माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील उत्कृष्ट छायाचित्रकार, गोड स्वभावाचे, अजातशत्रू म्हणून ओळख असलेले विजय होकर्णे नियत वयोमानानुसार आज, ३१ डिसेंबर २०२२ रोजी निवृत होत आहे. या निमित्ताने त्यांच्या गौरवशाली जीवनाचा हा परिचय….
एखाद्या शुर सैनिकाप्रमाणे, वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावत अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत छायाचित्रण करणारे विजय होकर्णे आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत, या वर खरं तर अजूनही विश्वास बसत नाही. काही व्यक्ती असतातच अशा की वाटते, या निरंतर सेवारत राहणार आहेत.त्यांची कार्य शैली, जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन, इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, स्वभावातील गोडवा, आपलेपणा असे अनेक गुण त्या व्यक्तीच्या अंगी असतात. विजय होकर्णे हे असेच एक व्यक्तिमत्व आहे.
खरं म्हणजे १७ डिसेंबर १९६४ रोजी जन्मलेले विजय होकर्णे यांची शैक्षणिक अर्हता छाया चित्रकाराच्या पदासाठी लागणाऱ्या पदापेक्षा किती तरी अधिक आहे.ते बीए पदवीधर तर आहेच पण त्यांनी मास्टर ऑफ जर्नालिझम ही उच्च पदवी देखील प्राप्त केली आहे.
विजय होकर्णे १९८२ साली स्वतंत्र व्यवसायी छायाचित्रकार म्हणून छायाचित्रण क्षेत्रात आले. तर जुलै १९८७ मध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात छायाचित्रकार म्हणून रुजू झाले.
सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे त्यांनी केवळ पाट्या टाकणारी सरकारी नोकरी कधी केलीच नाही. नांदेड येथे कार्यरत राहिल्याने त्यांचा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशी घनिष्ट संबंध निर्माण होणे साहजिकच होते. पण या संबंधांमुळे त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही. वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांच्यावर त्यांच्या संबंधांचा त्यांनी कधीही दबाव आणला नाही.
भूकंप, महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीत, दंगली आणि अन्य मानव निर्मित आपत्तीत होकर्णे यांनी केलेले छायाचित्रण नेहमीच वाखाणण्याजोगे ठरले आहे. खऱ्या अर्थाने ते “व्यावसायिक” छायाचित्रकार आहेत.
होकर्णे यांनी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी येथील भूकंप व मदत व पूनर्वसन कामाचे सतत काही महिने छायाचित्रण केले.तर पूर परिस्थिती व महापुराच्या भयानक परिस्थितीत ही वेळ प्रसंगी हेलिकॉप्टर मधून छायाचित्रण केले आहे. हेलिकॉप्टर मधून सोडलेल्या दोरखंडाला आपल्या चिमुकल्या बाळाला पोटाशी घेऊन लटकलेल्या माऊलीचे छायाचित्र तर लोकराज्य मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले. आजही ते छायाचित्र डोळ्यापुढे येते, ज्यातून महापुराची भीषणता, त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचे भाव आठवतात!ही त्यांची छायाचित्रे इतकी उत्कृष्ट होती की, पुढे या छायाचित्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते.

होकर्णे यांनी नियमित छायाचित्रण करण्याबरोबरच कला, साहित्य, संस्कृती अशा विविध बाबींचे देखील उत्कृष्ट छायाचित्रण केले आहे. त्यांचे एक विशेष म्हणजे, त्यांनी आजपर्यंत काढलेली सर्व छायाचित्रे व्यवस्थित जतन करून ठेवली आहेत. त्यामुळेच त्यांच्या काही छायाचित्रांची प्रदर्शने आयोजित करता आली आहेत. तर वेगवेगळी पुस्तके, ग्रंथ यासाठी
छायाचित्रांची गरज पडल्यास त्यांची हटकून आठवण येते आणि ती छायाचित्रे त्यांच्याकडून मिळतातही !
होकर्णे यांचे काही उल्लेखनीय कार्य पुढील प्रमाणे नमूद करता येईल.
प्रख्यात पक्षी तज्ज्ञ श्री. मारुती चित्तमपल्ली यांच्या सोबत पर्यावरण, निसर्ग, पक्षी, वन्यजीवन यांचे छायाचित्रण व संग्रह.
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय, धार्मिक सण उत्सव परंंपरेचा गेल्या 40 वर्षातील ऐतिहासिक, सामाजिक राजकीय घडामोडीचा स्वतंत्र छायाचित्र संग्रह.
• माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनपटावर आधारित “गोदाकाठचा महान कर्मयोगी” या माहितीपटाची निर्मिती. हा माहितीपट दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये प्रदर्शीत.
• नांदेड येथे शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाच्या उभारणीतील योगदानाबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याहस्ते सन्मान.
महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व बीएनएचएस या संस्थेचे सदस्य असलेल्या होकर्णे यांचा शासकीय, सामाजिक पातळीवर वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे. यातील काही सन्मान पुढीलप्रमाणे आहेत.
• राज्य शासनाचा सन 2010 व 2014 सालचा केकी मुस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार.
• १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जेष्ठ छायाचित्रकार म्हणून सन्मान.
• पूर परिस्थिती व महापुराच्या वास्तव छायाचित्रांच्या
“चित्रबोली” या प्रदर्शनाबद्दल मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव.
• श्रीक्षेत्र रेणुका देवी माहूर येथील महाकवी संत श्री विष्णुदास पुरस्कार 2005-2006 मध्ये साधनाताई आमटे यांच्या हस्ते प्रदान.
• ऑल इंडिया शास्त्रीय सोशल फोरम, दिल्लीचा महाराष्ट्र सेवा रत्न गौरव पुरस्कार.
असे हे विजय होकर्णे शासकीय सेवेतून जरी निवृत्त होत असले तरी त्यांनी छायाचित्रण क्षेत्रातून मात्र निवृत्ती न पत्करता अधिकाधिक सक्रिय व्हावे,अशी अपेक्षा आहे. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक. ☎️ 9869484800