Homeलेखकुटुंब दिनाच्या निमित्ताने..

कुटुंब दिनाच्या निमित्ताने..

नमस्कार मंडळी.
कालच आशा दळवी यांचा, “अशी असावी नाती” हा  स्वानुभव कथन करणारा सुंदर लेख प्रसिद्ध केला आणि आज ; १५ मे रोजी योगायोगाने जागतिक कुटूंब दिन निघाला. वाचु या, या  दिनाची महती. जागतिक कुटूंब दिनाच्या  आपल्या सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा.
— संपादक

भारतीय संस्कृतीत पुर्वी कधीही कुटूंब दिन साजरे केले गेले नाहीत. आता खरच आपल्याला ही गरज वाटावी का मनात प्रश्न आला. त्या निमित्ताने २५, ३० वर्षे मन मागे गेले. स्मृती पटलावर बालपणी अनुभवलेल्या आठवणी जागृत झाल्या.

माझ्या लहानपणी प्रत्येक दिवस हा कुटूंब दिनच होता. पुर्वीच्या काळी प्रत्येकालाच चार, पाच भावंडे असायचीच. त्यामुळे आमच्या पिढीलाही काका मामा, आत्या. तेवढीच चुलत, आत्ये, मामेभावंडे होती. नातेवाईकांचा मुबलक खजिनाच होता म्हणावा लागेल. वर्षभर काही ना काही निमित्ताने एकत्र येणे व्हायचेच आमचे.

माझी आजी म्हणजे बाबांची आई आमच्याकडेच होती. काका, आत्या फार काही लांब नव्हते. आमचे मुंबईत मध्यवर्ती एरिआत घर होते. त्यामुळे यायला जायला काहीच कधी अडचण नव्हती.

माझे आई बाबा हे विठ्ठल रखुमाई  होते घरातील. त्यामुळे देवळातील घंटा रोजच वाजायची. चहापाण्याचा प्रसाद वेळीस नाश्त्याचा प्रसादही मिळायचा सर्वाना.

मामा आलेत किंवा काका, आत्या कधी आलेत हे बघून माझ्या आईच्या चेहऱ्यावर कधीही आठ्या नव्हत्या पाहिल्या. आईनेही दोन कुटूंबाचा संगम साभाळून ठेवला होता. माझे मामा कुटुंबाला घेऊन येणार असतील तर शेजारच्यांच फोनवर कळवून ठेवायचे की शनिवारी येतोय. छोट्याशा वनबेडरूम किचन मध्ये कधीच अडचण वाटली नाही. हल्लीसारखी स्पेसची गरज कधीच वाटली नाही. सगळे खाली अंथरूणे घालून निवांत झोपायचो.

आई किती वेळा किचन मध्ये असायची पण कधी तक्रारही केली नाही. अति आनंदाने आणि प्रेमाने कारायची.
बाबाही तिच्या माहेरच्यांचे स्वागत तेवढ्याच आत्मियतेने करायचे. म्हणजेच त्यावेळेस एकमेकांविषयी आदराची भावना होती. मला कधीच आठवत नाही कौटुंबिक कलह भांडणे, फारसे रूसवे फुगवे आमच्या घरात झालेले. त्यामुळे शांत स्वभावाची आई आणि धावून मदत करणारे वडिल अशीच व्यक्तिमत्वे घरात पाहिली.

आम्ही आमच्या काकांच्या घरी जाऊन डब्यातील खाऊ काढून बिनधास्त खायचो पण कोणीही आम्हाला रागावले नाही. आत्यासुध्दा अगदी हक्कानी यायच्या. दरवेळेस काही ना काही खाऊ घेऊन यायच्या किंवा खाऊचे पैसे देऊन जायच्या. शनिवारी, रविवारी राहायल्या तर पहाटे पासून मोठ्या मंडळीच्या चाय पे चर्चा सुरू असायच्या.
आजी जरी आमच्याकडे होती तरी तिची औषध पाण्याची जबाबदारी छोट्या काकांनी घेतली होती. तसेच आत्या, दुसरे काका वेळोवेळी तिला पैसे द्यायचे म्हणजेच सगळे कसे समजुतीने, जबाबदारीचे भान ठेवून होते.

एकमेकांच्या भावनांचा ही आदर होता तिथे. कितीही पाहुणे आले तरी आर्थिक गणिताची अडचण नव्हती. सगळे सणवार, लग्न कार्ये एकमेकांच्या मदतीने पार पडली. भावनिक, आर्थिक, मानसिक अडचणी एकमेकांच्या आधाराने पार पडल्या. नात्यात एक पारदर्शकपणा होता. जेलसीला तर थाराच नव्हता. लपवाछपवी नव्हती. आमचे पाहुणे आणि पाहुण्यांना शेजारी हे ही एकमेकांना माहित होते. आजीवर सगळ्यांचे प्रेम होते. म्हातारपणी भावनिक आधार तिला मिळालेला पाहिला.

किती गोष्टी कळतनकळत मनावर संस्काराच्या रुपात मिळाल्या. आईने केलेली व्रतवैकल्ये जवळून पाहिली आम्ही. चांगले विचार, आचरण, दुसऱ्याच्या प्रति करूणा भाव, आदर ह्या गोष्टी काय असतात त्या पाहिल्या. बाबांचा भावंडाप्रति प्रेम भाव, धावून मदत करण्याची वृत्ती, न कळतच ही बिजे मनात रूजली गेली. संस्कार करावे नाही लागत तर पिंडावर आपोआपच होत गेले. 

थोडक्यात रिलेशनशीप मॅनेजमेंट, शेअरिंग, मोठ्यांचा आदर, काळजी. राहणीमानातील साधेपणा किती गोष्टी शिकलो आम्ही आमच्या घरातील मोठ्यांकडून. दिवाळीत आणि उन्हाळ्या सुट्टीत कोणी ना कोणी भावंडे यायची तेंव्हा विंटर कॅप किंवा समर कॅप घरीच व्हायचा वन बीचके मध्ये.

किती लिहीले तरी कमीच पडेल इतके अनुभवलेले बालपण आठवणीत साठवले गेले. आजच्या काळात नात्यांची दैन अवस्था, वेगळी झालेली मने,  तुटलेली रक्ताची नाती अहंकारामुळे, वाजवी अपेक्षामुळे पैशाच्या हव्यासामुळे एक ना अनेक कारणे. समजत नाही कुटूंब व्यवस्थेचा परिणाम समाजव्यवस्थेवर झालाय की समाजव्यवस्थेचा कुटूंब व्यवस्थेवर ? आणि बहुधा जगभरात बदलत चाललेली ही परिस्थिती लक्षात घेऊन १९९४ सालापासून १५ मे रोजी जागतिक कुटूंब दिन साजरा करायला सुरूवात झाली !

ईश्वरालाच प्रार्थना करते की पुर्वीसारखे दिवस आजच्या पिढीला अनुभवायला मिळू दे.

— लेखन : सौ शलाका कुळकर्णी. नेदरलॅंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारा खूप छान लेख आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबातील हे वर्णन असल्याने सर्वच वाचकांना ते आपलेसे वाटेल आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. परदेशात राहून सुद्धा लेखिका एकत्र कुटुंबपद्धतीची स्तुती करताना पाहून मनापासून आनंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६