अहमदनगर येथील युवा लघुपट दिग्दर्शक स्वप्निल विलास झांबरे याच्या “अभिमन्यू” या लघुपटाची इटलीच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नुकतीच निवड करण्यात आली. आणि स्वप्निलने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
न्युज स्टोरी टुडे चे विशेष प्रतिनिधी, श्री मिलिंद चवंडके यांच्याशी स्वप्निलने केलेली ही पहिलीच दिलखुलास बातचीत…….
अहमदनगर शहराचे उपनगर असलेल्या सावेडी भागातील रासनेनगरमध्ये स्वप्निलच्या निवासस्थानीच याची भेट झाली. दिलखुलास गप्पांच्या ओघात स्वप्निलची मुलाखत घेतली. स्वप्निलच्या जीवनातील ही पहिलीवहिली मुलाखत…..
स्वप्निल हा सावेडीमधील श्रीसमर्थ विद्या मंदिरचा इयत्ता दहावी पर्यंतचा विद्यार्थी. रंगभूमीवरील मित्रांची नाटकं पहाण्याचा छंद शालेय जीवनापासून सोबत करत असला तरी अभ्यासाचे ओझे पेलताना हाच छंद पुढे करिअर म्हणून पुढ्यात येईल असे त्याला वाटलेही नाही ! पुण्यामधून स्वप्निलने इंजिनीरिंगचे व एम.बी.ए चे शिक्षण घेतले आहे. मात्र अंतरीची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. त्यात जवळचे मित्र अमेरिकेमध्ये नोकरीत रूजू झाले असले तरी स्वप्निलने प्रगत देशांमधील फिल्मचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भारतातच रहाण्याचा व आपल्या देशाला चित्रपट क्षेत्रातून अमोल योगदान देण्याचा दृढ निश्चय केलेला. स्वप्निलचे हे देशप्रेम देशाभिमानाचे दर्शन घडवणारेच !
घराण्यात कलेचा वारसा नसतांना स्वप्निलने चित्रपटनिर्मितीचे स्वप्न उराशी बाळगत आत्मविश्वासाने पावले टाकण्याचा शुभारंभ केलाय.
सर्वप्रथम युट्युब आणि गुगलवरून शाॅर्टफिल्म बनवण्याचे ज्ञान देणारी पुस्तके डाऊनलोड करून प्रिंट काढत त्याने अभ्यासाचा श्रीगणेशा केला. प्रसाद नामजोशी लिखित शाॅर्टकट, स्क्रीन रायटींग फाॅर डमीज, बेसिक फिल्म मेकिंग, फिल्म मेकिंग फाॅर डमीज अशी एकापाठोपाठ एक पुस्तकं वाचली.
शाॅर्टफिल्म तयार करण्याचे ज्ञान पुस्तकांआधारे घेताना २०१५ साली पहिली शाॅर्टफिल्म पुणे येथे तयार केली. ती युट्युबवर लाॅच करण्यास तब्बल दोन वर्षे लोटली. ३० मिनिटांची ही शाॅर्टफिल्म २०१७ मध्ये युट्युबवर झळकली. त्यानंतर २०१८ मध्ये ‘शुगर अँड साॅल्ट’ ही शाॅर्टफिल्म मुंबईमध्ये तयार करताना क्रिएटिव्ह डिरेक्टर, प्रोड्युसर आणि ऍक्टर अशी तिहेरी भूमिका स्वप्निलने यशस्वीपणे पार पाडली. आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला या शाॅर्टफिल्ममध्ये घेण्याची कामगिरीही बजावली. युट्युबवर या फिल्मने खूप सारी प्रसिद्धी व प्रशंसा मिळवली. त्यामुळे उत्साह दुणावला, असे सांगताना स्वप्निल भूतकाळातील आठवणीत रमतो.
बेंगलोर येथील इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कलाकारी फिल्म फेस्टिव्हल, अमेरिकेतील फस्ट सेशन फिल्म फेस्टिव्हल यामध्ये स्वप्निलच्या शाॅर्टफिल्मने वेगळेपणाचा ठसा उमटवलाय. मानाचे अवॉर्ड्स सुध्दा पटकावलेत.
२०२० मध्ये स्वप्निलने स्वतः लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘अभिमन्यू‘ या लघुपटाची निर्मिती झाली. अमेरिकेच्या ‘फर्स्ट टाईम फिल्ममेकर सेशन फिल्म फेस्टिव्हल’ या लघुपट महोत्सवात ‘अभिमन्यू’ लघुपटाची निवड झाली. इटलीच्या ‘रोमा सिनेमा’ या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अभिमन्यू’ लघुपटाची निवड झाल्याचे नुकतेच हाती आलेले वृत्त लाॅकडाऊनमध्येही आनंद देणारे ठरले.
या अगोदर काही वर्षापूर्वी स्वप्निलचा L & F Forever हा लघुपट इटलीमधील एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झाला होता. भरपूर नामांकन आणि मानाचे पुरस्कार मिळवत स्वप्निलची घोडदौड सुरू झाली आहे. स्वप्निलच्या या कामगिरीमुळे जागतिक पातळीवर नगरचे नाव झळकू लागले आहे.
स्वप्निलने ‘अभिमन्यू’ या लघुपटासाठी दोन वर्षांपासून अथक मेहनत घेतली. या लघुपटाचे शूटींग नगर शहरातच करण्यात आले, हे विशेष ! एका अशा व्यक्तीवर हा लघुपट आहे जो खूप साऱ्या वाईट व्यसनांच्या चक्रव्युहामध्ये फसला असून एकाच रात्री त्याच्या जीवनात काय-काय घटना घडतात ? यावर हा लघुपट बेतला आहे.
या लघुपटाचे स्क्रीप्ट लिहिताना स्वप्नीलने मानसिक तज्ज्ञांचीही मदत घेतली. ‘फर्जंद’ चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका केलेले नितीन वाघ, ‘बबन’ चित्रपटातील प्रांजली कंझारकर, झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या सिरीयलमधील गायत्री बनसोडे, रुपाली वाकोडे यांनी ‘अभिमन्यू’ या लघुपटात भूमिका केल्या आहेत. छायाचित्रण नगरमधील पियुष कांबळे, विराज जगदाळे, ऋषिकेश चव्हाण, संकलन- अभिजित सोनावणे, आर्ट डायरेक्टर- महेश गोरे, प्रशांत जठार हे सर्व नगरमधीलच कलाकार आहेत. कार्यकारी निर्माता स्वतः स्वप्निल आहे.
सिद्धांत खंडागळे, आशिष राऊत, दुर्गेश निसाळ, आलिम शेख यांनी या लघुपटाच्या निर्मितीसाठी सहाय्य्य केले आहे. Soulution Entertainment व N D Production यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. ‘अभिमन्यू’च्या यशामुळे हिम्मत वाढली, असे स्वप्निल सांगतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील विश्वास लक्ष वेधून घेतो. स्वप्निल म्हणतो – कला आणि मेडिटेशन यामध्ये जी नशा आहे ती विश्वातील कोणत्याही गोष्टीत नाही.
इतर देश ‘वल्ड सिनेमा’ मध्ये आपला वेगळा ढसा उमटवतात. त्या सिनेमांची निर्मिती करण्याची टेक्नाॅलाॅजी आत्मसात करून वल्ड सिनेमांच्या धर्तीवर आपल्या सिनेमांची निर्मिती करण्याचा ध्यास स्वप्निलने घेतला आहे. त्याचा ध्यास पूर्ण होणे देशाची मान उंचावणारे ठरणार आहे. त्यासाठी स्वप्निलला शुभेच्छा देऊन निघताना कलेसाठी जीवन समर्पित करणारा युवा कलावंत भेटल्याचे समाधान मिळाले.

– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.