Tuesday, September 16, 2025
Homeलेखअलौकिक प्रा. मधू दंडवते

अलौकिक प्रा. मधू दंडवते

थोर समाजवादी नेते, अर्थतज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते यांचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ अंगीकारणारे प्रा.मधू दंडवते यांचा जन्म २१ जानेवारी १९२४ रोजी झाला होता.

प्रा.मधू दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. प्रा.मधु दंडवते यांनी कोकणात समाजवादी बालेकिल्ला उभारला. कोकणात समाजवादी विचारसरणी काही काळ रुजली आणि फोफावलीही. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.

अर्धशतकाहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिलेले समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. १९७१ ते १९९० एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. विनोद व बोचरा उपरोध असणारी त्यांची संसदेतील भाषणे सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर कठोर टीका करणारी असत.

१९७८ साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, १९८९ साली व्ही.पी.सिंह सरकारमध्ये अर्थमंत्री आणि १९९० साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले होते. ध्येयवादी, स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून दिल्लीत व सर्वत्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप होती.

१९७७ मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून/झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय त्यांनी करून दिली. याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात.

त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतार देताना दंडवते म्हणाले होते, “मला फर्स्ट क्लासचे महत्व कमी करायचे नाही, मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे.”

कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका त्यानी हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन केली.
भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा त्याचा दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील.

अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र जनतेने प्रा. मधु दंडवतेँना पराभुत केले.

कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दंडवतेँना देशाचे पंतप्रधान बनण्याची संधी चालुन आली होती. राज्यसभेतुन निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर तत्वांचा हा पुजारी पंतप्रधानपद नाकारताना विनम्रतापुर्वक म्हणाला, “मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधानपद स्वीकारणे मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारलं. तिथेच माझ राजकरण संपलं.”

देशाच्या अर्थमंत्रीपदी राहिलेले दंडवते मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले कारण दंडवतेँनी राजकरणातुन स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्याँनाही त्यांनी कधी पैसा उभारु दिला नाही. त्यांच्या पत्नी प्रा प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या.

थोर मधू दंडवते यांचे १२ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

संजीव वेलणकर

– लेखन : संजीव वेलणकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments