Tuesday, July 23, 2024
Homeलेखरविराज, सत्तरीच्या शुभेच्छा

रविराज, सत्तरीच्या शुभेच्छा

मी दूरदर्शन मध्ये असताना माझा सहकारी राहिलेला आणि आजतागायत मित्र असलेला रविराज गंधे याचा आज, म्हणजे १० जुलै २०२४ रोजी सत्तरावा वाढदिवस साजरा होत आहे, हे आपल्याला सांगून खरं वाटणार नाही. खुद्द मलाच ते अजूनही खरं वाटत नाही तर ! आणि बहुधा याचं कारण असं असावं की त्याचा सतत चा हसतमुख, प्रसन्न चेहरा, सततचं क्रियाशील राहणं आणि एकूणच त्याचं व्यक्तिमत्त्व होय.

मला आठवतं,जेव्हा मी दूरदर्शन मध्ये, १९८६ साली रुजू झालो होतो तेव्हा दूरदर्शनचा झगमगाट, ते स्टुडिओ, पडद्यावर पाहिलेली मोठी मोठी मंडळी प्रत्यक्षात पाहणं, एकूणच तेथील माहौल आणि त्यात मुंबईत नवीन यामुळे मी खूपच बुजून बुजून रहात असे. अशा वातावरणात ओळख झाली ती रविराजची. ही ओळख पुढे दृढ होत गेली, त्याला कारण ठरलं ते म्हणजे आमचं नगर कनेक्शन.

रविराज मूळ नगर चा.त्याचा जन्म तिथेच १० जुलै १९५४ रोजी झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही तिथंच झालेलं. नंतर प्रसिद्ध अशा इस्त्रो संस्थेतून त्याने टेलिव्हिजन प्रोग्राम प्रॉडक्शन्स मधील पदविका घेऊन तो १९७९ साली मुंबई दूरदर्शन केंद्रात प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून रुजू झाला. तर मी नगर कॉलेज मध्ये १९८२- ८३ अशी दोन वर्षे शिकलेला, तेथील दैनिक समाचार पेपरमध्ये काम केलेला, काही काळ तेथील पत्रकारितेत वावरलेला यामुळे आणि कदाचित दोन व्यक्तींमध्ये जमायला लागणे, ज्याला इंग्रजीत “केमेस्ट्री” जुळणे म्हणतात, तशी ती आमची जुळल्यामुळे रविराज म्हणजे माझं हक्काचं ठिकाण झालं.

पुढे मी दूरदर्शन मध्ये रुळत गेलो. पण चांगल्या नोकरीची संधी मिळते म्हणून मी जेव्हा दूरदर्शन सोडायचे ठरविले त्यावेळी बहुतेकांनी मला वेड्यात काढले. दूरदर्शन सोडू नये म्हणून खूप समजूत काढली. कारण त्यावेळी एकमेव वाहिनी असलेल्या दूरदर्शनचं ग्लॅमरच तसं प्रचंड होतं. पण रविराज ने मात्र माझ्या निर्णयाला ठामपणे पाठिंबा दिला. अशा निर्णायक वेळी आपल्या पाठीशी एक तरी व्यक्ती असणं खूप महत्वाचं असतं. तिच भूमिका रविराजनं बजावली आणि त्याबद्दल मी त्याचा आजही ऋणी आहे.

रविराज चा केवळ हसतमुख स्वभावच नव्हे तर मदतीला, मार्गदर्शनाला तत्पर असणं, निर्व्याज स्वभाव, फार काही मनाला लावून घायचं नाही, अशी वागणूक यामुळे त्याचे केवळ दूरदर्शन मधील सहकाऱ्यांशीच नव्हे तर येणाऱ्या थोर थोर कलाकार आणि इतर व्यक्तींशी कायमचे मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.

रविराज ला मुळातच साहित्याविषयी प्रेम असल्यामुळे त्याला दूरदर्शन वरील बहुतेक करून नाट्य, चित्रपट,साहित्य विषयक कार्यक्रमांच्या निर्मितीची संधी मिळाली. पुस्तक परीक्षण विषयक त्याचा एक कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. माझ्याही “भावलेली व्यक्तिमत्वे” या पुस्तकाचं परीक्षण त्या कार्यक्रमातून त्यानं तेव्हा केलं होतं.

रविराज चा आणखी एक विशेष गुण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या सहजपणे मुलाखती घेणं हा होय. त्यामुळे लोकं आम्हाला फक्त नावानिशी ओळखत तर त्याला चेहरा पाहून लगेच ओळखत. त्यामुळे म्हणा, किंवा त्याच्या मूळ स्वभावामुळे म्हणा, तो दूरदर्शन मध्ये असल्यापासूनच त्याला विविध गावात होणाऱ्या विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आमंत्रण असे आणि शक्य असेल तिथे तो आवर्जून जात असे. विविध पुरस्कार निवड समित्यांमध्येही त्याचा परीक्षक म्हणून सहभाग असे.

रविराज च्या जो जो संपर्कात आला, तो तो त्याच्या कायमच्या संपर्कात रहात आला आहे. कार्यक्रमांच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या विविध व्यक्तींवर त्याने लिहिलेले “माध्यम यात्रेतील माणसं” हे पुस्तक चांगलंच गाजलं. आजही या पुस्तकावर कुठे ना कुठे चर्चा होत असते आणि अर्थातच या चर्चेत रविराज दिलखुलास संवाद साधत असतो. त्याला पाहताना असं वाटतं, जणू वयाचे आकडे त्याला लागुच होत नाहीत !

साहित्यानंतरचं रविराज चं दुसरं प्रेम म्हणजे पर्यावरण संवर्धन. या विषयी ही त्याने आकाशवाणी, दूरदर्शन वर अनेक कार्यक्रम केले. “वेध पर्यावरणाचा” हे त्याचे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

रविराज च्या कामगिरीबद्दल त्याला ‘मुग्धा चिटणीस प्रतिष्ठान, अ. भा. मराठी साहित्य संमेलन, को. म. सा. प., मराठी साहित्य परिषद ‘सह्याद्री माणिक पुरस्कार’, म. टा. सन्मान, ‘सर्वोत्कृष्ट ग्रंथप्रसारक’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

सेवा निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे असे स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून देणाऱ्या रसिकराज, रविराज यास वाढदिवसाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मुंबई दूरदर्शन च्या दृकश्राव्य माध्यमाच्या सुवर्ण युगातील जे साक्षीदार आहेत त्यापैकी रविराज एक चाणक्ष जानकार आणि निर्माता.
    सदैव हसरा चेहरा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असल्याने तो सर्वांचा मित्र होता पण माझा mitraअशोक शेवढे शिवाय तो कुणाचा घनिष्ठ मित्र असल्याच मला मात्र माहिती नही.
    आपत्ती आणि विपत्तीत समतोल राखणाऱ्या माझ्या या नगरकर मित्राला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि शुभचिंतन. राम खाकाळ 9969254051.
    मानवाच्या DNA च्या शास्त्रानुसार रवी 140 वर्षे नक्की जगेल कारण त्याचा सततचा हसरा आणि प्रसन्न चेहरा होय.
    राम खाकाळ, माजी निर्माता, मुंबई दूरदर्शन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः