आयुष्यभर ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढा दिला त्या दिवंगत डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनीच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द या छोट्याशा गावात माणूसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली त्या निमित्ताने ही कविता.
” आठवण ”
अंधश्रद्धा निर्मूलनाचा
तुम्ही घेतला होता वसा
नियम कायदे खूप झाले
सांगून कोरडा झाला घसा
कितीतरी जीवांचे आज
नाहक बळी जात आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
भूत भानामती अंगात देव
यांनी मांडला आहे उच्छाद
भोळी भाबडी जनता मात्र
अडकून पडते आहे गुच्छात
ज्ञाना विणा उपाय नाही
शिक्षणाचा अभाव आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
करणी कवटाळ जारण मारण
थोताडांला आला आहे उत
गुप्त धनाच्या लालसे पायी
जुळवून घेती बरेच सुत
सांगण्यासाठी विज्ञान आहे
वापर कोण करत आहे ?
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
गंडे दोरे बांधून बांधून
आता थकलो आहो आम्ही
दवाखान्याच्या इलाजाशिवाय
पर्याय येणार नाही कामी
समाजाच्या हिता करवी
तुम्ही गमावले प्राण आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
जो तो उजाडलेला दिवस
नवीन नवीन घेऊन येतो
बांधून बांधून झाडाला
कोणी येतो मार देतो
परिसिमा हो अज्ञानाची
कोणाचा बळी जातो आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
काळी जादू जादूटोणा
काढा डोक्या मधली घाण
श्रद्धा असावी डोळस
वाढवून घेवू नका ताण
अंधाराच्या डोहा मधून
आता बाहेर निघणे आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
शाहू फुले आंबेडकरांची
शिकवण कुठे गेली ?
विज्ञानवादी विचारांची
फार दैना मोठी झाली
विद्ये विना मती गेली
आज निती कुठे आहे ?
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे
जीवनभर ज्यांच्यासाठी
तुम्ही खपले दिला लढा
खुळचट भ्रामक कल्पना
नष्टतेचा दिला तुम्ही पाढा
गैरहजेरी तुमची आज
आम्हाला जाणवत आहे
खरं सांगू दाभोळकरजी
तुमची आठवण येते आहे

– रचना : पी के पवार
खुप छान सर