अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेचा, गौरवशाली संस्कृती आणि जाज्वल्य इतिहासाचा आपणास सार्थ अभिमान आहे, असे उद्गार राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी नुकतेच काढले.
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांना भेटी देण्याचा मनोदय व्यक्त करून, शिवाजी महाराजांनी तंजावर पर्यंत आपले राज्य नेल्याचा उल्लेख करून राज्यपालांनी तंजावर येथील काही आठवणी ताज्या केल्या.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे आणि मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहाय्यक संचालक श्री जयू भाटकर यांनी नुकतीच राज्यपालांची मुंबई येथील राजभवनात भेट घेऊन त्यांना ग्रंथालीने डॉ रवींद्र शोभणे यांच्या समग्र साहित्यावर प्रकाशित केलेल्या ग्रंथाची प्रत भेट दिली. या निमित्ताने साधल्या गेलेल्या संवादात राज्यपालांनी त्यांचे हे मनोगत व्यक्त केले.
राज्य शासनाने डॉ रवींद्र शोभणे यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ शोभणे यांनी राज्यपालांना विश्वकोश मंडळाच्या कार्यपद्धतीची आणि आजपर्यंतच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा दिल्याबद्दल यावेळी डॉ रवींद्र शोभणे आणि जयू भाटकर दोघांनी आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले. तसेच मराठी भाषा अधिकाधिक समृध्द करण्यासाठी, तिचा विस्तार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
राज्यपालांनी निसर्गरम्य कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना भेट द्यावी असे अगत्याचे आमंत्रण यावेळी कोकण सुपुत्र जयू भाटकर यांनी राज्यपाल महोदयांना दिले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800