एकेकाळी भारतीय कुटुंब व्यवस्था जगात सर्व श्रेष्ठ समजण्यात येत असे. पण दुर्दैवाने परिस्थिती झपाट्याने बदलत चालली असून, या वाचवल्या जात नाही, पाहावायला जात नाही, अशा कौटुंबिक हिंसाचाराच्या, दुर्लक्षच्या बातम्या सातत्याने नजरेसमोर येत असतात. अशा या पार्श्वभूमीवर, आपल्या पोर्टलच्या नियमित लेखिका, कवयित्री आशा दळवी यांच्या ऑपरेशन मध्ये त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांची घेतलेली काळजी, केलेली सेवा नक्कीच दिलासा देणारी आहे. सर्व दळवी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक.
“बहूत जन्मा लाग केला,
म्हणून हा लाभ झाला !!”
नुकतेच माझ्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. माझी चारही मुले आणि सुनाही खूप प्रेमळ आहेत.
ऑपरेशन ची तारीख गुरुवारी गुरुपुष्यामृत ; 23 एप्रिल मिळाली. परेश ने आठ दिवसाची सुट्टी टाकून साऱ्या तपासण्या, सगळी कागदपत्र व्यवस्थित करून घेतले, सारे काही नॉर्मल आलं. तरीही चारी मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी, स्पष्ट दिसत होती.
बाबांच्या अचानक जाण्याने मुलं अगदीच भावूक झालेली आहेत. त्यांच सारं विश्व आई भोवतीच आहे. थोरला तर माझी गाढ झोप लागली असली तर मला जागी करून पाहतो, “आई आहे ना ?” अशी सतत धास्ती त्याला असते. माझ्या काळजी मुळे तोच आजारी झालाय.
एवढी काळजी घेणारी मुले असताना मला कश्याला काय होईल ? श्वेताने तर आधीच सहा महिने पुण्यातील अनेक नामांकित हॉस्पिटलला भेटी देऊन, कुठे जास्त चांगले रिझल्ट आहेत ? अशी चौकशी करून डॉक्टरांशी स्वतः बोलून मगच ठरवले की आपण या हॉस्पिटलला ऑपरेशन करतोय. बरे झालेल्या रुग्णांच्या भेटीला सुद्धा ती स्वतः जाऊन आली, मलाही त्यांच्याशी बोलायला लावले जेणे करून माझी भिती कमी होईल. मला भिती तर वाटतच होती पण नाही सक्सेस झाले तर काय ? अशी शंकाही मनात यायची. शिवाय आजूबाजूच्या माझ्या वयाच्या सर्व बायका लंगडत चालतात तर आपल्याला काय होतंय ? असं वाटायचं नकोच गुडघे रिप्लेस करायला. असं ही वाटायच. पण मुलांना कोण समजावणार ? आईला काटा सुध्दा मोडला नाही पाहिजे.
हॉस्पिटलमध्ये लागणारे साहित्य, नॅपकिन, टाॅवेल, गाऊन, रूमाल, ब्रश सारं अमृताने भरून बॅग तयार केली. श्वेता ड्रायफ्रुटचे साजूक तुपातले लाडू बनवून दवाखान्यात घेऊन आली.
योगेशला म्हटलं मी “की इथे सगळेजण आहेत तर तू घरीच, गावाला थांब “घरी कमी व्याप आहेत का ? तो कसला ऐकतोय.
तोही आदल्या दिवशीच पुण्यात हजर. एरवी त्याला बोलायला वेळ नसतो. पण आता चार दिवस पुण्यात रहायला आला होता. घराला कुलूप लावून.

स्वारगेटला लोकमान्य हॉस्पिटला, एकदम आधुनिक सर्व सोयींनी युक्त, एसीरूम पण अतिशय छान होती. स्वच्छता, टापटीप वाटतंच नव्हतं आपण दवाखान्यात आलो आहोत असे. श्वेता माझ्या सोबत थांबली, बाकीचे सर्वजण घरी परत गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० ला ऑपरेशन थिएटर मध्ये घेणार होते. रात्री मला शांत झोप लागली. श्वेता मात्र माझ्या काळजीने रात्रभर जागून राहिली. माझ्या आधी पहाटे उठून श्वेताने स्वतःचे आवरून, आंघोळ वगैरे करून, मला उठवले. मी ही आंघोळ करून माझं आवरलं. की लगेच योगेश, परेश हजर. मी विचारले इतक्या लवकर का आला तर ते ही म्हटले “सकाळी लवकर इकडे यायचं म्हणून तुझ्या काळजीने झोप नाही लागली. “बरोबर ६ ला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले.
आत जाताच मला थोडी भिती वाटली, मनातल्या मनात नामस्मरण चालूच होते. कंबरेत भूलीचे इंजेक्शन दिले पुढे काय झाले मला काही समजले नाही. जाग आली तेंव्हा मी माझ्या कालच्या रूममध्ये होते.
योगेश, परेश, श्वेता समोरच होते मी श्वेताला म्हटलं, “आता तू घरी जा. ही दोघं आहेत.” श्वेताने विचारले तू बरी आहेस ना ?
हो म्हटले.
तेवढ्यात प्रमुख डॉक्टर आले आणि त्यांनी “सांगितले ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झालेले आहे. काळजी करू नका.लगेच एक्सरे मशीन रुममध्ये आले दोन्ही गुडघ्यांचे प्रत्येक एॅगलने २० ते २५ एक्सरे काढले. मग श्वेता घरी गेली. पाच दिवस मी दवाखान्यातच होते मग सोमवारी डिस्चार्ज मिळाला.
दवाखान्यात चांगले जेवण होते पण मला काही खाण्याची ईच्छा नव्हती. मग श्वेता घरुन काही तरी घेऊन येई आणि जबरदस्ती मला भरवत असे. लवकर बरं व्हायला पाहिजे की नाही ? असं म्हणत स्वतःच्या हाताने भरवत होती. आज मी लेकरू झाले होते आणि माझी लेकरं माझी आई बनून माझी काळजी घेत होती.

डिस्चार्ज मिळाल्याने घरी आले तर दारात रांगोळी काढून, औक्षणाचे ताट करून सुना माझ्या येण्याची वाट पहात होत्या. दोघींनी औक्षण केले जसे काय मी एखादं युद्धच जिंकून आले होते. लगेच माझ्या भोवती नातवंडांचा गराडा पडला. घराच नुसतं गोकुळ झाले होते.

आज ऑपरेशनला पंधरा दिवस झाले आहेत मी चांगली खडखडीत बरी झाली आहे, सुनांनी चांगलचुंगल खाऊ घालून लवकर बरे केले. पण लेकरांच्या एवढ्या प्रेमळ वागण्याच्या प्रत्ययाने मला एवढंच म्हणावस वाटतं की “माहित नाही किती जन्माचे पुण्य फळाला आले, म्हणून अश्या सद्गुणी लेकरांचं माता होण्याचे सौभाग्य मला मिळालं” !!
येणार असतील अशी सत्गुणी लेकरे माझ्या पोटाला
पुन्हा पुन्हा येईन मी याच जन्माला
पुन्हा पुन्हा येईन मी याच जन्माला !!
म्हणूनच म्हणावसं वाटतं की,
बहुत जन्मत्याग केला
म्हणून हा लाभ झाला !!

आशा दळवी
— लेखन : आशा ज्ञानेश्वर दळवी. दुधेबावी, फलटण, सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
