Wednesday, January 15, 2025
Homeलेखस्त्री म्हणजे…..

स्त्री म्हणजे…..

स्त्री म्हणजे…..

परवशतेच्या नभात तूचि आकाशी होशी
 किंवा
मोक्षमुक्ती ही तुझीचरुपे तुलाच वेदान्ती
या आदरणीय सावरकरांच्या ओळी वाचल्या की स्त्री म्हणजे समाजाच्या दृष्टीने कोण आहे हे कळते. पण स्त्री स्त्रीला तरी, किंवा तिला स्वतःला तरी कळली का ? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे असेच म्हणावे लागेल..

 स्त्री ही घराचे घरकुलात रुपांतर करणारी एक जादूगर आहे. घरदार ,पै, पाहुणे, मुलबाळ, वृध्द, आजारी, अतिथी, भिकारी, परीट, दूधवाला, भाजीवाले, वाणी आणि सहावी सुरी असणारा नवरा या सगळ्यांना, त्यांच्या बोलणं, वागण्याला सांभाळून घेणारा तो एक झुलता साकव असते.
तिच्या मनात अनंत वादळे येतात,पण कुठे, कधी कुणाशी नात्याचे बंध गुंफायचे, कसे विणायचे, हलणारा साकव मनाशी घट्ट बांधून दुःखाचे, अपमानाचे कढ जिरवण्याचं प्रशिक्षण तिला कळत नकळत लहानपणापासून मिळत असतं.

लेकीच्या भूमिकेतून ती आईला, “का सहन करतेस” म्हणणारी स्त्री, आत्मसन्मानाची जाणिव देणारी लेक, स्वतः मात्र आईच्याच संस्काराची कास धरते आणि सगळ्यांना खुश, आनंदी ठेवण्याचं शिवधनुष्य स्वतःच उचलते हे आश्चर्य म्हणाव की स्त्री सुलभता की कर्तव्यपरायणता माहिती नाही. पण स्त्री म्हणजे घरातली मंद तेवणारी तेजोमयता आहे हे खात्रीने.

 स्त्री अनंतकाळची माता असते अस सगळेजण म्हणतात हे सत्य आहेच कारण संवेदनशील मन, परोपकारी वृत्ती, दुसऱ्याच्या भावना जपणं, इतरांच्या तब्येतीची काळजी करुन जे जे शक्य आहे ते करणं, पुरवणं, कितीही रागात असो वा दुःखात, आजारी असो वा स्वपिडीत सगळ्यांच पोट भरणारी आणि जिव्हाळ्यानं, मायेनं सगळं करणारी ती एक अन्नपूर्णा आहे.
संसारासाठी ती सगळ सहन करते, कोणत्याही दिव्याला ती सामोरी जाते. कुणी तिच्या संसारावर, मुलाबाळांवर, घरच्यांवर नजर उचलून पाहिलं की ती चंडिका बनते. तीचं अस्तित्व ती आपल्या कुटुंबात, आपल्या माणसात शोधते. समाजात कितीही मान, पद मिळालं तरी घरातला कोपरा नी कोपरा तिच्या स्पर्शाला आसूसलेला असतो हे ती विसरत नाही.

भांड्यांच्या आवाजावरुन स्वतःच भांड आहे की नाही हे ओळखणारी ही गृहिणी,  समाधानाची मुर्तिमंत प्रतिक असते.
 स्त्री म्हणजे निरागस बाल्य, अवखळ वारा, कणखर नेतृत्व, मायाळू माता, हळवी माया, फुललेल सुगंधी फुल तर  कधी निग्रही वज्रलेप…
स्त्री म्हणजे सहनशक्ती, स्त्री म्हणजे अन्नपूर्णा, स्त्री म्हणजे व्यवस्थापक, स्त्री म्हणजे आरोग्य दायिका, स्त्री म्हणजे प्रधानमंत्री, कुटुंब, कुटुंबातील हरएक खात्याची मंत्री असते. संसारात काटकसर करणारी अकाऊंट, मुलांचे करिअर, त्यांचा सर्वांगीण विकास यांचा ध्यास घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणारी विकास अधिकारी जेष्ठांची सुश्रुषा, त्यांचे आरोग्य आणि त्यांचे कल सांभाळणारी आरोग्य अँडव्हाजर कम सेविका असते. नव-याची सल्लागार, कुटुंबसंगिनी, प्रेमिका आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्याव रात्री ती पतीची प्रणयिनीही बनते. २४ तास न थकणार मशिन म्हणजे स्त्री.
    
 स्त्री म्हणजे ब्रम्हदेवाची अशी कलाकृती आहे की जी प्रतिभावान आहे,ती विचारी असून तर्कशुद्ध विचार करणारी आहे.ती मृदु मुलायम असून कठीण परिस्थितीतही तग धरू शकते.तिच्या डोक्यावर कितीही ओझं असलं तरी संकटांना पार करण्याची तिची तयारी असते. तिचे एकटेपण, आनंद, दुःख, प्रेम, शंका, अभिमान, कौतुक अशा सगळ्या भावना ती अश्रूतून व्यक्त करते पण भावुक होऊन वहावत जात नाही तर कणखरपणे परिस्थिती हाताळते. ती पुरुषालाही तिच्या मताप्रमाणे वागवू शकते आणि चकीतही करु शकते.

स्त्री म्हणजे देवाची एक अदभूत चमत्कृती, घडण आहे.तिला आजवर समाजनामक पुरषवृत्तीने जडून ठेवले असेलही पण तरीही ती समाजात स्वकर्तृत्वाने स्वतःला सिध्द करती झाली.

स्त्री म्हणजे एक अदभूत रसायन आहे.मोहविते मनाला,शांतविते चित्ताला, रिझविते क्षणाला,आनंदिते घराला,उध्दारीते जगाला,वाढवूनी मुलांना,जोपासते संस्कारांना.. स्त्री कन्या, भगिनी, माता, आजी, मावशी, आत्या, काकू अशा सगळ्या नात्यात रमणारी दशभुजा कोमलांगी मायेची देवी आहे.
म्हणूनच स्वा.सावरकर म्हणतात, ती धरित्री म्हणजेच स्त्री….
“मोक्षमुक्ती ही तुझीचरुपे तुलाच वेदान्ती”

— लेखन : सौ.मानसी जोशी. ठाणे

— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments