उद्धवस्त धर्मशाळा, निखारे, कोर्ट मार्शल, ब्रोकन इमेजेस या चर्चानाट्याच्या प्रवाहातलं, स्वतःच्या स्वतंत्र वाटा निर्माण करणारं डॉ. श्याम शिंदे लिखित व दिग्दर्शित ‘लुई दागेरी ते पिकासो’ हे दोन अंकी नाटक नुकतेच सादर झाले.
मराठीत अशी मोजकी नाटके आहेत जी प्रेक्षकांना सर्वांगाने विचार करायला भाग पाडतात आणि हे नाटक निश्चितच त्या परंपरेत स्थान मिळवणारं आहे. कलाक्षेत्रातील AI चा वाढता शिरकाव व त्याचे उमटणारे पडसाद हा विषय दोन अंकी नाटकातून रंगमंचावर उभं करण्याचं आव्हान अहिल्यानगर येथील सप्तरंग थिएटर्सच्या कलाकारांनी लीलया पेलले.

महाभारतातील कर्ण, कृष्ण व अर्जुन यांच्यातील युद्धाच्या प्रसंगाने नाटकाचा पडदा उघडतो. ‘राधेय’ या AI-निर्मित चित्रपटातील एक प्रसंग असल्याचे नंतर उलगडते. धर्म–अधर्म, नैतिकता व त्यातील ‘सोयीस्कर अर्थ’ यावर केलेले भाष्य प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. तब्बल ९०० कोटींची कमाई करणारा या सिनेमाचा निर्माता जतीन शाहच्या यशकथा, मीडिया मुलाखती, ग्लॅमरस सक्सेस पार्टीतून नाटकाचा पहिला अंक पुढे सरकतो. अभिनेता अभिजीत, कला-दिग्दर्शक सुहास यांच्या आत्महत्येस शाहला कारणीभूत ठरवतो. त्या क्षणी नाटक मर्डर मिस्ट्रीच्या दिशेने जात असल्याचे जाणवते.

नाटकाच्या दुसऱ्या अंकात चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात एआय विरुद्ध कलावंत यावर चर्चा रंगते. त्यातून अभिजीतने केलेले कृत्य हे एआयच्या धोक्याविषयी असल्याचे स्पष्ट होते.
नाटकाचा प्रभावी शेवट :
लुई दागेरीच्या फोटोग्राफीने पिकासो किंवा इतर कोणत्याही चित्रकलेला कधीच धोका निर्माण केला नव्हता; उलट कलाकारांनी नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारत स्वतःला अधिक जिद्दी व सर्जनशील बनवले. नव्या माध्यमाच्या उदयाने कला संपत नाही, तर ती नव्याने फुलते, ही खूबी नाटकात प्रभावीपणे मांडली आहे. AI मुळे निर्माण होणारी भीती, संभ्रम आणि विरोधाभास नाटकाने वास्तवदर्शी पद्धतीने रंगमंचावर आणले आहेत. चर्चा, मतभेद, संभ्रम व सकारात्मक दृष्टिकोन हे सगळं नाटक प्रेक्षकासमोर अत्यंत विश्वसनीयतेने उलगडतं. आधुनिक तंत्रज्ञान व मानवी सर्जनशीलता यांच्यातील संबंधावर नाटकाने घेतलेली भूमिका सुसंगत, परिणामकारक आणि दूरगामी ठरते. ‘लुई दागेरी ते पिकासो’ हे विचारप्रधान, तांत्रिकदृष्ट्या प्रयोगशील आणि संदेशप्रधान नाटक आहे. प्रेक्षकांना AI बद्दलची ज्ञानवृद्धी, तंत्रज्ञानभय आणि सर्जनशीलतेची भविष्यातील दिशा यावर विचार करायला भाग पाडते.
भावनिक व बौद्धिक वजन देणारी पात्रे :
अविनाश कराळे यांनी निर्माता जतीन शहा साकारताना निर्मात्याच्या लकबी, हालचाली, त्याचे यशापयश, मनातली शल्य, अहंकार, भावुकता सगळंच इतकं नेमकं पकडलं की पात्र रंगमंचावर अक्षरशः जगत असल्याचा भास होत होता. सागर अधापुरे (राजमाने) यांनी आव्हानात्मक व्यक्तिरेखेचे हलके–जड सर्व रंग अत्यंत कसदाररीत्या रंगमंचावर साकारले. सुनील लांबदाडे, शिवाजी रणसिंग, गणेश पवार, पायल कोरके, सायली ढमाळ,अंजना पंडित, अजयकुमार पवार, काशीनाथ सुलाखे, प्रा. सुनील कात्रे, आकाश मूनफन, राजकुमार मोरे, जागृती पाटील, आकांक्षा शिंदे, कल्पेश शिंदे, गणेश देशपांडे, दीपक तुपेरे, ओंकार बोथेकर या पात्रांनी नेमका प्रभाव टाकत नाटकात रंगत आणली.
उत्तम तंत्रज्ञांची साथ :
नेपथ्य व प्रकाशयोजनेतुन महाभारताच्या ग्लॅमर सीनची उत्तम वातावरणनिर्मिती केली. नाटकात पारंपरिक व आधुनिक पार्श्वसंगीताचा संतुलित वापर केला. रंगभूषा व वेषभूषेतून दोन वेगवेगळ्या कालखंडांची छाप स्पष्टपणे उठवली आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
