Thursday, October 16, 2025
Homeयशकथाअन्वय: आशेचा किरण

अन्वय: आशेचा किरण

नवी मुंबईतील प्रा डॉ. अजित मगदूम व त्यांच्या पत्नी प्रा वृषाली मगदूम या प्राध्यापक पतिपत्नीनं कॉलेजच्या ४ भिंतीतच शिकवण्यावर समाधान न मानता सतत साहित्य सेवा, पत्रकारिता आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून समाज कार्य केलं आहे आणि अजूनही करीत आहेत. त्यांनी मिळून सुरू केलेले अन्वय व्यसनमुक्ती केंद्र हे एक महत्त्वाचे सामाजिक कार्य. अन्वय विषयी सांगताहेत संस्थेचे संचालक डॉ अजित मगदूम सर..

काही वर्षांपूर्वी पुण्यात एका तारांकित  हॉटेलमध्ये आठवी नववीच्या मुलांनी एक चिल्लर पार्टी आयोजिली होती. ज्यात बिअरच्या  मुक्त वापरास मुलामुलींना पूर्ण मुभा होती. माझ्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला.

यासंदर्भात आपण काही तरी केले पाहिजे असं वाटत होतं. त्याचवेळी नवी मुंबईत कचरा वेचणाऱ्या महिलांच्या प्रश्नावर काम करतांना सामाजिक कार्यकर्ती तथा माझी पत्नी प्रा. वृषाली मगदूम हिच्या लक्षात आले की दारु समस्येवर उपचार  करणारी इथं एकही संस्था नाही.  म्हणून आम्ही दोघांनी अन्वय व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना २०१२ मध्ये केली.

आज ९ ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रे कार्यरत आहेत. या व्यसनांच्या वाढत्या समस्येबाबत ज्यांना आस्था आहे असे अनेक लोक अन्वयशी जोडले गेले. त्यातुनच  १८ प्रशिक्षित समुपदेशकांची भक्कम टीम या व्यसनमुक्ती सेवेत उभी राहिली.

विविध उच्च पदावर काम केलेले अनिल लाड, उदय तिळवे, मल्लिका सुधाकर, ज्ञानेश्वर भोगले, मनोहर तांडेल यांच्या सारखे अन्य क्षेत्रातील अनुभव गाठीशी असणारे, तर आरती खेडकर, अजित मगदूम, मरियमा, संगीत गुंडाळ, स्वप्न गर्गे हे शिक्षण क्षेत्रातले असून, मुक्ता महापात्रा, उमा वैद्यनाथन या तर सामाजिक कार्यकर्त्याच आहेत, तर पुष्पा कांबळे, शशिकला मूल्या, लता कोठावळे या समाज कार्याच्या आवडीने  या कामाशी जोडल्या गेल्या आहेत.

विषेश म्हणजे हे सारे जण मानधन न घेता सेवाभावी वृत्तीने काम करणारे असून व्यसनींकडूनही कोणतीही फी घेतली जात नाही. आजवर ३००० व्यसनींना व्यसनाच्या विळख्यातून सोडविण्याचं काम केले असून ३८००० विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनविरोधी जाणीव जागृती कार्यक्रम केले आहेत.

दरवर्षी प्रमाणे, यावर्षी देखील ३१ मे ‘जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस’ अन्वय व्यसनमुक्ती केंद्राने तंबाखूतले विषारी घटक, परिणाम, उपाय विषयक पत्रके वाटून तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जाणीव जागृती केली. छ. शिवाजी चौक वाशी, वाशी रेल्वेस्टेशन आणि नेरुळ स्टे. परिसरात रिक्षा चालक, बस चालक आणि इतर नागरीकांनादेखील पत्रकांचे वाटप करून जन जागृती मोहीम पार पडली.यासाठी अन्वयच्या समुपदेशकांनी सहभाग घेतला.

यावेळी फरक हा दिसला की अनेक रिक्षा चालकानी पत्रके आम्हीही वाटतो म्हणून मागून घेतली.

कोविड महामारी सुरु असताना तंबाखूचा फुफ्फुसे व श्वसनयंत्रणेशी संबंध येत असल्याने या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रतिवर्षी ३१ डिसेंबर च्या संध्याकाळी ‘नववर्षाचं स्वागत शुध्दीत करु या, धुंदीत नको‘ ही  संकल्पना घेऊन  जाहीर कार्यक्रम पोलीस विभागाच्या मदतीने वाशी रेल्वे स्थानकासमोर घेत असतो. या कार्यक्रमात तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. प्रभात रंजन तसेच मा. हेमंत नगराळे हेही त्या त्या वर्षी सहभागी झाले होते.

जय मल्हार मालिका आपल्या खंडोबाच्या भूमिकेने गाजविणारे, लोकप्रियतेच्या शिखरावर  असताना अभिनेते देवदत्त नागे हे येवून शालेय व महाविद्यालययीन विद्यार्थ्यांना त्यांनी निर्व्यसनी राहण्यासाठी संदेश आणि शपथ दिली. तसेच प्रतिवर्षी नोव्हेंबर मध्ये महाविद्यालयीन युवकांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. नवी मुंबईतील तसेच मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असतात.

नेरुळ येथील एस आय ई एस  कॉलेज आणि अन्वय च्या सहयोगानं प्रतिवर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने “स्वतःवर प्रेम करू या  व्यसनमुक्त राहू या
या  टॅगलाईनवर   व्यसनमुक्तीसंबंधी फलक हातात घेऊन कॉलेजपासून ते नेरुळ स्टेशनपर्यंत एक भव्य रॅली काढली जाते. रॅलीच्या आधी कॉलेजच्या हॉलमध्ये अन्वय तर्फे जाणीव जागृती केली जाते. तसेच दरवर्षी  २६ जून रोजी  जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम घेतला जातो.

अन्वयच्या व्यसनमुक्तीच्या कामातील योगदानाबद्दल २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने अन्वय संस्थेचे संचालक डॉ अजित मगदूम यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान केला आहे.

आज कोणतीही आपत्ती, साथरोग, किंवा कोविडसारखी महामारी असो यात जेव्हडे मृत्यू होतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनानं होतात. प्रतिवर्षी तंबाखू सेवनामुळे भारतात १२ लाख लोक मृत्यूला कवटाळतात. आपल्या देशात  २९ % लोक तंबाखू चा वापर करतात यात १५ % युवकांचा समावेश आहे ही बाब खूप गंभीर आहे.

गँट्सच्या अहवालाने भारतात मुलींच्या धूम्रपानाचा प्रमाण वाढल्याची विशेष नोंद केली आहे. आम्ही व इतर संस्था तम्बाखुच्या दुष्परिणामांबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत असतो. पण दुसऱ्या बाजूला आपल्या छुप्या पण वेधक जाहिरातींद्वारे कुमारवयीन व युवकांवर कशी भुरळ पडेल याकडे तंबाखू उत्पादकांची एक स्वतंत्र यंत्रणा काम करत असते.

मध्यंतरी  ई सिगरेटचं एक अतिशय आकर्षक उत्पादन बाजारात आणलं आणि सारी तरुणाई त्याकडे झेपावली. त्याचं दोन तीन वर्षात युवा वापरकर्त्याचं प्रमाण मुलांमध्ये दोनमध्ये एक तर मुलींचं सात मध्ये एक इतकं प्रचंड वाढलं. २०१९ मध्ये त्यावर भारत सरकारने बंदी आणल्याने हे प्रकरण आटोक्यात आले. तसेच हुक्का पार्लरवरही बंदी आणण्यात आली.

एकंदर सरकारने दारु, तंबाखू इ. मधून मिळणारे महसूल उत्पनाला पर्याय शोधून दारूबंदी, तंबाखू बंदीचं धोरण काटेकोरपणे राबविल्यास व्यसनांना आळा बसून, येणाऱ्या पुढील पिढ्या या धोक्यापासून वाचतील.

– लेखन : डॉ अजित मगदूम.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. डाॅक्टर अजित मगदूम
    ‘अन्वय :आशेचा किरण ‘
    हा लेख खरंच खुप छान
    आज समाजाला ह्या गोष्टी ची
    खुप नितांत गरज आहे.
    आपल्या कायॅ ला मनापासून शुभेच्छा व प्रणाम 🙏

  2. ‘ अन्वय : आशेचा किरण ‘ हे आमच्या व्यसनमुक्तीच्या
    कामाविषयीचं फिचर खूप आवडलं.
    शीर्षकापासून ते समारोपापर्यंत आपल्या संपादन स्रुजनाच्या सुंदर खुणा लेख वाचनस्नेही करत जातात.
    हा लेख आम्हा सर्वांचा उत्साह, हुरूप वाढवणारा आहे.
    आमच्या कामाला व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल
    आम्ही सर्व कार्यकर्ते आपले ऋणी आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप