Saturday, July 5, 2025
Homeलेखअक्का, अशी कशी गेलीस ?😢

अक्का, अशी कशी गेलीस ?😢

आमची स्व.सुशाअक्का उर्फ शालिनी वसंतराव शिंदे राहणार पेठ वडगाव हिचा नुकताच मृत्यू झाला आणि आमच्या वर आकाशच कोसळले.

७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात साडेसात वाजता भाचा सचिन याचा भ्रमणध्वनी वर संदेश आला कि तू आमची, माहेरच्यांची लाडकी लेक, लाडकी अक्का, भाचरांची आत्या, माहेरच्या सर्व नातवडांची आजी व स्व भाऊजींची लाडकी सहचारिणि तुझ्या लेकरांची व सर्व सासरच्या दिर, नणंदां, जाऊ, पुतण्यांची लाडकी निनी, सून, भावजय, जाऊ, पुतण्यांची लाडकी तू एवढेच नव्हे तर शेजारच्या सपाटे व इतर सर्वांची लाडकी, लाघवी तू डाॅक्टर कडे जाताना स्वत:च्या पायाने चालत गाडीत बसणारी तू, ह्रदय विकाराच्या झटक्याने अचानक आम्हा सर्वांना सोडून गेलीस. आम्हा सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

त्या दिवशी भाचा सचिनचा, तू सिरियस झाल्याचा फोन येताच मी ताडकन उठून माझे पती अविनाश यांना सांगितले. आम्ही दोघांनी तातडीने मुलगा वेदांत यास ऊठविले व घरची काळजी घेण्यास सांगून तातडीने पेठ वडगावचा रस्ता धरला.

मनात विचारांचे काहूर माजले होते. पती व मी तुझ्या आठवनी भोवती रेंगाळत होतो. माझे पती यांची लाडकी मेहूणी होतीस तू. ते मला नेहमी म्हणत तुमच्या घरात मिश्किल पणा हा गुण असणारी तू, त्यांच्या जोक्सना उस्फूर्त दाद देणारी दर्दी व्यक्तिमत्व होतीस.
स्व.भाऊजी व तू आदर्श दाम्पत्य. देव गुणांचे भाऊजी व कोंड्याचा मांडा करून संसार करणारी तू.

आपले स्व.वडिल जेव्हा तुझ्याकडे सासरी प्रथमच आले तेंव्हाची आठवण अजूनही आठवते. तू हौसेने त्या वेळेस प्रचलित असलेल्या पितळी नाण्याच्या बांगड्या घातल्या होत्या व वडिल आईस सांगत आले बहुदा सुशिलास सोन्याचा बांगड्या केल्या वाटते ! आम्हाला तुझ्याकडे आल्यानंतर आमचा पाहुणचार करून येताना सुंदर सुंदर रिबीनी देणारी, श्रावणी सोमवारी उपवास सोडण्यासाठी बोलावून आदरातिथ्य करणारी तू. सासरवरून शिकून घेतलेले चविष्ठ चक्युल्या (डाळ फळे) माहेरी करून आम्हाला तृप्त करणारी तू.

शिवभक्त असणारी, उपवासाच्या दिवशी चविष्ट शेंगदाण्याची चविष्ट आमटी करणारी, अंघोळ व स्वयंपाकासाठी लोकांच्या शेतात जावुन खोडवी (सरपण) आणणारी व छोटे भाड्याचे घर शेणाने सारवून सुंदर ठेवणारी तू. पिण्याचे पाणी साठविण्यासाठी काही नसल्याचे कळताच वडिल व आईने तुझ्यासाठी स्टीलचा पिंप घेवून दिल्याचे देखिल आई कडून कळले. अशा खडतर परिस्थितीचा तू माहेरी कधीही उच्चार देखिल करत नव्हतीस. किती किती आठवणी.

नेहमी सर्व कुटुंबियांबरोबर अधूनमधून धार्मिकस्थळाना भेटी देताना एकदा तूला मी म्हणाले, अक्का तुला एकदा विमानप्रवास घडवावा अशी ईच्छा आहे. तर तू म्हणालीस सुनिता मला रेल्वेतून प्रवास करण्याची ईच्छा आहे, मी अजून रेल्वेत बसले नाही. तेंव्हा २०१९ च्या डिसेंबर महिन्यात आपण सर्व कुटुंबिय रेल्वेने सेकंड क्लासचे रिझव्हेर्शन करून तिरूपतीला गेलो. त्या प्रवासात खुशीने फुललेल्या तुझा चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. प्रवासात हौजी गेम मध्ये प्रत्येक वेळी जिंकणारी तू.

स्व. सुशाअक्का

त्या ट्रीप मध्ये आपले ठरले पुढची सहल बद्री केदार. तेही माझ्या इच्छेनुसार विमान प्रवास. पण आक्का, ही संधी तू मला दिली नाहीस. अभागी ठरले मी.स्व सुमनताई प्रमाणे तू देखिल ही संधी मला दिली नाहीस.

आठवणींच्या सोबत आम्ही 3:45 च्या दरम्यान पेठ वडगावला तुझ्या घरी पोचलो. तुझा देह पाहून टाहो फोडला. तुला शेवटचा नमस्कार केला व तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस.

तुझ्या जिव्हाळ्याच्या व्यक्ती कडून समजले मृत्युच्या आदल्या दिवशी तू काही कारणांनी व्यथित होतीस. मला तू संधी दिली नाहीस अक्का. तुझी व्यथा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची. इतकी का ग परकी झाले मी तुला ? कि मला दु:ख सांगायचंच नाही हा वसा तू शेवट पर्यन्त पाळलास ? खरच ज्येष्ठांना ईतके व्यथित जीवन जगावे लागते का ? माझी लाडकी अक्का व्यथित स्थिथित अनंताच्या प्रवासाला गेली.
माझं मन व्यथित झाले आहे. पण का कोणास ठाऊक असं वाटते कि अनंताच्या प्रवासात परमपिता परमेश्वर तुझ्या आत्म्यास नक्की न्याय देईल.
ओम शांती.🙏

सुनिता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर,                            निवृत्त पोलीस उपअधीक्षक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप भावपूर्ण, मनाला सद्गदित करणारा लेख. माझ्या जवळच्या दोन मैत्रिणी गेल्यावर्षी दिवंगत झाल्या. एक इंग्लिश मैत्रिण जूनमध्ये जग सोडून गेली व नुकतीच, ५ आॅक्टोबरला खुप जवळीक असलेली मैत्रीण देवाघरी गेली. त्यामुळे सुनिता नाशिककरांच्या भावना समजू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments