता ?”
“इथे सर्व आजाराच्या तपासण्या होतात. यापूर्वी तुम्ही कशाची तपासणी केली आहे का ?”
“नाही बुवा. मला कोणताही आजार नाही. साधे सर्दीचे जंतूही माझ्या अवतीभोवती पोहोचण्याचे धाडस करीत नाहीत…”
“व्वा ! ग्रेट ! अशी निरोगी व्यक्ती आजकाल सापडत नाही. ठीक आहे. आपण हा फॉर्म भरु. नंतर काही तपासण्या करुया…” म्हणत ती युवती एक-एक प्रश्न विचारत गेली. दादासाहेबांनी सांगितलेली माहिती फॉर्मवर भरत गेली. पंधरा-वीस मिनिटात वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या तपासण्या करून दादासाहेबांनी त्या मुलीला विचारले,
“एक सांगाल का, तपासण्या फुकटात झाल्या पण अहवाल खरेखुरे येतील ना ? एक शंका हो. कसे आहे, फुकटात काम करायचे तुमच्याही जीवावर येत असेल ना! दुसरे म्हणजे मोफत म्हटलं‌ की, आज गर्दी होणार तेव्हा रावसाहेबांचा अहवाल दादासाहेबांच्या नावावर तर टाकणार नाही ना ?”
“नाही हो. आम्ही तरी कुठं फुकटात करतो. तुमच्याकडून घेत नाही पण कुपन देणाऱ्या संस्थेकडून मिळतात ना पैसे आम्हाला.”
“अस्सं आहे का ? पण मग तेही कुणाकडून वसुल करीतच असतील की.”
“त्यांना सरकार देत असणार…”
“आणि सरकार निवडणूक झाली की, प्रत्येक गोष्टीची दरवाढ करून आमच्या खिशाला कातरी लावणार…. अजब आपले सरकार…” असे म्हणत दादासाहेब निघाले….

नागेश शेवाळकर

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments