गांधाली
गणेशोत्सव संपला. ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ ग्रंथ वाचल्यानंतर आता एखादे मस्त लघुकथांचे पुस्तक हाती घ्यावे म्हणून सहजच ‘गांधाली’ हे प्रा डॉ.विजय पांढरीपांडे यांचे डिसेंबर २०१२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक हाती घेतले. त्यापूर्वी त्यांच्या एकदोन प्रसिद्ध मासिकातील कथा वाचल्या होत्या आणि ‘नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ हे पुस्तक वाचल्याचे आठवले होते. आपल्या ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टलवर वर त्यांचे लेख, अलिकडचीच एक कथा आणि निरोपाच सुरेख हृदगत वाचलं होतं. त्या अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते काहीकाळ होते एवढीच माहिती होती. इतकेच ! ‘गांधाली’ कथासंग्रह हाती आला आणि दिवसभरात त्यातील १४ लघुकथा एका दमात वाचूनच रात्रीचे जेवण घेतले.
सामान्य माणसाच्या जीवनातील ताणतणाव, संघर्ष, महत्वाकांक्षा ह्यांची सरळ उकल करीत चित्त प्रसन्न करणारे हे पुस्तक माझ्या मनात घर करून राहिले. साधी, सोपी, अन् प्रवाही लेखन शैलीबद्दल मी प्रथम डॉक्टरांना वंदन करु इच्छितो. या सर्व कथातील सुजाता, उज्ज्वला, स्क्वाड्रन लीडर शर्मा, त्यांची आई लेडी डॉक्टर शर्मा, स्नेहल, जसपाल- श्यामा, शिवानी, मिस्टर बाळू वैद्य अन् मिसेस प्रमिला वैद्य, संदीप, अपर्णा, जानकी, ताई, सुमित्रा, वनिता, कर्णिक, देसाई, चार मुलींची आई, सुमन, डॉ.मिसेस पारखी, सुधाकर, रश्मी पटेल, डॉ.अग्रवाल, पीटर, मिसेस वर्मा, नायर, मालती, अनिकेत, माधव, मीनल, अनिल, डॉ.अरुण शहा, मृणाल, वसुधा ही सर्व कथातील सजीवपात्रे कथा वाचतांना लेखकाने वर्णन केलेल्या पार्श्वभूमीवरून वाचताना अगदी समोर आपुलकीच्या डोळस नात्यातून प्रत्यक्षात दिसल्याच ! अनेक कथात ही सर्व पात्रे संवेदनाशी जवळीक साधणा-या, जिव्हाळ्याच्याच वाटल्या. अनेकविधपात्र प्रसंगातून अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेल्याच दिसल्या !
आपली गाजलेली ‘पत्रांजली’ कादंबरीची एक वाचक नात्याने लेखकाच्या आयुष्यात पत्रातून आलेली, सुजाता रामलिंगम, पुढे पत्रातूनच वाढलेली आणि पत्राच्या मर्यादित राहिलेली ओळख ! सुजाताचे विचार तरुण वयात असतात तसे उथळ नव्हते. अपरिपक्व अवस्थेत माणूस कुठेही कसाही वाहवला जातो, असले भरकटणे तिच्या बुद्धीला मान्य नव्हते. प्रत्येक बाबतीत नको तितकी चिकित्सा, नको तितकी जिज्ञासा, नको तितके खोलात शिरण हा सुजाताचा स्वभाव होता. कधी कधी तिची पत्रे वाचणे हा आनंद असायचा तर कधी डोके दुखविणारा वैताग असायचा ! तथापि नको तितक्या श्रद्धाभावाने आदरभावाने ती पत्रे लिहीत होती आणि लेखकावर विश्वास टाकून मोकळी होत होती. व अशाच एका पत्रातून एरवी धीर गंभीर, विवेकी, बुद्धीनिष्ठ, व्यक्तिमत्त्वाच्या सुजाताने नवी समस्या लिहिली तिच्याच कॉलेजातल्या रणधीर नावाच्या एका सिंधी मुलाने तिला सरळ सरळ लग्नाची मागणी घातली होती तेव्हा लेखकाने बजावले की ही अंधारातली उडी आहे ती वाचली तर ही वाट प्रीतीच्या मोक्षाला जाईल ! आणि पाय घसरला तर ‘कपाळ मोक्ष’ असे सांगितले. दोघांचे लग्न झाले अन् पुढे या प्रकरणाने भलतेच वळण घेतले पुढे काय काय होते ते आपला औत्सुक्यभंग होऊ नये म्हणून ‘सुजाता’ नावाच्या कथेतच संपूर्ण वाचलेलं बरे !
एडन येथे सप्टेंबर १९९१ मधील तीन दिवसांच्या मुक्कामातील कथेतील विविध प्रसंगावर लिहिलेली कथा फारच मस्त आहे. गायनाॅक्लाॅजिस्ट डॉ.उज्वल, मिस्टर अन् मिसेस अग्रवाल यांची तीन दिवसांतील गंमत पुस्तकात चांगली प्रकट केली आहे. हा डॉ. विजयरावांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे असे मला तरी ठाम वाटते.
‘अनपेक्षित’ या कथेत स्क्वाड्न लीडर शर्मा या एअर फोर्सच्या आपल्या हुद्याचं आणि पदवी बरोबरच सांभाळाव्या लागणाऱ्या शिस्तीचे भान विसरलेल्याला “प्लीज गेट आउट फ्रॉम हिअर” असं थिसिसच्या प्राध्यापकांनी सुरुवातीलाच म्हटलेलं पाहून ही कथा कशी वळण घेते ते पहाणे महत्वाचे आहे. त्या शर्मांची आई सिटी हॉस्पिटलमध्ये प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. अशात प्राध्यापकांची सौ.स्नेहल डिलीव्हरीच्या प्रसंगात आली आहे. अशा वातावरणात कथा कशी वेग घेते हे पाहणे पुस्तकातच वाचलेलं चांगलं ! कथेचा शेवट अतिशय सुरेख केला आहे.’
‘क्षण एक पुरे’ या कथेत जसपाल हा नायक लेखकाला गंभीरपणे विचारतो की तुमच्या नीती अनितेच्या कल्पना काय आहेत ? त्यावर लेखक म्हणतो, “लोकांना वाटतं लेखक लिहितात एक आणि वागतात वेगळं ! पण लेखक हाही शेवटी एक सामान्य माणूसच असतो हे सोयीस्करपणे विसरले जाते. अर्थात जसपालला एकूणच साहित्यिक कम्युनिटी विषयी श्रद्धा भाव आहे. आपल्या घरी श्यामा नावाची घरकाम करणारी मुलगी होती आणि पुढे काय काय होते ते औचित्य भंग होऊ नये म्हणून पुस्तकातच वाचलेलं चांगलं !
हत्ती आणि आंधळ्याची गोष्ट या कथेत मिस्टर बाळू वैद्य आणि त्यांची पत्नी प्रमिला यांची गोष्ट आहे. दोघांचे संबंध म्हणजे “मिले सुर मेरा तुम्हारा” असे आहे. पण एक नव्याने संदीप, अपर्णा आणि जानकीची गोष्ट घडते आणि ती कशी ते देखील पुस्तकातच वाचलेलं अधिक मस्त !
‘ऊनपाऊस’कथे मधील फुलांची वेड असलेली मालती, संसारातून माधवचा तीन वर्षांत झालेला मृत्यू आणि अनिकेतचं अमेरिकेतून आगमन या विषयीची आहे. संसाराचं चित्र एकदम बदलतं. मृत्यूची सावली पुढे सरकते नवचैतन्याचा नव्या विचारांच्या प्रेरित वारू फिरू लागतो उत्साहाचं चांदणं पसरतं आणि मग पुढे काय होतं ते देखील आपण कथेतच वाचायला हरकत नाही.
‘स्पर्शकमळ’ या कथेत आपण आयुष्यात किती आणि काय गमावलं याची जाणीव झालेली मीनल आणि तिच्या बॉसची गोष्ट आहे.नवरा अनिल अचानक अपघातात गेल्यानंतर अर्ध्या अपु-या स्वप्नभंगात रुतलेल्या भावना ती कशी साकारते याची छान कथा संपूर्ण वाचलेलीच चांगली !”
सामान्य माणसांच्या संसार जीवनातील विविध अंगांना स्पर्शणारे डॉ. विजय पांढरीपांडे यांचे कथालेखन गेल्या तीन दशकात रसिकांच्या मनात घर करून वसलेले आहे. साधी, सोपी, पण प्रवाही लेखन शैली, कथेतील पात्र प्रसंगात जीव ओतून आपलेपणाचा ओलावा निर्माण करते. ‘प्रत्येक समस्येला उत्तर असतं आणि ते आपलं आपणच शोधायचं असतं’ हा विश्वास निर्माण करते. कथा वाचून विचार करायला लावणारे हे लेखन त्यातील सजीव पात्र- प्रसंगामुळे अत्यंत वाचनीय झाले आहे. त्यातील काही चमकदार शब्दांची अथवा त्यांनी या सर्व कथांतून केलेल्या सुरेख मार्गदर्शनाची ही छोटीशी झलक..
काय करू नये हे माणसाला ज्या क्षणी कळते त्या क्षणी काय करावे हेही आपोआप कळते. अशा खाचखळग्यांच्या अनुभवांनी, एखाद दुसऱ्या फसलेल्या निर्णयांनी, चुकलेल्या पावलांनीच आयुष्याची खरी पाऊल वाट तयार होते. मग या पाऊलवाटेवर खंबीरपणे पुढे चालण्यात देखील एक वेगळी शान असते म्हणून आयुष्यात कसलेही भय बाळगण्याची आवश्यकता नाही. “माणसाला कौतुकाच्या चार शब्दांशिवाय आणखी काय हवं असतं ? पण काही व्यक्ती तिथंही कंजूषी करतात अन् भरलेल्या संसाराचं मातेरे करून सोडतात”. आयुष्यातील काही सत्य एखाद्या चौकटीत बसविताच येत नाहीत. एखादं चित्र फ्रेम करता येईल पण चित्राचं सौंदर्य लाकडी फळेमध्ये भिंतीवर टांगून ठेवता येणार नाही. नीतीआनिती, पापपुण्याचे कायदेकानून काही घटनांना खऱ्या अर्थाने लावता येत नाहीत. व्यावहारिक कुंपणंं, आचार विचारांची बंधन अशा अद्वितीय क्षणांच्या बाबतीत संदर्भहीन ठरतात. कारण वर्तमानातला एक चालता, बोलता, धावता जिवंत क्षण तेवढा खरा असतो. मागच्या पुढच्या धाग्यादोऱ्यात तो संदर्भ, तो अर्थ, गुंतवून ठेवता येत नाही. सूत्रबद्ध करता येत नाही.
तारुण्य आंधळं असतच.. पायाखाली घसरण लागली की ते अज्ञानीही होतं. मग तोल सांभाळणं फार कठीण जात. स्त्रीला जर निर्धोकपणे जगायचं असेल, वखवखलेल्या नजरांचा पाठलाग टाळायचा असेल तर अंगावर बुरखा घ्यायला हवा. कौमार्य अन् तारुण्य हे कधीकधी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरतं. तरुण असली तरी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पुरुषाला थोपवून धरतं. तसं पाहिलं तर लग्न, संसार, मूलबाळ हे स्त्रीच्या जीवनाचे स्वाभाविक पैलू असले तरी अपरिहार्य नाहीत. जगण्यासारखं, उपभोगण्यासारखं अजूनही काही आहे अवतीभवती. इच्छा असेल की मार्ग निघतो. कधी कधी मार्ग आपल्या पायाखाली, डोळ्यासमोरच असतो, परंतु भावनांचा अतिरेकी हळवेपणा, परंपरागत चालीरीतीची बंधनं, लोक काय म्हणतील या शंका कुशंकांनी आलेला बुजरेपणा.. ह्यामुळे ह्या पायाखालच्याच वाटेवर पुढं पाऊल टाकण्याच धाडस आपल्याला होत नाही. म्हणूनच जे प्रश्न सहजासहजी सुटू शकतात त्या समस्या सोडविण्या ऐवजी त्यातली गुंतागुंत आपण वाढवीत जातो, ह्या बंधनानामुळे, ह्या निरगाठीमुळे ! मला वाटतं या गाठी आपण सोडवायला हव्यात.
डॉ.पांढरीपांडे यांच्या सात आठ कथांमधून वरील प्रमाणेच मोजकी काहीशी मार्गदर्शनपर अधिक शब्दांकन देण्याचा विस्तारभयापोटी आणि आपला औत्सुक्यभंग होऊ नये देत नाही. ह्या सर्वच संसार कथा कुठल्याही व्यक्तीच्या सुखदुःखांशी, संवेदनांशी जवळीक साधणाऱ्या; जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते जोपासणाऱ्या आहेत. जीवनातील ताणतणाव, संघर्ष यांची साधी, सरळ, सोपी, उकल करीत चित्त प्रसन्न करणारे हे लेखन प्रत्येकाला विचारप्रवृत्त, अंतर्मुख करेल यात मुळीच शंका नाही. शेवटी कथेतला ‘मी’ म्हणजे स्वतः डॉ.पांढरीपांडेच व्यक्तिशः आहेत.त्यांच्या कुणालाही अंत:करणपूर्वक मदत करण्या-या, सोज्वळ स्वभावाच्या आणि त्यांना विविध प्रसंगात आलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्याच या कथा वास्तव्याशी संवेदनशीलपणे जोडलेल्या आहेत, असे म्हटले तर ते अनाठायी होणार नाही.
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800