आकाशवाणी आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. तर मुंबई आकाशवाणीच्या विज्ञान विभागाला सुरुवात होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाली.

आज विज्ञान विभाग अस्तित्वात नसला तरी त्या विभागाने विज्ञान प्रसाराची जी मोहीम सुरू केली तिने विज्ञान प्रसाराला चालना दिली, चेतना निर्माण केली. अनेक लेखक तयार केले, अनेक शास्त्रज्ञांना त्यांच्या हस्तिदंती मनोर्यामधून जनमानसात विज्ञान प्रसारासाठी आमंत्रित केले, अनेकांनी स्वेच्छेने हे व्रत स्वीकारले तर काहींना आग्रह करून मोहिमेत सामील करून घेतले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व अध्वर्यू या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले. अनेक विषयांची आणि मानवी समस्यांची ओळख या शास्त्रज्ञांनी श्रोत्यांना करून दिली.

अनेक लेखक आणि वैज्ञानिकांनी भाषण, संवाद, रूपक, कविता, गाणी, प्रश्न मंजुषा आणि नाटक या माहित असलेल्या प्रसारण प्रकार बरोबरच नवीन पध्दतीने ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली. आकाश दर्शनासारखा दृश्य कार्यक्रम आकाशवाणीने शब्द माध्यमातून लोकप्रिय केला. खग्रास सूर्य ग्रहणाचे धावते वर्णन सादर केले. धुमकेतूचे दर्शन भल्या पहाटे विज्ञान रसिकांना घडवले. ग्रामिण भागात विज्ञान संमेलन भरवून, तिथल्या लोकांनी प्रत्यक्षपणे वैज्ञानिकांशी संवाद साधला. बुवाबाजी, जादूटोणा या सारख्या प्रचलित अनिष्ट रिती विषयावर प्रात्यक्षिके करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न अंनिसच्या मदतीने केला. प्रत्यक्ष शेती तज्ञांना शेतात घेऊन जाऊन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थानिक आणि जागतिक घडामोडींचा आढावा वेळोवेळी सादर करून श्रोत्यांच्या ज्ञानात भर घातली.
ही कामगिरी २० वर्षे करीत असताना अचानकपणे शासनाकडून खीळ बसली आणि विज्ञान प्रसाराचा घेतला वसा सोडून द्यावा लागला. विज्ञानप्रसाराची पाळंमुळं आता खोलवर रुजताहेत असं जाणवत असताना विपरीत असे घडले आणि शहाणे करून सोडावे हे व्रत अर्धवट सोडून द्यावे लागले.
आकाशवाणी अजूनही ते करते आहे पण गति, ऊर्जा, उत्साह आणि परिणाम या विना. आकाशवाणीला ऊर्जितावस्था जेव्हा प्राप्त होईल त्यावेळी हे कार्य पुन्हा जोमाने सुरू होईल पण तो दिन येणे गरजेचे आहे. सध्यातरी खेदाने म्हणावेसे वाटते की गेले ते दिन गेले आणि आम्ही दीन झालो.

— लेखन : डॉ किशोर कुलकर्णी. निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
