अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह या डोंगरी जंगलात काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी संभाजीनगर होऊन आमचा जथ्ता ज्यात 15-20 महिला आणि तेवढेच पुरुष, अशी गाडी भर माणसं होती, निघालो. दिवसभराचा हसत खेळत प्रवास करीत मुक्कामासाठी रात्री सेमाडोहच्या वनखात्याच्या विश्राम ग्रहावर आम्हाला पोहोचायचे होते. तसेच सर्व नियोजन केलेले होते. सगळी मंडळी मध्यमवयीन , मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित , त्यामुळे दिवसभराच्या प्रवासातील गप्पा, गाणी, हास्यविनोद यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. जेवणाचा डबा प्रत्येकाने आणलेला होता. साधारण दिवे लागणीनंतर अमरावती शहराबाहेर सेमाडोह च्या रस्त्याला लागल्यानंतर सोबतचे अन्न रात्रीचे जेवण म्हणून गाडी थांबून खायचे असे ठरलेले होते. तत्पूर्वी अमरावती शहरातील देवीच्या प्रख्यात देवळात जाऊन आम्ही सर्वांनी दर्शनही घेतलेले होते .
दिवस हिवाळ्याचे होते, थंडीचे होते त्यामुळे अंधार लवकर पडू लागला. गाडी थांबल्यावर सोबतच्या महिलांनी सर्व डबे, सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. दशम्या, धपाटे, चपात्या, विविध प्रकारच्या भाज्या, लोणची, चटण्या अशी भरपूर शिदोरी जमली. कागदी प्लेटमध्ये सर्वांना अन्न दिले गेले. शेवटी सर्वांना केळीही दिली गेली. आम्ही सगळे खाऊन पिऊन तृप्त झालो.
पण अन्न मात्र बरेच उरले आता हे कोण खाणार ? ते वाया जाणार की काय ? असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला होता. पूर्णब्रह्म म्हटले जाणारे हे अन्न आता वाया जाणार आणि आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार या कल्पनेने सर्वच जण अस्वस्थ झालेले होते. कारण अन्न टाकून द्यायचे कोणाच्या संस्कारात बसणारे नव्हते. तेवढ्यात आमच्या ग्रुपमधील काही कार्यकर्ते मंडळी सडकेच्या दोन्ही दिशांना लांब वर जाऊन रेकी करून म्हणजे पाहणी करून आली. थोड्या अंतरावर सडकेचे काम करणारी अनेक कुटुंबे तात्पुरता निवारा उभारून बसलेली आहेत हे त्यांना आढळले. कार्यकर्ते त्यांना भेटले. म्हणाले,”आमच्या सोबत ची पुष्कळ शिदोरी उरलेली आहे. तुम्हाला दिली तर चालेल का ? तुम्ही खाल का ?” ते सगळे गरीब मजूर बहुदा अमराठी असावेत किंवा अमरावती जिल्ह्याच्या डोंगरी भागातील वनवासी असावेत. त्यांना आमचे म्हणणे कळले, त्यांनी अत्यंत आनंदाने होकार दिला. त्यांच्यातील प्रमुखाने त्यांच्या भाषेत पालावरच्या सगळ्यांना हाळी दिली तसेच सगळे जमले, बायका मुले म्हातारे कोतारे, तरुण सगळेजण .आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने आमच्या बस कडे आले. सोबतच्या दशम्या, धपाटे आणि चपात्यांचा गठ्ठा आणि भाज्या एकदम त्यांना सगळं देऊन टाकून तिथून आम्हाला तात्काळ निघून जाता आले असते. पण असे करण्याऐवजी आपण या सर्वांची पंगत बसवू आणि कागदी प्लेटमध्ये अन्न वाढवून त्यांना व्यवस्थित जेवायला घालू असे ठरले .
ताबडतोब ती सगळी मंडळी मोठ्या शिस्तीत ओळीने रस्त्याच्या कडेला थोडे अंतर सोडून बसली. आम्ही सर्वांनी सोबतची शिदोरी प्रत्येकाला नीट वाढली .आमच्या सोबतच्या पाण्याच्या उरलेल्या बाटल्या केळी हेही सर्वांना वाटून टाकले. ते साधेसूधे पण घरगुती अन्न खातानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान त्या मिणमिणत्या प्रकाशात आम्हाला विलक्षण पुलकित करून गेला! खाणे आटोपल्यावर सर्व कागदी प्लेट्स, केळीची साले इत्यादी ही त्यांनी न सांगता नीट गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. आम्हाला हात जोडून नमस्कार केला आणि आशीर्वाद ही दिले .
आपण एक चांगले काम केले, जणू तीर्थयात्राच केलीये असे भाव आम्हा सर्वांच्या मनात दाटून आले.

— लेखन : सुधीर सेवेकर. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
