Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ६७

मी वाचलेलं पुस्तक : ६७

‘डोंगराने गाव गिळला

नमस्कार मंडळी,

‘मी वाचलेलं पुस्तक’ या सदराचे आज ६७ वा भाग प्रसिध्द होत आहे. म्हणजेच ६७ आठवडे आपल्याला या सदराचे लेखक श्री सुधाकर तोरणे सर, निवृत महिती संचालक, हे वाचनानंद देत आहे. आज त्यांचा ८५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या वयातील त्यांची वाचन आणि लेखनाची शिस्त आपल्याला निश्चितच घेण्यासारखी आहे. तोरणे सर शतायुषी होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. – संपादक

श्री सुधाकर तोरणे.

केरळ मधील वायनाड या गावी ३० जुलैला झालेल्या भूस्खलनात ३०० हून अधिक निरपराधांचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात अनेक इंग्रजी, मराठी वृत्तपत्रातील लेख, संपादकीय वाचन चालू असतांना या विषयावर पुस्तकाचा शोध घेऊ लागलो आणि आश्चर्य म्हणजे ‘डोंगराने गाव गिळला’ ही कादंबरीच हातात आली.

वायनाड अगोदर महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ आणि रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ‘तळीये’ या दोन गावांत निसर्गाच्या कोपामुळे संपूर्ण डोंगर, लोकवस्ती असलेल्या घरांवर, अतिवृष्टीमुळे कोसळला. त्यामध्ये अनेक लोक, लहान मुलं, मोठी माणसं गाडली गेल्याची संपूर्ण माहिती होतीच. त्यामुळे ही कादंबरी उत्सुकतेने वाचून काढली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवणचे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी ही ३०० हून अधिक पृष्ठांची कादंबरी अगदी रसाळपणे लिहिली आहे. संपूर्ण कादंबरी मला विशेष करून आवडली.

डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आतापर्यंत १६ कादंब-या, सहा कथासंग्रह, चार नाटके, एक एकांकिका असे साहित्य लिहिले आहे. त्यापैकी ‘साहेब’, ‘वंशवेल’ या कादंब-यांना तसेच ‘गारपीठ’, या कथासंग्रहास नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. शैक्षणिक व कृषि क्षेत्रातील कार्याबद्दल तसेच सहकार क्षेत्रातील विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून लोकप्रिय होते. सध्या ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘बँक व्यवस्थापन’ या विषयावरील त्यांच्या पुस्तकाला “बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल पुरस्कार” ही मिळाला आहे.तर २००४ साली महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

कादंबरीला भारत स्वतंत्र झाल्यापासून तर अगदी अलीकडच्या काळाची पार्श्वभूमी आहे. कोळे गांवची ही कहाणी आहे. कोळेगाव हे रामपूर तालुक्यापासून खूप लांब व एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशी वसले होते. उंचचा उंच कडा, कड्याच्या एका टोकाला दुर्ग, कडा आणि पायथ्यामध्ये भले मोठे पसरलेले घनदाट जंगल, अनेक मोठी झाडे -झुडपे, असंख्य वनस्पती त्या जंगलात होत्या. काही औषधी वनस्पती होत्या तर काही जंगली ! कड्याच्या पायथ्याला थोड्याच अंतरापासून घर बांधलेली, अनेक वाड्या वस्त्या वसलेल्या, मधोमध रस्ता होता. हा रस्ता सरळ नदीवर जात होता. नदी ही पुढच्या एका पहाडाच्या दरीतून उगम पावली होती. बारा महिने पाणी वाहत असे पिण्यासाठी पाणी, गुराढोरांना पाणी, पुरुष मंडळींना आंघोळीला पाणी तिथंच मुलं तिथंच गुरांना घेऊन पाणी पाजायला जायची व नदीत पोहायची बायकाही कपडे धुण्यासाठी तिथे जायच्या. नदीचे पात्र व परिसर अतिशय सुंदर वाटायचा. हिरवेगार जंगल नदी काठापासून कड्यापर्यंत विस्तीर्णपणे पसरलेलं होतं. पावसाळ्यात सर्वांची गुरं इथं चरायला यायची. गाव तसा जंगलातून दिसायचा नाही कारण गावातही खूप झाडे तोही एक जंगलाचा भाग दिसायचा. माणसांनी जंगलातच पूर्वी वस्ती सुरू केली.मग हळूहळू जेवढी लागेल तेवढी झाडे तोडायची, घर बांधायची, घरे पण कसली गवतारू ! मग हळूहळू त्यात बदल होत गेला मग कौलारू घरे झाली.गावात स्वातंत्र्य सैनिक महादेव गुजर आणि चार-पाच प्रमुख मंडळी गाव चालवत होती अजून गावात रहदारीची साधने नव्हती. तालुक्याला जायचं असलं तर आठ-दहा मैल चालत जायचं, बैलगाडीचा रस्ता सुद्धा नव्हता. त्या काळात काही ठराविक लोक, तालुक्याला जायचे निघायचे. मग इंग्रजांनी तयार केलेल्या सडकेपर्यंतच यायचं व तिथून एखादी बैलगाडी किंवा बस मिळाली तर किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी मधल्या रस्त्याने चालत जायचं.गावात वस्ती तशी फार नव्हती पण दखल घेण्याएवढी होती. शंभर दीडशे उंबरा असेल तो निरनिराळ्या वाड्यांमध्ये विभागला होता. पूर्वी व्यवसायासाठी प्रत्येक व्यवसायाचे लोक स्थलांतरित होता होता या वाड्या झाल्या. त्यांना जमिनी तिथल्याच लोकांनी दिल्या होत्या.

स्वातंत्र्य सैनिक असलेले महादेव गुजर हे गावचे पुढारी होते. त्यांना दोन मुले अरुण आणि संभाजी. महादेवांची बहिण गावतलेच त्यांचे मित्र नामदेव गुजरांना दिली होती. त्यांना दोन मुली. पुढे त्यांचेही वयोमानानुसार महादेवांच्या मुलांशी म्हणजे अरुण संभाजीशी लग्न झाले. महादेवांना आई होती. मोठा वाडा होता. अर्धै जंगल त्यांच्याकडे वतनानुसार होते. महादेव रावांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या वेळेपासून त्यांच्या सैन्यात होते. त्यावेळी केलेल्या पराक्रमात त्यांना मानाचा कडा व दहा गावांची सुभेदारी बहाल केली होती. त्यावेळी त्यांनीही जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने निवडली व गाव वसवलं होतं. शिवाय गावात तीन चार परिसरात बरीच शेत जमीन होती. गावात एकच दुकान होते. शेजारच्या १० मैलावर असलेल्या गावातून किराणा लागेल तो चार-पाच गडी घेऊन जायचा व तिथून एकदम आणायचा. त्याने दोन घोडे ठेवले होते. लहान होते पण वाहतुकीला बरे पडायचे. तशा दुकानातील वस्तू फार कमी घेत होते लोक, कारण जे जे जगायला लागायचे ते सर्व स्वतःकडे तयार करायचे. तांदूळ, नाचणी, भाज्या, खायला लागणार सगळं, तेल सुद्धा ! जे जे पिकते ते सर्व करायचे पिकत नव्हतं ते आणायचे कपडे गुळ मीठ अशा तऱ्हेने लोकांसाठी सामान आणायचे. त्यावेळी चहा माहित नव्हता. इतर चैनीच्या वस्तू नव्हत्या. जे असेल त्यात समाधान !

गाव तसे समाधानी आणि शांत होते. एकमेकांचे ऐकायचे, वडीलधाऱ्यांचा मान ठेवायचे. एक दिवस महादेव गुजरांनी गावाची बैठक बोलावली. गावची बैठक एका जुन्या मोडक्या देवळात व्हायची. गावात सायंकाळी उजेड असताना बैठक लावायची व अंधार पडताना बंद. बैठकीत सर्वांनी श्रमदानातून देवळाच्या भिंती उभ्या केल्या. त्याला लागणारे छतासाठींचे पत्रे बल्ल्या रामपूरच्या मित्रांनी रामराव जाधवांनी पाठवल्या. सुंदर मंदिर तयार झाले. गावात सर्व सण उत्सव मोठ्या थाटात होत असे. पुढे कोळे गावापासून सडकेवरच्या कदमवाडी पर्यंतचा रस्ता गावकऱ्यांनी श्रमदानातून तयार केला. तेथेही महादेवरावाच्या जमिनी होत्या. तेथे एक भागात मुलांसाठी चार खोल्यांची चवथ्या यत्ते पर्यंतची शाळा ही श्रमदानातून बांधली. मुल शिक्षण घेऊ लागले.vएक मास्तर नेमले. शेतक-याच्या मालाला भाव यावा म्हणून तरुण अरूणने सहकारी सोसायटीची स्थापना केली. महादेव राव मात्र सर्वांना सांगत असतं की कुणीही झाड तोडायची नाहीत. आपल्या स्वार्थासाठी व गरजांसाठी या निसर्गावर अन्याय करू नका त्याच्याशी खेळू नका ते नष्ट करू नका ते तुम्हाला महागात पडेल तो तुम्हाला नष्ट करेल हे लक्षात ठेवा मी असेल अगर नसेल पण माझे शब्द तुम्हाला जरूर आठवतील पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल असे महादेव राव गावकऱ्यांना बैठकीत समारंभात नेहमी सांगायचे.

दोघेही मुले वडिलांच्या इच्छेनुसार काम करीत राहिले. महादेवरावामुळे गावचा सर्वांगीण विकास होऊ लागला. रस्ते झाले, वीज झाली, एसटी आली, ग्रामपंचायत आली, नळपाणी पुरवठा झाला. शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी विकास सहकारी संस्था आली. डेअरी सोसायटी आली. दूध अंडी गावातून विक्रीला जाऊ लागले. लोकांच्याकडे पैसा आला. आर्थिक सुबत्ता येऊ लागली आणि सातवीपर्यंत शाळा ही बांधून झाली. हायस्कूलची परवानगी आली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक ट्रस्ट तयार करून धर्मदाय आयुक्तांची मान्यता घेतली व पाच एकर जागा देऊन पाच-सहा खोल्यांची सातवी पर्यंत शाळा आणि नंतर अकरावी पर्यंत हायस्कूल इमारतीचे बांधकाम सुरू केले.

पुढे सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. म्हातारपणामुळे व आजारामुळे महादेवराव यांनी अरुणलाच गावचा कारभार प्रामाणिकपणे आणि झाडे न तोडण्याची आण घालून बघायला सांगितले. तो पुढे गावचा सरपंचपदी अविरोध निवडून आला.पुढे त्यांच्या विकास कामामुळे रामपूर पंचायत समितीचा सभापती झाला साऱ्या गावालाच नाही पण संपूर्ण भागातील गावांना आनंद झाला. पुढे तो व भाऊ संभाजी मिळून छोटे मोठे कामाचे आमदारांच्या मदतीने काॅंक्र्याट मिळवत गेला. रस्ते, तलाव, धरण बांधण्यापर्यंत मजल गेली. मोठा ठेकेदार झाला. खुप पैसा मिळवला. आमदार आणि विविध खात्यांच्या अधिका-यांना आपल्या गडगंज संपत्तीतून हातभारही लावत गेला.

दरम्यान कदमवाडी रस्त्यावर एक साॅ मिल आली आणि पुढे काय काय घडत गेले ते औत्सुक्यभंगापोटी कादंबरीतच वाचलेलं चांगलं !

कादंबरीत अगदी अखेरीस काय झाले ? डोंगर कोसळला. पूल वाहून गेला.धरण फुटलं. निसर्गाचा नाश करुन संपूर्ण कोळेगाव माणसा मुलांसह गाडले गेले. त्यात अरुण संभाजी व त्यांच्या बायका गाडल्या गेल्या. दोघांची मुले व आई सुदैवाने वाचली. महादेवराव मात्र हे संकट येण्यापूर्वीच मरण पावले होते. वाड्याजवळ त्यांची समाधी मुलांनी अतिशय सुंदर आकर्षपणे बांधली होती.

कादंबरी शेवटी सुखांत केली आहे. अरुण व संभाजींची दोन्ही मुलं डॉक्टर झालीत आणि पुढे काय काय घडत गेले ते कादंबरीत सुरेखपणे लेखकाने वर्णन केले आहे. कादंबरी अगदी सरळ सोप्या भाषेत लिहिली आहे. त्याचा सारं एवढाच की आज जगातच फार मोठा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक जमीन लेवल करतात. मोठमोठ्या इमारती बांधतात. झाड तोडून वणवे लावतात,‌ त्यात लहान झाडे जळून जातात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. परत झाड कोणी लावत नाही.याचा विचार कोणी करत नाही. झाडे काय काय देतात, आपल्याला याचं अज्ञान आहे. पैशासाठी, स्वार्थासाठी, जंगलांचा संहार केला जातो. या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होतो. आज तापमान वाढलं, आता दुसरे अनेक प्रश्न निर्माण होतील. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. काय काय भोगावे लागणार कोणास माहित !.

सर्वांनी सावध राहायला पाहिजे. निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे. हिरवीगर्द झाडी नष्ट होतेय असं नाही. तर त्याबरोबर वन्य जीवन सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेकडो प्रकारची झाडे तोडल्यामुळे रिकाम्या झालेल्या जंगलामुळे पशुपक्षी सुद्धा कमी होत आहेत. राहिलेले पशु उदाहरणार्थ माकड, हत्ती, गवे, रेडे, नीलगाय, बिबट्या, इत्यादी जंगल सोडून जवळ असलेल्या वस्तीमध्ये घुसून शेतांची झाडांची नासधूश करताना पाहायला मिळतात. यामध्ये त्यांचा दोष आहे असं नाही, कारण त्यांचा घरोंदा माणसाने नष्ट केल्यामुळे ते मनुष्य वस्तीकडे वळलेले आहेत. हे सर्व माणूस स्वार्थासाठी करत आहे. त्याला हे समजत नाही हे त्याचे कर्म त्याला कधीतरी भोगायला लागणार आहे आणि ते आता सुरू झाले आहे.

पर्यावरणाच्या अतिऱ्हासामुळे हवामानात बदल झाला आहे. पूर येत आहेत. दुष्काळ पडत आहे. पाण्याची पातळी खाली जात आहे आणि याचा परिणाम मानवाच्या राहणीमानावर जीवनशैलीवर होत आहे. कादंबरीतील कोळेगावचे उदाहरण लेखकाने सर्वांसमोर दिले आहे. ही डोंगराने गाव गिळल्याची दुर्घटना घडली आहे. निसर्ग संपत्तीचा नाश करून, झाडे तोडून, जमिनी खोदून विकास कामे करणार असाल, निसर्गाला संपवाल तर एक दिवस तो तुम्हाला गाडणारच ! आज ही घटना झाली. उद्या आणखी होईल. यापेक्षा मोठी दुर्घटना होईल, कारण हा कोप आहे. हा प्रकोप आहे, एवढे लक्षात ठेवा. यातून कोणीही वाचू शकणार नाही, असा या कादंबरीचा भावार्थ आहे आणि तो सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक. नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. पर्यावरणवर चांगली कादंबरी लिहिणारे डॉ तानाजी राव चोरगे यांचे अभिनंदन त्यांची माहितीही दिली यामुळे त्यांच्या इतर पुस्तकाविषयी उत्तोसुकता निर्माण झाली. श्री सुधाकर तोरणे यांनी परिक्षण लिहुन महत्त्वाचे काम केले आहे. या वयात त्यांचा नवीन ग्रंथांचे वाचन व परिचय लिहिला यासाठी धन्यवाद व शुभेच्छा 🙏🙏

  2. खूप सुंदर वर्णन, विवेचन केले आहे. ओघवत्या लेखनशैलीत ही फार छान कादंबरी आहे. निसर्गापुढे माणूस किती खुजा आहे याचं जिवंत उदाहरण !!

  3. खूप सुंदर वर्णन, विवेचन केले आहे. खरंच ही कादंबरी खूप वाचनिय आहे. माणूस निसर्गापुढे किती लहान आहे याचं जिवंत उदाहरण !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९