Friday, December 27, 2024
Homeलेखमाध्यम पन्नाशी : १

माध्यम पन्नाशी : १

नमस्कार मंडळी.
आपण आज पासून दर गुरूवारी “माध्यम पन्नाशी” ही आत्मचरित्रात्मक लेखमाला सुरू करीत आहोत. ही लेखमाला लिहिणार आहेत, गेली पन्नास वर्षे वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा विविध प्रसार माध्यमात सातत्याने सक्रिय असलेल्या माधुरी ताम्हणे.

विशेष म्हणजे माधुरी ताम्हणे यांनी वेश्या, तृतीयपंथीय व्यक्ती यांच्या विषयी अतिशय संवेदनशीलतेने, पोटतिडकिने विपुल लेखन केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीबद्दल त्यांना…
१) आय एल सी आय या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेतर्फे पत्रकारिता पुरस्कार (२०१४)
२) नवदुर्गा पुरस्कार: (२०१५) आनंद चॅरिटेबल ट्रस्ट
३) ज्येष्ठ रत्न पुरस्कार
४) “उगवते तारे” श्री ना ग गोरे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत.

माधुरी ताम्हणे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
‌ “नभ मेघांनी आक्रमिले
तारांगण सर्वही व्यापून गेले”
पावसाची संततधार सुरू आहे. पावसाळी मूड काव्यमय, तरल मनाची स्पंदन जागवत आहे. अशा उत्फुल्ल वातावरणात माननीय देवेंद्रजी भुजबळ यांच्याशी अनौपचारिक गप्पा रंगतात. उभयतांनी माध्यमांच्या जगांत आयुष्यातील उमेदीचा काळ व्यतीत केला असल्याने आणि या माध्यमांवर मनःपूर्वक प्रेम केलं असल्याने आपातता: माध्यमांच्या दुनियेतील आठवणींचा जागर मनात उमटतो आणि प्रस्ताव येतो “माध्यम पन्नाशीचा !

क्षणभर मन थरारून जातं. खरंच ! कोवळ्या, नवथर वयांत आकाशवाणीच्या जादुई दुनियेच्या प्रांगणात पहिलं पाऊल पडलं आणि त्या मोहमयी दुनियेने जणू गारुड केलं मनावर ! कधी कल्पनाही केली नव्हती अशा समृद्ध, संपन्न जीवनानुभवाचे दान अलगद ओंजळीत टाकलं. एरवीच्या सुस्थीर, संपन्न आयुष्याला उच्चभ्रू समाज ते तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनाच्या परिघात मनमुराद हिंडवलं. अनेक अवघड परीक्षांमधून पार करत कल्पनातीत जीवनानुभवाचं देणं पदरांत टाकलं. या सर्वांना दशांगुळं पुरून उरेल असं नातेसंबंधांचं एक अद्भुत संचित वाट्याला आलं. त्या श्रेयसाच्या संचितावर अवघ्या आयुष्याची वाटचाल सुकर झाली.

“बहुजन हिताय बहुजन सुखाय’ अशा ब्रीदाची पालखी गेली ९७ वर्ष अविरत वाहणाऱ्या आकाशवाणीच्या दिंडीत, त्यांतील ५० वर्ष चालता आलं हे माझं अहोभाग्य !
याच दिंडीचा पुढचा मुक्काम अर्थात “सत्यम शिवम सुंदरम” हे ब्रीद गेली ५२ वर्ष जागवणाऱ्या आणि ज्ञान प्रबोधन व मनोरंजन या त्रिसूत्रीने प्रेरित झालेल्या दूरदर्शनच्या उंचच उंच मनोऱ्याखालील प्रांगणात! दृकश्राव्य माध्यमांनी शब्द आणि आवाज या दोन्हीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे त्याकाळी अत्यंत नावाजलेले एक माध्यम “फिल्म्स डिव्हिजन” या आणखी एका वेगळ्या माध्यमाच्या दुनियेत मला अलगद नेऊन सोडलं.

आता रंगीबेरंगी अनुभवांच्या संचिताचा थवा अलगद मनाच्या फांदीवर झुलू लागला आणि त्यांतूनच शब्द कागदाची गट्टी करू लागले. विविध विषयांची हाताळणी करता करता मन भावूक होऊन गेलं आणि विचारांची स्पंदन कागदावर शब्द रूप घेऊन उमटू लागली. सच्च्या भावना आणि उत्तुंग कार्य अचूक टिपणारी नजर याची प्रिंट मीडियाने अचूक नोंद घेतली. मासिकं, साप्ताहिकं, पाक्षिकं आणि वृत्तपत्रं या सर्वांनी माझ्या लिखाणाचे मनःपूर्वक स्वागत केले. दृकश्राव्य माध्यमां बरोबर छापील माध्यमांतली मुशाफिरी अशी सुरू झाली. शब्द आणि वक्तृत्वाची नव्याने ओळख झाली आणि जणू सुरवंटाचं फुलपाखरू झालं. व्यासपीठावरील व्याख्यानं आणि मुलाखती आणि त्याला लाभणारी रसिक श्रोत्यांची मनःपूर्वक दाद यांनी आयुष्यात नवे रंग भरले.

एव्हाना आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, पत्रकारिता आणि व्यासपीठीय कार्यक्रमांच्या पंचरंगी दुनियेत आयुष्य व्यस्त होऊन गेलं.
होय ! याच पंचरंगी दुनियेतील रंगांची अल्पशी उधळण करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
‌कदाचित हा आठवणींचा जागर या माध्यमात मुशाफिरी करून गेलेल्यांना पुन: प्रत्ययाचा आनंद देईल. तर कदाचित माध्यमांच्या जगात नवथर पावलं टाकणाऱ्या युवा पिढीला या अनुभवांशी जोडून घेत एखाद्या प्रसंगात अवचित मार्ग गवसेल. मला मात्र या लेखमाले मुळे माध्यमांच्या जगांतील ज्ञात निर्माते, संपादक, सहकलाकार आणि अज्ञात श्रोते, वाचक, प्रेक्षक यांच्या प्रेमातून उतराई होण्याची नामी संधी लाभेल !

तर अशा या माध्यमांच्या दुनियेतील पांथस्थाचं आकाशवाणीच्या प्रांगणात पहिलं पाऊल पडलं ते १९७५ साली. निमित्त होतं माझ्या एका कथेच्या रेकॉर्डिंगचं. कथेच शीर्षक होतं “दुष्टचक्र”. माझ्या आयुष्यातील दुष्टचक्र नव्हे ‘सुष्टचक्र” फिरण्याची ती सुमंगल घटिका होती.
कुटुंब कल्याण विभागाने वनिता मंडळातून कथा मागवल्या होत्या. नुकतीच लेखणी हातात धरली होती. वय कोवळं. नवथर. विषय कुटुंब कल्याण अर्थात कुटुंब नियोजनाचा. पण निर्मितीच्या उल्हासाला वयाच्या अडसराची परवा कुठे? त्या विषयावर एक कथा लिहिली आणि दिली पाठवून.

एक दिवस खाकी लिफाफ्यातून एक कॉन्ट्रॅक्ट पोस्टाने आलं. उघडून पाहिलं तर वर “ऑल इंडिया रेडिओ” असं लिहिलेलं. हा आनंदाचा सुखद धक्का होता. त्यावर रेकॉर्डिंगची तारीख होती त्या तारखेला रेकॉर्डिंगला निघाले. आकाशवाणीच ऑफिस शोधत शोधत तिथे पोहोचले. द्वारपालाने सांगितलं, “सनदी साहेब पाचव्या मजल्यावर बसतात. कुटुंब कल्याण विभाग तिथे आहे.” पण तिथे जायचं कसं ? पाचव्या मजल्यावर जाणारी लिफ्ट तर कुठेच दिसत नाही. मी गोंधळून उभी. तेवढ्यात स्टाफ मधली एक स्त्री येते ती कॅरीडोरच्या शेवटच्या टोकाकडे हात करते. मी दबकत पुढे जाते. कॅरिडोर संपतो आणि एक छोटासा गॅंगवे लागतो. उजवीकडे लांबचलांब जाळीदार खिडकी आणि डावीकडे अजस्त्र इंजिन्स धडधडत असलेली इंजिन रूम. गँगवे संपतो तरी लिफ्ट काही दिसत नाही. मात्र उजवीकडे जिना दिसतो. प्रशस्त पायऱ्यांचा. मी धडधड जिना चढू लागते. एक— दोन— तीन— चार— पाच— हूश्श! पाचवा मजला. उजवीकडे कोपऱ्यात एक प्रशस्त खोली. “कुटुंब कल्याण विभाग” अशी पाटी त्या प्रशस्त खोलीवर ! मी आंत प्रवेश करते. समोरच्या खुर्चीत मध्यमवयीन कृश शरीरयष्टीचे सनदी साहेब. मी धापा टाकत त्यांच्या समोरच्या खुर्चीत. ते हंसतात. “आमच्या आकाशवाणीत रूम आणि स्टुडिओच्या चक्रव्यूहातून तुम्ही अचूक आलात वा !” एवढी मोठी व्यक्ती सोळाव्या वर्षी आपल्याला अहोजाहो करते! ऐकूनच मस्त वाटलं. त्यांच्यासमोर माझी कथा होती “दुष्टचक्र”. माझ्याकडे किंचित अविश्वासाने बघत ते विचारतात, “ही कथा तुम्ही लिहिलेय ?” मी विनयाने मान हलवते. त्यांचं गालातल्या गालात हसणं नजरेतून सुटत नाही. पंधरा-सोळा वर्षांची ही मुलगी बेधडकपणे कुटुंब नियोजनावरची कथा लिहितेय !

“चला रेकॉर्डिंगला जाऊया!” खुर्चीतून उठण्यापूर्वी ते माझ्या पुढ्यात कॉन्ट्रॅक्टचा कागद ठेवतात. मी थरथरत्या हाताने कॉन्ट्रॅक्टवर सही करते आणि त्या क्षणी एका रेडिओ आर्टिस्टचा जन्म होतो. अविरत ५० वर्ष एक अनोखा रेशीम बंध जुळून येतो. सनदी साहेब त्या कॉन्ट्रॅक्टची एक प्रत मला देतात. (ती आजही माझ्या संग्रही आहे) त्यावर ब्रॉडकास्ट डेट असते ३ ऑक्टोबर१९७५. मी हळूच कॉन्ट्रॅक्टवर नजर टाकते. तारखे खाली कॉलम असतो फी २५ रुपये. (७५ सालातले) माय गॉड ! ही फी भरण्याएवढे पैसे मी आणलेले नसतात. मी चांचरत त्यांना म्हणते, “मी एवढे फीचे पैसे आता आणलेले नाहीत. नंतर दिले तर चालतील ?” माझ्या निर्व्याज प्रश्नावर ते मिस्कील हसतात. “बाळे ही फी आम्ही तुला देणार आहोत. हे तुझ्या कथेच मानधन !” त्यांचं एकेरीवर येणं आणि बाळे हे संबोधन एका अनाम रेशमी धाग्याचं जणू काही गुंफण तयार होतं. एक सरकारी कार्यक्रम अधिकारी आणि एक नवागत आकाशवाणी कलावंत यांच्यातील औपचारीक भेद पुसला जाऊन गुरु शिष्याचं एक अनाम नातं तयार होतं. त्या नात्याचं मनोज्ञ संवर्धन पुढे ते हयात असेपर्यंत अविरत केल जातं. उभयतांकडून! दर एक जानेवारीला मी आवर्जून आकाशवाणीत जाऊन त्यांच्या पाया पडत असे. ते निवृत्त होऊन गुंटूर येथे स्थायिक होईपर्यंत !
क्रमशः

माधुरी ताम्हणे

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. नेहमीप्रमाणे सुरेख शब्दांमध्ये तुम्ही प्रसंगाचे वर्णन केलेला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच प्रसंगही तुम्ही अशा प्रकारे लिहिला आहे की जणू काही नुकताच घडला असावा आणि तो वाचताना संपूर्ण प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडत आहे अशी जाणीव होत होती.
    बाकी तुमची प्रशंसा जितकी करावी तितकी कमीच आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

  2. वाह फारच छान. लहानपणी मी आकाशवाणी आणि दूरदर्शनचा एक निस्सीम चाहता (खर तर भक्त) होतो. त्यावेळी दूरदर्शनच्या पदाद्यासमोर असणारा मी, पडद्याच्या मागे काय चालू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच होत. आज तुमच्या ह्या लेखनाच्या माध्यमातून त्या पडद्या मागच्या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडेल. पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहे.

  3. माधुरीताई पूढील भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत.

  4. वाह माधुरी,मस्त,आपण एवढ्या गप्पा मारतो तरी अजून मला तुझ्याबद्दल फार माहिती नाही,असेच वाटते मला,तू खरच आत्मचरित्र लिहायला पाहिजे,इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत तुझ्याकडे,खूप इंटरेस्टिंग आत्मचरित्र होईल तुझे, खरच मनावर घे.

  5. माधुरी वहिनी,सुरुवात मस्तंच!! आता उत्सुकता पुढच्या भागाची..

  6. कादंबरीची सुरुवात झकास झाली आहे.
    वाचनाची उत्कंठा वाढीस लागली आहे. अभिनंदन!
    नागेश शेवाळकर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९