Saturday, January 31, 2026
Homeलेखअजित दादा : वरून कठोर, आतून मऊ !

अजित दादा : वरून कठोर, आतून मऊ !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईहून बारामती येथे विमानाने निघाले होते. पण बारामती जवळ विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्यासह विमानात असलेले सहकारी देखील या अपघातात दगावले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सेवेमुळे, कामानिमित्त दादांशी अनेकदा संबंध येत असे. त्यांची काही जाणवणारी ठळक वैशिष्ट्ये म्हणजे ते अतिशय वक्तशीर होते. तसेच कामाच्या बाबतीत त्यांना अजागळपणा अजिबात खपत नसे. त्यांच्या रोखठोकपणे बोलण्याच्या सवयीमुळे, विषयाच्या सखोल अभ्यासामुळे त्यांच्याकडे जाणारे अधिकारी अभ्यास करूनच जात असत.

आमच्या बाबतीत बोलायचे झाले तर स्वतः दादांचा शुद्ध लेखनावर फार भर असे. कित्येकदा आमच्या मसुद्यातील र्‍हस्व दीर्घ, अन्य चुका ते शोधून काढत आणि स्वतः त्या हाताने दुरुस्त करून मसुदा परत देत असत. खरे म्हणजे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यानी इतक्या बारकाईने मसुदा वाचणे अपेक्षित नसते. पण या बाबतीत दादांचा फार कटाक्ष असे.

दादांनी ज्या ज्या खात्यांची मंत्री पदे भूषविली, त्या त्या सर्व पदांना त्यांनी न्याय दिला. बघतो, सांगतो अशी टोलवाटोलवी ते कधी करीत नसत. काम होण्यासारखे असेल तर लगेच झाले पाहिजे आणि होण्यासारखे नसेल तर स्पष्टपणे नाही सांगून मोकळे झाले पाहिजे, असे ते अधिकार्‍यांना जसे सांगत असत, तसेच ते स्वतः ही आचरणात आणत असत.

वर करणी कठोर, रोखठोक वाटणारे दादा वेळ प्रसंग पाहून मिश्किलपणे देखील बोलत असत. स्वतः अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवित राहिल्याची त्यांना खंत वाटत असे पण एकदा जाहीरपण बोलताना, “आमची गाडी उपमुख्यमंत्री पदावर येऊनच अडकतअसते” असे ते म्हणाले होते.

काही महिन्यांपूर्वी दादांचे अनेक वर्षे जनसंपर्क अधिकारी राहिलेले आमचे सहकारी संजय देशमुख यांचे अकस्मात निधन झाले, त्यावेळी दादा मुंबई बाहेर होते. पण मुंबईत आल्या आल्या, त्यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे, ती म्हणजे देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. काही मदत लागली तर ती हक्काने सांगा, असे म्हणुन धीर दिला. त्यांच्या खाजगी सचिवांना त्यांनी लगेच तशा सूचना दिल्या. आता स्वतः दादाच गेले. त्यांच्या बद्दल लिहू तितके थोडेच. असो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9