आपल्या ‘ न्यूज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल चे एक वैशिष्टय़ म्हणजे पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या काही लेखमाला पुस्तक रुपात अवतरल्या आहेत. नावेच सांगायची तर,
* वर्षा भाबळ यांची “जीवन प्रवास”,
* निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांची “मी, पोलीस अधिकारी”,
* सौ रश्मी हेडे यांची “समाजभूषण”,
* मेघना साने यांची “परदेशस्थ मराठी”,
* निवृत्त पुराभिलेख संचालक डॉ भास्कर धाटावकर यांची “माझी कॅनडा अमेरिका सफर”,
* देवेंद्र भुजबळ यांची, “आम्ही अधिकारी झालो”, “माध्यमभूषण” आदी होत. तर काही लेख माला पुस्तक रुपात येऊ घातल्या आहेत.

वेबपोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखमालांची पुस्तके होण्याच्या उपक्रमात नुकतीच एक छान भर पडलीय, ती म्हणजे ठाणे येथील श्री विकास मधुसूदन भावे यांच्या “ओठावरली गाणी” या पुस्तकाची. भावे यांचे विशेष कौतुक यासाठी वाटते की, त्यांनी अक्षरश: एकही खंड पडू न देता, पाच पंचवीस नव्हे तर रेडिओवर प्रसारीत झालेल्या तब्बल शंभर गाण्यांचे अतिशय सुरेख, तरल, साध्या सोप्या भाषेत लिहिलेले रस ग्रहण पोर्टल वर नियमितपणे प्रसिद्ध होत राहिले. या लेखमालेला देश विदेशातून छान प्रतिसाद मिळत गेला. लेखमालेचा एक निश्चित वाचक वर्ग निर्माण झाला. विकास भावे यांच्या या लेखन त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणजे नुकतेच त्यांचे “ओठावरली गाणी” याच नावाने प्रकाशित झालेले पुस्तक होय.
पुस्तक प्रकाशन समारंभ
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि संवेदना प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विकास भावे यांच्या “ओठावरली गाणी” या पुस्तकाचे शानदार प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्याहस्ते ठाण्यातील रोटरी हॉल, नौपाडा येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून लोकप्रिय ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर रोटरी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री जितेंद्र भांबुर्डे, अनघाचे अमोल नाले, कवी, चित्रकार रामदास खरे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन झाल्यावर सौ तृप्ती भावे आणि सहकाऱ्यांनी पुस्तकातील काही भावगीते सादर केली. प्रकाशक नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले.
विकास भावे यांनी आपल्या मनोगतातून या पुस्तक निर्मितीमागची आपली भूमिका मांडली. यावेळी अशोक बागवे आपल्या भाषणातून म्हणाले, “कवीचे शब्द हे कागदावर मृत असतात, संगीतकार त्याला अमृत पाजतात आणि हे शब्दसुर मंथनातून कसे बाहेर आले ते गायक आपल्या गळ्यातून सांगतात. त्यामुळे गाणं म्हणजे ही एक प्रकारची त्रिगुणात्मक सृष्टी आहे. ‘ओठावरील गाणी’ हा मौलिक ग्रंथ म्हणजे मर्मबंधातली ठेव आहे. हा ग्रंथ नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी विद्यापीठाला अभ्यासाला लावणे आवश्यक आहे.”

तर प्रमुख पाहुण्या, जेष्ठ गायिका मधुवंती दांडेकर यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या,”शंभर अजरामर गाण्यांचं रसग्रहण कवी विकास भावे यांनी उत्तम पद्धतीनं केलं आहे. त्यांना आपल्या वडिलांकडून म्हणजेच कविश्रेष्ठ म पां भावे यांच्याकडून काव्याचा वारसा मिळाला आहे. मी स्वतः गायिका असल्याने गीताचा भावार्थ समजून घेणं किती आवश्यक आहे मी जाणते. भावसंगीताचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.” त्यांनी सोबत काही नाट्यगीते देखील पेश केली.
कवी, चित्रकार रामदास खरे यांनी चाळीस वर्षांपूर्वीचा आकाशवाणीचा सुवर्ण काळ किती सुंदर होता, गाणी कशी रसिकांच्या हृदयात रुजली याबद्दलचे विचार मांडले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके निवेदन निवेदिका डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. कवी विकास भावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होती.
श्री विकास भावे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

धन्यवाद देवेंदजी🙏 तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी शंभर गाण्यांचा पल्ला गाठू शकलो आणि आज हा संदर्भ ग्रंथ संवेदना प्रकाशनातर्फे पुस्तक रूपाने रसिक वाचकांना उपलब्ध झाला आहे…. पुनश्च धन्यवाद 🙏
शंभर लेखांचे पुस्तक अवतरले. सुंदर वृत्तान्त.