अमेरिकेतील न्यू जर्सी राज्य हे भारतीय समुदायासाठी एक महत्वाचे केंद्र मानले जाते. गेल्या पन्नास वर्षांपासून अनेक भारतीय कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. त्यांनी या भूमीत आपले घर उभे केले, व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले, आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा सातत्याने जपल्या.
अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यू यॉर्क शी असलेल्या जवळीकमुळे आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रामुळे न्यू जर्सी भारतीय व्यावसायिकांसाठी केवळ नोकरीची संधी नव्हे तर स्वप्ने साकार करण्याचे ठिकाण ठरले आहे.मॉर्गनव्हिल, ओल्ड ब्रिज, माटावन, मार्लबोरो, ईस्ट ब्रुन्सवीक, सेअरव्हिल आणि फ्रीहोल्ड या भागांत मराठी कुटुंबांची लक्षणीय वस्ती आहे. या कुटुंबांनी आपल्या पिढ्यांना संस्कृतीची गोडी लावली आहे आणि प्रत्येक उत्सवाला भक्ती, एकात्मता आणि आनंदाचा रंग भरला आहे.
मॉर्गनव्हिल मंदिर :
सुरुवातीला भक्तगण घरी किंवा भाड्याने घेतलेल्या सभागृहांत धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम करीत असत. वाढत्या गरजा लक्षात घेऊन हिंदू अमेरिकन टेम्पल अँड कल्चरल सेंटर या संस्थेने १९९५ मध्ये मॉर्गनव्हिल येथे ३२ एकर जागा विकत घेतली. काही वर्षे छोट्या सभागृहात सेवा सुरू राहिली. नंतर समाजाच्या प्रचंड पाठिंब्यामुळे तब्बल ३५,००० चौ. फुटाचे भव्य मंदिर, सभागृह व पुजारी निवासस्थाने उभी राहिली. १ जुलै २०१२ रोजी महाकुंभाभिषेकाने मंदिराचे उद्घाटन झाले आणि भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धेचे केंद्र बनले.

प्रेरणास्थान :
जशी लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजात एकतेची ठिणगी पेटवली, तशीच प्रेरणा या उपक्रमामागे दडलेली आहे. परदेशी भूमीवरही समाजाला जोडून ठेवणे, एकत्र येऊन उत्सव साजरा करणे आणि श्रद्धेला नवे आयाम देणे – हाच या सोहळ्याचा आत्मा आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात :
भारतीय संस्कृती आणि परंपरेला परदेशात जपण्यासाठी २००२ मध्ये मॉर्गनव्हिलमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली. या प्रेरणादायी उपक्रमामागे शशी दादा देशमुख आणि सौ. रंजनाताई देशमुख या दांपत्याचा दूरदर्शी विचार आणि निःस्वार्थ सेवा होती. विशेष म्हणजे मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉ. कृष्णन यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शनही केल्याने हा उपक्रम साकार झाला. त्यांचा हेतू स्पष्ट होता; तो म्हणजे परदेशी भूमीत राहणारे भारतीय एकत्र येऊन गणरायाचा उत्सव साजरा करावा, भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत पेटवावी आणि पुढच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा.
सुरुवातीला अवघ्या काही कुटुंबांनी सुरू केलेला हा उत्सव आज मात्र हजारो लोकांना एकत्र आणणारा, पाच दिवस चालणारा भव्य सोहळा झाला आहे. प्रत्येक वर्षी हजारोने लोक या उत्सवात सहभागी होत आहेत. राहुल पवार आणि सुधीर बने हे रंजनाताईंच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापनासोबत गणेश उत्सव अधिक भव्य बनवण्यासाठी काम करत आहेत. गेल्या १०–१२ वर्षांपासून अनेक कुटुंबांनी सातत्याने आपला वेळ, श्रम आणि आर्थिक योगदान अर्पण केले. त्यामुळे हा उत्सव प्रत्येक वर्षी अधिक भव्य, समृद्ध आणि भक्तिमय होत आहे. त्यांच्या या अखंड सेवेमुळे समुदायाचे बंध दृढ झाले आणि प्रत्येक भक्ताला उत्सव हा केवळ कार्यक्रम नसून भक्तिमय अनुभव वाटू लागला.
या सेवाभावी परिवारांमध्ये विशेष उल्लेखनीय आहेत, ते म्हणजे बने, बेंद्रे, भावठाणकर, भूजले, बोटके, चौधरी, डाकवाले, देव, देवल, देवळणकर, देसाई, घोडेकर, कसबेकर, कारखानीस, खराबे, कोल्हटकर, क्षीरसागर, मोहोळकर, पाठक, पाटील, पवार, फोंडगे, पुरव, शिरोडकर, साळवी, ऊर्ध्वरेषे, उत्पात आणि वझे.

गणेशोत्सव २०२५ :
२५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ या काळात मॉर्गनव्हिल मंदिरात पाच दिवसांचा गणेशोत्सव भक्तिभाव, सांस्कृतिक वैभव आणि सामुदायिक उत्साहाने भव्यतेने साजरा झाला. दोन दशकांपूर्वी काही कुटुंबांनी सुरू केलेली ही छोटीशी परंपरा आज आपल्या समुदायातील अविभाज्य सांस्कृतिक ठेवा बनली आहे.दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची उपस्थिती, सुयोग्य नियोजन आणि भक्तीमय वातावरण यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक विधींचाच नाही तर समुदायाच्या ऐक्याचा आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा जिवंत दुवा ठरतो. या पाच दिवसांच्या सोहळ्यात भक्ती, कला, आणि एकतेची मेजवानी लाभली आणि सर्वांना “घरापासून दूर असले तरी घरच्यासारखा” अनुभव मिळाला.
बाप्पाचे स्वागत :
गणपती बाप्पाच्या आगमनाने पाच दिवसांच्या या सोहळ्याची सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या निनादात बाप्पाची मूर्ती उत्साहात आणली गेली. पारंपरिक पोशाखातील महिला, मुलं आणि तरुणांनी ‘बाप्पा जय जय’ करत आणि मंदिरातील सर्व मूर्तींची प्रदक्षिणा घेऊन बाप्पाची स्थापना केली. “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्री गणरायाचे आगमन लोकांच्या प्रचंड भक्ती आणि आनंदात संपन्न झाले. आगमनाची व्यवस्था हेमंत बेंद्रे, प्रवीण देव आणि मी, (प्रशांत कोल्हटकर) अशी आमच्या देखरेखीखाली सुरळीतपणे पार पडली.
भक्ती आणि कलेचा संगम :
सोहळ्याची सुरुवात मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेने झाली. २५ युवक स्वयंसेवकांनी देवांगी पाठकच्या मार्गदर्शनाखाली ५२ सुंदर मूर्ती तयार केल्या. लहान मुलांनीही उत्साहाने सहभागी होऊन मातीपासून मोहक गणेशमूर्ती घडवल्या. त्यांच्या निरागस हातांनी घडवलेल्या मूर्तींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेमळ केले. “Make My Ganesha” या ऑनलाईन कार्यशाळेमुळे दूरवर असलेल्या भक्तांनाही उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली.
मंदिर सजावटीचे नेतृत्व गौरी चौधरी यांनी केले. दीप्ती कारखानीस यांच्या आकर्षक रांगोळ्यांनी आणि शिल्पा बेंद्रे यांच्या गणेश-थीम रांगोळ्यांनी संपूर्ण परिसर खुलून दिसला. यंदा विशेष उठून दिसली ती सुवर्ण पृष्ठभूमी, जिथे फुलांच्या रांगोळ्यांनी सभागृहाला अप्रतिम दिव्यता दिली. बाप्पाच्या उपस्थितीत हा परिसर खरोखरच दैवी दरबारासारखा अनुभव झाला.
आरती आणि गजर :
पाच दिवस बाप्पाची सकाळी, संध्याकाळी होणारी पूजा, आरत्या आणि गजर यांनी प्रत्येक गणेशभक्ताचे हृदय शांतता आणि भक्तीने भरून गेले, ज्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्य आणि हृदयस्पर्शी वातावरण निर्माण झाले.
अखेरच्या दिवशी सहस्रावर्तनात गणपती अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करून गणरायाच्या चरणी नमन करण्यात आले. आरती व पूजेच्या सर्व धार्मिक सोपस्कारात मदत करणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांचे विशेष आभार.

भक्ती, तंत्रज्ञानाचा संगम :
मंदिर व्यवस्थापक श्रीनिवासजी आणि सास्त्रीजी यांच्या सहकार्याने सुधीर बने यांनी फ्लायर्स आणि माहितीपत्रके तयार केली. मीना क्षीरसागर, धनश्री फोंडगे आणि श्रद्धा पवार यांनी फ्लायर्स, सोशल मीडिया अपडेट्स आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुप यांचे सुंदर समन्वयन केले. हे सर्व साधन केवळ माहितीपुरते मर्यादित नव्हते. ते खऱ्या अर्थाने संवादाचा आत्मा ठरले. त्यामुळे शेकडो कुटुंबांपर्यंत उत्सवाचा प्रत्येक क्षण पोहोचला. अपडेट्समुळे प्रत्येक घरात गणपती बाप्पाच्या उत्साहाची ज्योत प्रज्वलित झाली. डिजिटल साधनांनी श्रद्धेला नवे पंख दिले आणि तंत्रज्ञान भक्तीचे खरे सहकारी बनले.
सांस्कृतिक वैभव :
श्रद्धा पवार यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट समन्वयन केले. विविध संगीत व नृत्य शाळांमधून आलेल्या कलाकारांसोबत कार्यक्रम सुसंगतरीत्या पार पाडले.
या पाच दिवसांत भक्तिगीत, शास्त्रीय संगीत, भजन आणि नृत्य यांचा अखंड प्रवाह वाहत होता. रिया पवार, रिशान पवार आणि सारा फोंडगे यांच्या भक्तिगीतांनी सर्वांची मने जिंकली. रुचा जांभेकर यांनी शास्त्रीय रचना ते भक्तिगीते अशी बहुरंगी मैफल सादर केली. मधुकर क्षीरसागर आणि त्यांच्या सारेगा ग्रुप टीमने मराठी व हिंदी गाणी सादर करून रंग भरला. नंदन कालुस्कर (बासरी) आणि निलेश प्रभू (तबला) यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.
स्वर संगमच्या बालकलाकारांनी शास्त्रीय भजनांनी भक्तीचा गोड स्पर्श दिला, तर प्रियांका कसबेकर यांनी सुमधुर भजन सादर करून वातावरण अधिक भावमय केले. सान्वी डाकवाले हिने लयबद्ध कथक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. मॉर्गनव्हिल मराठी शाळेतील मुलींनी गणेश वंदना नृत्याने उत्साह निर्माण केला.

यावर्षी खास आकर्षण ठरला मॉर्गनविल मराठी शाळेच्या मुलांचा ‘वीर मराठ्यांचा पराक्रम’ या संकल्पनेवर आधारित नृत्य-नाट्यप्रयोग. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या शौर्याची उज्ज्वल गाथा प्रभावीपणे रंगवली गेली.
एका संध्याकाळी स्वामी शंतानंद (प्रमुख, चिन्मय मिशन) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. उपस्थितांना त्यातून अध्यात्मिक शिकवण आणि जीवनमार्गाचे मार्गदर्शन मिळाले.
ध्वनी व प्रकाशयोजनेचा समन्वय मुकुल डाकवाले आणि देवदत्त देसाई यांनी केला. त्यांच्या कुशलतेमुळे प्रत्येक कार्यक्रमाला नवे तेज मिळाले. उत्सवाचे सर्व क्षण अधिक संस्मरणीय बनले.
प्रसाद :
गणेशोत्सवाची खरी ताकद म्हणजे सामूहिक सहभाग. पाच दिवसांत रोज सुमारे २५० भाविकांसाठी एकूण ११ वेळा प्रसादाचे भोजन देण्यात आले. अखेरच्या दिवशी तब्बल ८०० लोकांसाठी भव्य प्रसादाचे आयोजन झाले. प्रसाद व्यवस्थापन पूजा शिरोडकर आणि सर्वश्री महेश, प्रकाश आणि रंगा यांनी केले. याशिवाय, सर्व स्वयंसेवकांनी एकत्रितपणे प्रसादासाठी ड्रायफ्रूट्स आणि नट्स, पूजेसाठी फुले, तसेच प्रसादासाठी लागणारे कटलरी साहित्य उपलब्ध करून दिले. हा एकात्मभाव खऱ्या अर्थाने सामुदायिक बळ दाखवून गेला.
निरोप :
पाच दिवसांचा मंगल सोहळा एका भव्य विसर्जन मिरवणुकीने संपन्न झाला. मिरवणूक भव्य रथावरून काढण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून सुरुवातीला वरून फुलांची उधळण करण्यात आली. ही अभिनव संकल्पना अमोल पुरव यांनी साकारली.

संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. गगनभेदी ढोल-ताशांच्या निनादात आणि झांज-पखवाजाच्या तालात सर्व भक्त सहभागी झाले. पुरुष, महिला आणि लहान मुले सर्वजण ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात आनंदाने नाचत होते. जल्लोष ढोल-ताशा पथकाचे नेतृत्व मकरंद उत्पात यांनी केले. त्यांच्या जोशपूर्ण वादनाने उत्सवाची ऊर्जा दुप्पट झाली. त्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिभावाने दणाणून गेला.
या दणदणीत तालांनंतर भक्तांनी बाप्पाला भावनिक निरोप दिला, “पुढच्या वर्षी लवकर या !” या एका घोषणेत भक्तांचे प्रेम, वेदना आणि पुढच्या वर्षाची आतुरता दडलेली होती.
आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे व्यवस्थापन सर्वश्री अमोल पुरव, देवदत्त देसाई, हेमंत बेंद्रे, महेश शिरोडकर, मुकुल डाकवाले, प्रशांत कोल्हटकर, प्रवीण देव आणि राहुल पवार यांनी केले.
सामूहिकतेचा उत्सव :
या उत्सवाच्या यशामागे मंदिराचे विश्वस्त, पुजारी, २० पेक्षा जास्त सक्रिय कुटुंबे आणि असंख्य स्वयंसेवक यांचा समर्पित प्रयत्न होता. राहुल पवार यांनी सर्व स्वयंसेवकांबरोबर समन्वय साधत उत्सवाचे उत्कृष्ट संयोजन केले.
दोन दशकांपूर्वी शशी दादा आणि रंजनाताई यांनी लावलेले बीज आज भव्य वृक्ष बनले आहे. गणेशोत्सव हा आता फक्त परंपरा नाही तर तो आपल्या समाजाच्या ओळखीचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. प्रत्येक वर्षी हा उत्सव अधिक वैभवशाली, भक्तिमय आणि प्रेरणादायी होत आहे.
गणेशोत्सव संपला, पण बाप्पाच्या कृपेने मिळालेली ही ऊर्जा, भक्तीभाव आणि आपुलकी पुढील वर्षापर्यंत सर्वांच्या मनात कायम राहील.
“गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !”

— लेखन : प्रशांत कोल्हटकर. न्यू जर्सी, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
Kupach sunder ,bhaktimay ,dole dipavinarara mangalmay Ganpati bappa sohala.pardeshat asunahi uttam yojna aani utsahat kuthehi dhangaddhigana na karta mangalmay vatavarncha aanand gheta aala🙏Ganpati bappa morya