Tuesday, February 10, 2026
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“बजेट बिजेट”

दरवर्षी आपले देशाचे बजेट लाईव्ह प्रसारित होते. फार पूर्वीपासून देशाचं बजेट हे दर वर्षी २८ फेब्रुवारीला सादर होत आलेलं आहे.

पूर्वी रेडिओ हे एकच विशेष महत्वाचं इलेक्ट्रॉनिक माध्यम होतं. मी आकाशवाणीत निर्माता म्हणून कामाला लागलो. तेव्हा देखील आम्ही बजेटवर कार्यक्रम सादर करायचो. त्यासाठी एक कुणी सत्ताधारी पक्षाचा, एक विरोधी पक्षाचा, एखादा अर्थतज्ञ आणि एखादा पत्रकार अशी मंडळी केंद्रावर यायची. बजेटवर सायंकाळी अर्धा तास एक स्पेशल बुलेटीन हिंदी आणि एक इंग्रजीतून प्रसारित व्हायचं. ते बुलेटीन ते स्टुडीओत बसून ऐकायचे. ऐकता ऐकता काही नोट्स काढायचे. बुलेटीन संपल्यावर आम्ही त्या मंडळींची चर्चा लाइव प्रसारित करायचो.

एके वर्षी ही जबाबदारी माझ्याकडे होती. त्या चर्चेत रुलिंग पार्टीच्या प्रतिनिधीने हे बजेट देशाची आर्थिक गती वाढवणारे, गरिबी दूर करणारे आहे वगैरे वाटले तर विरोधी पक्षाच्या नेत्याला मात्र हे बजेट श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरीबांना अधिक गरीब करणारे आहे असे. तसे ते दोघही अर्थतज्ञ म्हणून ओळखले जायचे. प्रत्येकाने आपापले आकडे तोंडावर टाकून स्वतः जाणकार आहोत हे दाखवून दिले होते. मला बिचाऱ्याला हे बजेट चांगलं का वाईट हे काही लक्षात येईना. असो, मला वाटलं की यांच्यात बजेटचा अर्थ लावण्यात काही प्रामाणिक फरक असेल, पण पुढल्या वर्षी वेगळे जाणकार आले, मी म्हटलं यावेळेस आपणही हे सगळं बुलेटीन त्यांच्या बरोबरच ऐकायचं आणि त्यांची चर्चा ऐकून स्वतः शिकून घ्यायचं. त्या काळी माझं शिकून घ्यायचं वय होतं. पण रेकॉर्डिंग करताना लक्षात आलं की त्यांच्यातही असेच मतभेद आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीने अर्थमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केली तर विरोधी नेत्याने अर्थमंत्र्यावर तोंडसुख घेतले. सत्ताधारीला बजेटमध्ये खूप अपेक्षा दिसत होत्या तर विरोधकाला त्यावर आक्षेप होते. पण बजेटचा अर्थ माझ्या काही लक्षात येईना. त्याच्या पुढल्या वर्षी मात्र सत्तांतर झालं होतं. मी अधिक उत्साहाने ‘बजेट’ची ड्युटी मागून घेतली. माझा सिनिअर माझ्यावर खुश झाला. संध्याकाळी घरी जाऊन बायको बरोबर चहा प्यायच्या ऐवजी हा यडा काम करतोय तर याला करू दे असं म्हणून तो छू झाला. पण मी म्हटलं की आता नवे सरकार आलंय, आता मला बजेट नक्की कळेल. प्रथेप्रमाणे चार तज्ञ स्टुडीओत जमले. लाखो कोटींचे आकडे सांगणारे ते बजेट मी ऐकले. मला त्याचा अर्थ काही लागेना पण नंतर जाणकारांनी बोलायला सुरुवात केली पण परत ‘येरे माझ्या मागल्या’. नव्या सत्ताधारीला बजेट आवडलं आणि नव्या विरोधकाला ते नावडलं. त्यांनी आपापले जुने संवाद एक्स्चेंज केल्यासारखे वाटलं. एकाने हे बजेट गरिबी दूर करणारे आहे वगैरे शब्दात स्तुती केली होती तर दुसऱ्याने हे बजेट श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरीबांना अधिक गरीब करणारे आहे असे म्हटले. मी मध्यम वर्गीय असल्याने मला कळत नव्हतं की माझं काय होणार?

माझ्या लक्षात आलेली गोष्ट एकच, ती म्हणजे बजेट नंतर लगेच सिगारेटच्या किमती वाढत. पण आपलं वैयक्तिक बजेट कोलमडू नये म्हणून मी माझ्या नेहमीच्या ब्रँडची सिगारेट न पिता जरा स्वस्तातली सिगारेट पिऊ लागलो. पण त्यात मजा येईना. काही दिवसांनी जुन्या प्रेमाची आठवण यावी त्याप्रमाणे पुन्हा माझ्या मूळ ब्रँडकडे (विल्स नेवी कट) वळलो आणि आपले स्वतःचे बजेट कोलमडू नये म्हणून जरा कमी सिगारेटी ओढायचा संकल्प केला. तो संकल्प थोडेच दिवसात बोंबलला ही गोष्ट वेगळी. दुसऱ्या दिवशी माझे सिनिअर कलीग्ज बजेट वाचताना त्यातील इन्कमटॅक्स मध्ये काय बदल आहे त्याकडे लक्ष देत आणि वाचून झाल्यावर पुन्हा नाक मुरडत. पण त्यांचे नाक मुरडणे माझ्या नीट लक्षात येईना कारण १९७९-८० साली माझा पाहिला इन्कमटॅक्स कापला गेला तो रु १२३/- फक्त इतका होता. पण त्यात ‘मी एक टॅक्स-पेयर आहे ही भावना मला सुखावत होती’. त्यामुळे मी खुश झालो होतो (तशी माझी ख़ुशी पुढे खूप वाढत गेली, तेव्हा मात्र नको ती ख़ुशी असं झालं.)

आता गेली चार पाच दशके मी अनेक सरकार आलेले गेलेले पाहिले. बजेटचे कार्यक्रम आकाशवाणी नंतर दूरदर्शन वर केले आणि निवृत्त झाल्यावर ऐकत, बघत, आलेलो आहे पण आजही बजेट हे रुलिंग पार्टीच्या लोकांना आवडते आणि विरोधी नेत्यांना ते नावडते. मला मात्र अजून हे बजेट चांगले का वाईट हे कळत नाही. फक्त लाखो कोटींचे आकडे ऐकताना या बजेटमधील एक लक्षांश हिस्सा मला मिळाला तर ? मी कसा कोट्याधीश होइन हा विचार मनात येऊन जातो.

आमच्या काळी एस.एस.सी. नंतर चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी विज्ञान शाखेला जात आणि कमी गुणवाले आर्ट्सला. मी विज्ञानाचा विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, वगैरेचा. आर्ट्सला गेलेलं अर्थशास्त्र, पोलिटीकल सायन्स, वगैरेचे. मला माहित असलेले आर्ट्स चे मित्र सुमार बुद्धीचे होते. त्यामुळे मी स्वतःला जास्त शहाणा समजत आलेलो आहे. पण आता माझ्या लक्षात येतंय की बरं झालं मी सायन्सला गेलो, पण जर का मी आर्ट्सला गेलो असतो तर?….तर आजही मी परीक्षा देत बसलो असतो. हो ! अर्थशास्त्र समजणे लै कठीण हाये.

— लेखन : चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.
(यांच्या “टवाळा आवडे विनोद” या आगामी पुस्तकातून)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments