Wednesday, December 3, 2025
Homeसंस्कृतीआम्ही पालघाटकर.....

आम्ही पालघाटकर…..

मराठी पाऊल पडतेय पुढे…..आज आपण जाणून घेणार आहोत केरळ मधील पालघाटकरांविषयी. लेखन केलंय तेथील रहिवासी, कवयित्री मनीषा पाटील यांनी….

नवीन पुणे बंगलोर दृतगती मार्ग पुढे तामिळनाडूतून तसाच आमच्या पालघाटला येतो, आणि इथून सुरु होते Gods own country – निसर्गरम्य केरळ. नारळाच्या, केळीच्या बागा, खळखळ करत जाणारी नदी, मध्येच एखाद्या डोंगरावर रबरची झाडे असा प्रसन्नदायी केरळ.

पण आज आपण जरा पालकाड किंवा पालघाट विषयी जाणून घेणार आहोत. Palakkad चा अर्थच असा होतो की स्थानिक वृक्ष असलेले जंगल. Forest of pala trees.

सुरवातीला पालघाट तामिळनाडू मध्ये होते नंतर ते केरळमध्ये आले. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळ या दोन्हीचे सुंदर मिश्रण इथे पाहायला मिळते. चौदा जिल्ह्यापैकी पालकाड हा एक जिल्हा इथूनच केरळची सुरुवात होते.

केरळचे तापमान पाहता पालकाड मध्ये सगळ्यात जास्त उष्णता असते. जास्त भातही इथे पिकतो.
हिंदू, मुस्लिम, ख्रिस्तियन तिन्ही धर्माचे लोकं गुण्या गोविंदाने राहतात. हिंदूंचे नवीन वर्ष विशू, ओणम फार उत्साहात साजरा होतो. विशूला पूजा करून मंदिरात जाऊन आल्यावर वडिलधारी मंडळी लहानांना आशीर्वादरुपी नवीन नोटा देतात. १०,२०,५०… ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार.. ओणमला दारात फुलांच्या रांगोळ्या सजतात आणि विशेष जेवण ‘ओणम सद्या‘ घरोघरी बनवलं जात.

रमजानच्या पवित्र महिन्यात ईदच्या खरेदीसाठी बाजार फुलून गेलेला असतो. आगळंच चैतन्य असतं. तसंच क्रिसमसच्या वेळीही. छान प्रकारे क्रिसमसही साजरा होतो.

मंदिराच्या यात्रा असतात तेव्हा खाऊची दुकाने, मुलांसाठी खेळण्याची दुकाने असतात आणि शोभा यात्राही काढतात खास आकर्षण म्हणजे हत्तीच्या मिरवणूका. हत्तीना सजवून त्यांच्या मिरवणूका काढतात आणी शेवटी मैदानात सगळे हत्ती एकत्र आणतात. सजलेले हत्ती, त्यावर माहूत आणि पंच वाद्याचे वाजवणे अपूर्व सोहळा असतो खरा.

पण इथल्या सणाबरोबर आपले महाराष्ट्रीयन सण ही साजरे होतात बरं का.. इथली मराठी कुटुंबे आहेत ते एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करतात. गणपतीची स्थापना करून सकाळ संध्याकाळ त्याची मनोभावे आरती होते, प्रसाद केला जातो, एक दिवस सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

त्याचबरोबर सर्व मराठी महिला नटून थटून एकत्र येऊन संक्रातीला हळदीकुंकू कार्यक्रम ठेवतात. तिळगुळ देत घेत वाण लुटणंही आनंदाने होते. वटपौर्णिमेलाही साऱ्या वड पुजायला अगदी भक्तीभावाने जातात. आपण कुठेही असलो तरी आपल्या पुढील पिढीला आपल्या सणांची, संस्कृतीची माहिती करून देणे हे ही महत्वाचे आहे.

शहराच्या मध्यवर्ती प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कोटा मैदान.

कोटा मैदान

टिपू सुलतानने बांधलेली अभेद्य अशी तटबंदी.

बाहेरच्या बाजूला पाण्याचा खोल कॅनॉल आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कोट्यामध्ये प्रवेश केल्यावर आतमध्ये हनुमानाचे मंदिर. रोज सकाळ संध्याकाळ भाविक इथे दर्शन घ्यायला येतात. दर्शन घेवून कोट्याच्या बाहेर लावलेल्या गवतात लहान मुले खेळतात, मजा करतात, काही चालायला येतात पण चालत असताना अस्ताला जाणारा सूर्य पाहणे म्हणजे खरोखर अद्भुत नजाराच.

पालकाडचे खास विशेष म्हणजे कल्पाती येथील विश्वनाथ स्वामी मंदिर.

शहरापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर येते. दक्षिणेची काशी म्हणतात याला. अशी मान्यता आहे की या मंदिरात आल्यानंतर काशीला जाऊन जितके पुण्य मिळते त्याच्या अर्धे पुण्य इथे मिळते. मंदिरा जवळूनच कल्पाती नदी वाहते. वर्षातून एकदा मोठा रथोत्सव असतो. परंपरा संस्कृती जपत या भागातील घरेही अजून पारंपारिक पद्धतीची आहेत.

कल्पाती पासून पुढे गेल्यावर रमनीय निसर्ग दिसू लागतो. डोंगर त्यावर खेळ खेळणारे ढग हिरवी भाताची शेती आणि त्यात बगळ्यांची धवल नक्षी, मध्येच उंच तोऱ्यात नारळाची झाडं.. अवर्णनीय अशी विधात्याची निर्मिती. कितीही पाहिलं तरी समाधान काही होत नाही..
पुढे आपण फँटसी पार्कमध्ये कुटुंबासमवेत, मित्र मैत्रिणींसोबत जाऊ शकतो दिवसभर धमाल करू शकतो.

याच्या जरा पूढे मलम्पूळा धरण ( Malampuzha dam ) भव्य दिव्य असं धरण. मैसूर बागेची प्रतिकृती इथे केली आहे.हातात खाऊ घेवून बागेतून चालत फोटो, सेल्फी काढत फिरायला मज्जा येते. हवे तर बोटिंगही करू शकतो आपण.

बागेतून वर गेल्यावर धरणाच्या भिंतीवर पोहचतो. इथून पाण्याचा साठा पाहता येतो. पाण्यात मध्येच एखादी झाडांनी नटलेली टेकडी, आजूबाजुची दाट वनराई मोहिनी घालते.

इथून बाहेर पडल्यावर आगळं वेगळं असं आकर्षण म्हणजे रोप वे. यात बसून एका टोकापासून दुसऱ्या टोका पर्यंत आणि परत माघारी अशी एक फेरी मारत खालील बाग, धरण पाहणे डोळ्याचे पारणे फेडते.धरणाच्या बाजूने फिरताना एका बाजूला डोंगर, मध्ये मध्ये वस्ती आणि एका बाजूला अथांग पाणी मनस्वी समाधान देतं. इथे सर्प उद्यान, मच्छालय आहे. मुलांनाच काय सर्वांनाच आवडणारे असे हे ठिकाण.

जरा पुढे गेल्यावर खडक उद्यान आहे. यामध्ये प्लास्टिक बाटल्या, कॅन, फुटलेल्या टाईल्स, लाईटचे फ्युज, बांगडया अशा खराब झालेल्या वस्तूंपासून मुर्त्या बनवलेल्या आहेत.

शहरात पारंपारिक जेवणा बरोबर नवीन पदार्थाचे हॉटेल्सही आहेत. इथली बरीच लोकं अरब देशात असल्याने हॉटेल मधील मेनूत तिकडच्या पदार्थांची झलक दिसतेच.
पारंपारिक कपड्यांची क्रेझ अजूनही आहेच पण त्याबरोबर नवीन ब्रँडेड कपड्यांचीही दुकाने आहेत.

नव्या जुन्याची सांगड घालणार असं आमचं हे पालकाड सर्वांना आवडणार आहे. तुम्हीही एकदा येऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +919869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. छान लेख
    पालकड़ ला एखादा जाउन यावे असे वाटणारा लेख
    उत्तम लिखाण
    अभिनंदन मॅडम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments