Homeयशकथाझेप : 21

झेप : 21

“कृष्णा दिवटे”

कुठल्याही गोष्टीचे, संकटाचे काही फायदे, तोटे हे असतातच. आता हेच बघा ना, कोरोनाच्या भयंकर काळात जगावर, मानवावर अनेक संकटे आली पण तरीही मानवाने कोरोनावर मात करून आपले अस्तित्व टिकवून ठेवलेच. त्याच बरोबर या संकटातून माणुस बरचसं नवीन काही शिकला देखील. त्यातीलच एक बाब म्हणजे समाज माध्यमांचा कल्पकतेने, समाजोपयोगी वापर करणे ही होय. खुद्द www.newsstorytoday.com या पोर्टलची आणि विविध उपक्रमांची सुरुवात ही कोरोना काळातच झाली आहे.

साहित्याला, वाचनाला चालना देणारा एक सुंदर उपक्रम कोरोना काळात सुरू झाला आणि तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सअप्प वर सुरू करण्यात आलेला “पुस्तक प्रेमी” समूह होय.
आजच्या घडीला फेसबुक वर 66 हजार पुस्तक प्रेमी सदस्य आहेत तर व्हाट्सअप्प समूहात 650 + सदस्य आहेत.

या समूहांमध्ये आजवर 2050 हून अधिक पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे. आज जरी “पुस्तकप्रेमी” समूहाला एका वटवृक्षाचे स्वरुप आले असले तरी, हे सर्व काही अचानक घडले नाही. स्वतः पुस्तक प्रेमी असलेल्या श्री कृष्णा दिवटे यांनी 8 जून, 2020 रोजी “पुस्तकप्रेमी” चे बीजारोपण केले. श्री कृष्णा दिवटे हे बँक ऑफ इंडिया मधून डेप्युटी झोनल मॅनेजर या उच्च पदावरून निवृत्त झालेले असल्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाजाचा भरपूर अनुभव होता. जोडीला कल्पकता आणि इच्छाशक्ती होती, त्यामुळे त्यांनी प्रारंभापासून आजतागायत पुस्तकप्रेमी समूहाची धुरा समर्थपणे आणि कल्पकतेने सांभाळली आहे. त्यामुळे पुस्तकप्रेमी उपक्रम दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक लेखकांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तर वाचकांना कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, हे जाणकार मंडळींकडून समजत असल्याने त्यांच्या वाचनाच्या अभिरुचीची उत्तमपणे जोपासना होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकप्रेमी उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकही दिवसाचा खंड न पडलेला नाही. नियमित अभियानातील पुस्तक परिचयाशिवाय दुपारच्या सत्रात येऊन गेलेले पुस्तक परिचय लक्षात घेतले तर आजवर पुस्तकप्रेमी समूहाने साधारण पाच हजार पुस्तकांचा परिचय करून दिला असावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पहिल्या दिवशी केवळ सहा सदस्य असलेल्या या व्हाट्सअप समूहात आज देशाच्याच नव्हे तर जगातील विविध भागातून 650 + सदस्यांचे एक अतिविशाल असे कुटुंब बनले आहे. फेसबुक समूहाची सदस्य संख्या 66 हजारावर आहे.
प्रगल्भ पण रसिक असे वाचक ही या सदस्यांची खास ओळख आहे. सगळे आपापल्या क्षेत्रात, व्यक्तिगत जीवनात यशस्वी निपुण असे आहेत. त्यांची वैचारिक बैठक उच्च दर्जाची आहे.

या समूहात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दुबई, अन्य आखाती देश यासारख्या आणि अगदी जहाजावर वेगवेगळ्या समुद्रांवर सतत वर्षभर सफरीवर असणारे वाचन प्रेमी सदस्यही नियमितपणे समूहाच्या उपक्रमात सहभाग घेत आहेत ही गोष्ट विशेष आहे.

या समूहाची निश्चित एक कार्य पद्धती आणि नियमावली आहे. समूहाच्या कार्य पद्धतीनुसार समूहातील एका सदस्याने सोमवार ते रविवार असे सलग सात दिवस स्वतःला आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल लिहावयाचे आणि त्यासोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ स्कॅन करून पोस्ट करावयाचे असते.
पुस्तकाची भाषा, विषय याबाबत कोणतेही बंधन नाही. समूह सदस्याने परिचयासाठी कोणते पुस्तक निवडावे यावर कोणतेही बंधन नाही. पण शक्यतो जातीय, धार्मिक, राजकीय किंवा टोकाची दोन मते असणारी पुस्तके टाळणे अपेक्षित असते. अर्थात अशी काही पुस्तके आली तर त्यावर अभिनिवेशी चर्चा न होता अतिशय संयमित, संतुलित, व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता चर्चा होणे अपेक्षित असते. अभिमानाची बाब म्हणजे आजपर्यंत तसे घडवून आणण्यात सर्व समूह सदस्य यशस्वी झाले आहेत.

या समूहावर साहित्य आणि सर्व प्रकारच्या कला हे सोडून अन्य कसलीही चर्चा होत नाही. शुभ प्रभात, शुभ रात्री, सण, वाढदिवसाच्या शुभेच्छा, फॉरवर्ड मजकूर अशा बाबींना अजिबात थारा नसल्याने आणि विशेषत: सर्व सदस्य या मार्गदर्शक तत्त्वांची स्वयंस्फूर्तीने अंमलबजावणी करीत असल्याने कटुता निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत.

समूहाच्या सुरुवातीला साधारण महिन्याचे नियोजन शक्य व्हायचं. पण समूहातील सदस्यांची संख्या वाढत असल्याने आता पुढील सहा ते आठ महिन्यांचे नियोजन तयार असते.

या समूहाचे अन्य काही उपक्रम म्हणजे, दिवाळी, नववर्ष स्वागत विशेष अभियान चिपळूण, कोल्हापूर येथील महापूरग्रस्ताना आर्थिक आणि वस्तूरुप मदत प्रत्येक शनिवारी दुपारी काव्यसंध्या किंवा दर महिन्यातून एकदा लेखक आपल्या
या समूहाचे अन्य काही उपक्रम म्हणजे, दिवाळी, नववर्ष स्वागत विशेष अभियान चिपळूण, कोल्हापूर येथील महापूरग्रस्ताना आर्थिक आणि वस्तूरुप मदत प्रत्येक शनिवारी दुपारी काव्यसंध्या किंवा दर महिन्यातून एकदा लेखक आपल्या या समूहाचे अन्य काही उपक्रम म्हणजे, दिवाळी, नववर्ष स्वागत विशेष अभियान चिपळूण, कोल्हापूर येथील महापूरग्रस्ताना आर्थिक आणि वस्तूरुप मदत प्रत्येक शनिवारी दुपारी काव्यसंध्या किंवा दर महिन्यातून एकदा लेखक आपल्या घरी उपक्रम, कथा जागर उपक्रमाच्या माध्यमातून नवोदितांना कथा लेखनास प्रोत्साहन, समूहातील लेखकांचे दिवाळी 2021 मध्ये आभासी स्वरूपातील संमेलन, गेली चार वर्षे पुस्तक प्रेमी दिवाळी अंकाचे प्रकाशन, काव्यसंध्या, गेली तीन वर्षे लोणावळा, कराड, येथे स्नेहसंमेलन, मागील पाच वर्षातील निवडक 75 पुस्तक परिचयाचे संकलन असलेल्या ‘संचित पुस्तक प्रेमींचे’ या पुस्तकाचे प्रकाशन, समूह सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन आदी होत.

डॉ सुनीलकुमार लवटे, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, प्रकाशिका भाग्यश्री पाटील यांच्या समवेत कृष्णा दिवटे

या समूहात रसिक, चोखंदळ लेखक, वाचकांशिवाय साहित्य क्षेत्राशी निगडित असलेले प्रकाशक, चित्रकार, छायाचित्रकार तसेच विविध क्षेत्रातील नामवंत सहभागी आहेत.

या समूहाचे पुढील संमेलन या महिन्यात कराड येथे होत आहे. या संमेलनात ‘संचित पुस्तक प्रेमींचे भाग 2″ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

अशा या “पुस्तकप्रेमी” समूहाचे संस्थापक- संचालक श्री कृष्णा दिवटे सरांच्या घरी मात्र पुस्तकांची कोणतीही परंपरा नव्हती, हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल पण ते खरे आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यातील पदव्युत्तर शिक्षण घेतले असले व इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन पदवी परीक्षेत ते शिवाजी विद्यापीठात पहिले आलेले असले तरी त्यांचे आईवडील लौकिक अर्थाने अशिक्षित होते. त्यांची दोन मोठी भावंडे शाळेत गेली तरी कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. जुन्या काळातली मॅट्रिक, पदवी परीक्षा आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे ते त्यांच्या कुटुंबातला पहिलेच आहेत. त्यांच्या वाचनप्रेमाची सुरुवात ते तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेत असताना झाली. प्राथमिक शाळेतील त्यांच्या गोंधळी सरांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांना भाग घ्यायला लावला. त्यांनी भाषण लिहून काढायला मदत जरूर केली पण भाषण लिहून मात्र दिले नाही. पण त्यांच्या वयाच्या मुलांना वाचायला आवडेल व समजेल अशी लोकमान्यांच्या चरित्राची छोटी छोटी पुस्तके त्यांनी वाचायला देऊन त्यांचे भाषण लिहायला प्रवृत्त केले. हाच प्रकार पुढे माध्यमिक शाळेत व महाविद्यालयीन जीवनात घडत गेला.

ग प्र प्रधान यांच्या हस्ते बेळगाव येथील निबंध स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना कृष्णा दिवटे

कोळेकर, देशपांडे, किल्लेदार, जोग, कुलकर्णी, दामले, रानडे, दसनूरकर, भिडे यासारख्या शिक्षकांनी व मोघे सरांसारख्या मुख्याध्यापकांनी दिवटे सरांवर वाचनाचे संस्कार केले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ज्या काळात झाले त्या काळात आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, कथा कथन स्पर्धा, नाट्य छटा व निबंध लेखन स्पर्धाना खूप महत्व होते. गावोगाव अशा स्पर्धा व्हायच्या. बेळगाव मधील वांग्मय चर्चा मंडळ नियमितपणे ‘काळ’कर्ते पत्रकार शिवराम महादेव परांजपे आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ निबंध, वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असे. पुण्यातील न्यायमूर्ती रानडे वादस्पर्धा, ठाण्यातील नि गो पंडितराव वादस्पर्धा, कोल्हापुरातील पंगू वादस्पर्धा, दत्ताजीराव शेळके वक्तृत्व स्पर्धा, सांगलीतील महात्मा गांधी वादस्पर्धा, मालेगाव आणि संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथील वादस्पर्धा, नाशिक मधील दिवाकर नाट्य छटा स्पर्धा, इचलकरंजी येथील युवक विचार विनिमय मंडळाच्या वक्तृत्व, वाद, कथा कथन, शास्त्रीय आणि सुगम गीत गायन स्पर्धा या शाळा कॉलेजात शिकत असलेल्या या विषयात रस असलेल्या मुलांच्या दृष्टीने पर्वणी असत. यातल्या बहुतेक स्पर्धात दिवटे सर भाग घेत असत. या स्पर्धांसाठी तयारी करताना सगळ्या विषयांवरची पुस्तके वाचायची, टिप्पणे काढायची व स्वतःची अभिव्यक्ती स्वतःच लिहायची अशी त्यांची पद्धत असल्यामुळे या कालावधीत त्यांच्या कडून सातत्यपूर्ण वाचन घडत गेले.

वाचन संस्कृती घडविण्यात वाचनालयांची भूमिका फार मोठी असते.दिवटे सरांचा प्राथमिक शाळेपासून आपटे वाचन मंदिर या शतकोत्तरी ग्रंथालयाशी संबंध आला. वि मा शेळके हे त्यांच्या शाळेतले शिक्षक त्यावेळी आपटे वाचन मंदिराचे सचिव होते. दिवटे सरांची वाचनाची आवड त्यांच्यापासून लपून राहिली नाही. ते स्वतः त्यांना आपटे वाचन मंदिरात घेऊन गेले. त्यांच्यामुळे ते या वाचनालयाचे शालेय जीवनात सदस्य बनले. घोरपडे आणि शेळके नावाचे दोन सेवक त्यावेळी आपटे वाचन मंदिरात कार्यरत होते. आपटे वाचन मंदिरात दिवटे सरांची न चुकता दररोज फेरी व्हायची. पहिल्या मजल्यावर विविध भाषेतील वर्तमानपत्रांचा विभाग असे. तिथे महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स, केसरी, तरुण भारत, टाइम्स ऑफ इंडिया, पुढारी, सत्यवादी, नवसंदेश आदी वर्तमान पत्रे असत.

वर्तमानपत्रातील खेळ, सिनेमा व नाटकांविषयीच्या बातम्या, लेख ही पहिली पसंती असली तरी पहिल्या पानावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांवरच्या बातम्या आणि विविध वर्तमानपत्रातले अग्रलेखही दिवटे सर वाचत. त्यांचा दररोजचा तासाभराचा वेळ वर्तमानपत्रे वाचण्यात जात असे. वर्तमानपत्रे वाचून झाली ते खाली ग्रंथालयात जात. त्यांच्या वयाला व शिक्षणाला न पेलणारी पुस्तके ते वाचण्यासाठी घरी घेऊन जात असत. विशेषत: या पुस्तकांमध्ये थोर व्यक्तींची चरित्रे आणि गाजलेली इतरही पुस्तके अवश्य असत.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दिवटे सरांनी वर्षभर शिक्षकाची नोकरी केली. पण नंतर ते बँक ऑफ इंडियाच्या सेवेत रुजू झाले. त्यांना 36 वर्षाच्या बँकेतील नोकरीची पहिली दहा वर्षे आणि नंतरची पाच वर्षे ग्रामीण भागातील शाखांमध्ये काम करावं लागलं. त्या ठिकाणी पुस्तकेच काय पण वर्तमानपत्रे मिळणेही कठीण व्हायचे. अशा परिस्थितीत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या टी बुक क्लब सारख्या योजना, पोस्टाने मागवलेली वर्तमानपत्रे, नियतकालिके, पीटर चौधरी सारखा पुस्तकवेडा मित्र यामुळे त्यांची वाचनाची आवड टिकून राहिली. कोरोना आला तेंव्हा ते पुण्यातल्या एका विकसकाचा सल्लागार या नात्याने काम करत होते. कोरोनामुळे ते काम ठप्प झाले आणि मग त्यांच्या वाचन प्रेमामुळे “पुस्तकप्रेमी” उपक्रमाचा जन्म झाला.

अशा प्रकारे पुस्तकप्रेमी समूहाच्या माध्यमातून आगळी वेगळी साहित्य सेवा बजावीत असल्याबद्दल श्री कृष्णा दिवटे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या, पुस्तकप्रेमी समूहाच्या आणि समूहातील प्रत्येकाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कृष्णा दिवटे सर आणि त्यांच्या संपूर्ण पुस्तकप्रेमी टीमचे खूप खूप अभिनंदन!
    उत्तम लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments