कादंबरीकार स्व. मनोहर गणपत ठाकूर यांच्या कोमल प्रकाशन निर्मित ‘अभेद्य’ या कादंबरीचे प्रकाशन नुकतेच चेंबूर येथे सुप्रसिद्ध वक्ते सतीश फडके आणि साहित्यिक प्रा.प्रतिभा सराफ, कथाकार काशिनाथ माटल, वासंती मनोहर ठाकूर आणि मयुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बोलताना सतीश फडके यांनी “महाभारत संपून शेकडो वर्षे उलटली तरी, महाभारतातील पात्रं अजूनही आपल्याला आसपास पाहायला मिळतात. लेखक मनोहर ठाकूर यांना ‘अभेद्य’ या कादंबरीद्वारे त्यांचा कर्ण सापडला. पण आपल्याला, आपल्यातील आणि भवतालातील कर्ण- अर्जुन सापडतोय का ? याचा शोध घ्यायाला हवा.” असे सांगून अनेक पुस्तकातून त्यांना जाणवलेला कर्ण त्यांनी उलगडून दाखवला.
प्रा. प्रतिभा सराफ यांनी ‘अभेद्य’ या कादंबरी लेखनातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवतना “या कादंबरीमुळे ‘कर्ण’ या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेताना महाभारतातील इतर व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची उर्मी जागृत होते, हे मनोहर ठाकूर यांच्या लिखाणाचे मोठेच यश आहे, असे सांगितले.
याप्रसंगी रोहिणी पाटील यांनी स्व. मनोहर ठाकूर या आपल्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. या कादंबरीच्या सुरुवातीपासून सोबत असलेल्या विक्रांत परब यांनी मनोहर ठाकूर आणि पुस्तकाच्या निर्मितीविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या.
शांतीलाल माटल यांनी ‘अभेद्य’ साकारताना मनोहर ठाकूर या आपल्या जवळच्या मित्राच्या साहित्य-कला गुणांवर प्रकाश टाकला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय उत्तम असे सूत्रसंचालन रामचंद्र जोशी यांनी केले.
याप्रसंगी रजनी कुलकर्णी, रितू पाटील, कोमल प्रकाशनाचे गुरु शेटे, संतोष घाणेकर, गणेश कासारे, भावना ठाकूर, रेश्मा, निर्मला आगळे इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘अभेद्य’ विषयी थोडेसे…
साडेपाचशे पानांची ‘अभेद्य’ ही कर्णाच्या आयुष्यावरची कादंबरी मनोहर गणपत ठाकूर यांनी लिहून सिद्ध केली. कला, संगीत,साहित्य यात रुची असणारे मनोहर ठाकूर यांची ही पहिली कादंबरी ! एक तप त्यांनी ही अभ्यासपूर्ण कादंबरी लिहिली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ती हातात येण्याआधीच ते हे जग सोडून गेले. पौराणिक साहित्य कृतींमध्ये ही कादंबरी नक्कीच अजरामर ठरेल अशी आहे.
आता मनोहर ठाकूर यांनी दिलेल्या योगदानाला वाचकांनी मात्र योग्य न्याय द्यायला हवा !
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
महाभारतातील ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा अनेकांना आकर्षित करते. ‘कर्णा’ला मुळातून जाणून घेऊन त्याच्या व्यक्तिरेखेला या कादंबरीत न्याय दिला आहे. संग्रही ठेवावी अशी ही कादंबरी आहे ‘अभेद्य!’