Saturday, March 14, 2026
Homeसाहित्यशेगाव : मनमंथन संमेलन थाटात संपन्न

शेगाव : मनमंथन संमेलन थाटात संपन्न

नागपूर येथील मनमंथन साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेव्दारे आयोजित, तीन दिवसीय चतुर्थ राज्यस्तरीय साहित्य संमेलन शेगाव येथे नुकतेच संपन्न झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबई येथील समाजसेविका तथा ‘नापासांची आई’ ; संगीता चव्हाण होत्या.

संमेलनाच्या प्रथम सत्रात ‘वनवन्ही’ कार्यक्रम झाला. अध्यक्ष म्हणुन प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.किशोर घोंगे उपस्थित होते. अर्चना सिंगलावार ह्यांनी प्रास्ताविक केले.

‘जोडी तुझी माझी’ या खेळात कृपा म्हात्रे आणि राकेश म्हात्रे, तसेच मेधा आणि किशोर घोंगे यांनी विजेतेपद पटकावले.

दुसऱ्या सत्रात सर्व दिग्गज आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत, सर्वप्रथम ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडी प्रमुख अर्चना गिरगांवकर, मेधा घोंगे यांनी याचे आयोजन केले होते. ग्रंथपूजन श्री.सतीश शिरसाठ, श्री. प्रदीप वाडी व इतरांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन, सरस्वती-स्तवन, स्वागतगीत ह्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अलका टिकेकर यांचे स्वागतपर भाषण झाले. उपसचिव मीरा घोंगे यांनी अहवाल वाचन केले. वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच संमेलनानिमित्त आयोजित केलेल्या काही विशेष स्पर्धांतील विजेत्यांना श्री.अरुण चान्सरकर, संगीता चव्हाण, डॉ.दिपाली सोसे, प्राचार्य भूषण महाजन यांच्या हस्ते करण्यात पारितोषिके प्रदान करण्यात आली संमेलनानिमित्त स्पर्धांचे व्यवस्थापन श्री.विनोद मुळे यांनी केले होते. संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात संगीता चव्हाण म्हणाल्या की, “मराठी भाषा जर टिकवायची असेल तर लहान मुलांपासूनच सुरुवात करायला हवी. आत्तापासून त्यांच्या मनावर संस्कार करून मराठी भाषेचा स्वाभिमान जागवला तर पुढची पिढी मराठी भाषेवर प्रेम करायला शिकेल.”

सर्वच वक्त्यांनी मराठी भाषा कशी टिकवावी आणि भारतीय संस्कृती कशी जपावी यावर भाष्य केले. पुस्तक प्रकाशन प्रमुख रश्मी कुलकर्णी आणि प्रतिमा तुंगार यांच्या आयोजनात, संस्थेची स्मरणिका आणि श्री.सतीश शिरसाठ यांनी लिहिलेल्या ‘मनमंथन लेखन वाचन समूहाचे व्यष्टी अध्ययन अहवालाचे’ विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी तिवारी आणि डॉ. नंदिनी खाडे यांनी केले. आभारप्रदर्शन रश्मी कुलकर्णी यांनी केले.

तृतीय सत्रात कै. चित्रा शर्मा स्मृतिप्रित्यर्थ कवी कट्ट्यात अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. हर्ष वाघमारे व वृंदा भागडीकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. आतिश सोसे हे परीक्षक होते. तर अनुपमाजी शितूत आणि अंजली अहीर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अनुराधा कुलकर्णी प्रथम, कृपा म्हात्रे द्वितीय आणि मंजुषा विश्वेकर तृतीय पुरस्काराच्या तर मेधा घोंगे आशा लांजेवार, प्रेरणा वाडी उत्तेजनार्थच्या मानकरी ठरल्या.

चौथ्या सत्रात विविध कलादर्शन, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. प्रतिमा तुंगार आणि वृंदा भागडीकर ह्या या सत्राच्या आयोजक होत्या. यात मनमंथन समूहाच्या अनेक सदस्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

ह्यात मीना पांडे यांचे सरस्वती वंदन नृत्य, नंदिनी खाडे यांनी गायिलेल्या लावणीवर रश्मी कुलकर्णी आणि मंजुषा विश्वेकर यांचे लावणी नृत्य, तसेच देशभक्ती नृत्य, हर्षा वाघमारे यांचे ‘झुमका गिरा रे’ नृत्य, अलका टिकेकर, प्रतिमा तुंगार यांचा लागलं सोळावं वरीस, वृंदा भागडीकर यांचे, अलका बुरले यांचे तेरे बिन नृत्य, बाई पण भारी हे नृत्य, मीरा घोंगे यांचे तुकडोजी महाराजांचे कीर्तन, माया कारगिलवार आणि मोहन घोंगे यांचे सावरकर लिखित उत्तरक्रिया नाटकावर प्रसंग सादर करण्यात आला. अर्चना सिंगलवार यांचे घुमर आणि सतीश शिरसाठ यांचे अनुभव कथन, साधना कपाळे यांनी सादर केलेली कविता, प्रीती दीक्षित यांनी कर्णावरील कविता इ. अभिनव सादरीकरणाचा यात समावेश होता. शुभांगी तिवारी व प्रेरणा वाडी यांनी गीते प्रस्तुत केली.

शेगावचे हास्य कवी श्री. नितीन वरणकर यांनी आपल्या दोन वऱ्हाडी हास्यकविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सूत्रसंचालन शुभांगी तिवारी आणि आभार प्रदर्शन अलका टिकेकर यांनी केले.

मनमंथनच्या सर्व सदस्यांनी यात हिरीरीने भाग घेऊन, काहींनी आर्थिक मदत करून कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.

पाचवे सत्र ध्वज वंदन करून झाले. शेगाव चे प्रल्हाद जी सुलताने, श्री.विनायक भामरे यांच्या उपस्थितीत ध्वज फडकावून झाले. देशभक्ती गीते आणि नृत्ये सादर करण्यात आली.

असे हे साहित्य संमेलन संस्मरणीय ठरले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments