इंग्लंड मुक्कामात आम्ही एक दिवस ग्रिनीचला गेलो. हिचीन रेल्वेस्टेशनवरून लंडनला जाणाऱ्या ट्रेनने निघालो. स्टेशनवरून कोकोनट दुधाच्या फक्कड चहाचे घोट घेत प्रवास चालू होता. खिडकीतून बाहेरचा मनमोहक निसर्ग पहाण्याची मौज काही औरच होती. विस्तीर्ण शेते, आकाशात विविध रंगाची उधळण, ‘ खेड्यामधले घर कौलारू’ या लहानपणी वाचलेल्या कवितेप्रमाणे आखीव रेखीव शेतांतून डोकावणारी कौलारू घरं पहात होतो, मोबाईलच्या कॅमेर्यात टिपत होतो.नंतर
कळून आलं की, फोटो आठवण म्हणून ठीक आहेत. पण त्यात वेळ घालवण्यापेक्षा डोळ्यांनीच ते पहाणं किती रम्य आहे.आणि नंतर फोटो काढण्याचं थांबून पहात बसलो. घडीघडीला बदलणारे आकाशाचे रंग, पळणारी झाडं पहाताना ग्रामीण भाग संपवून नागरी सुधारणांच्या छटा कधी दिसू लागल्या ते कळलच नाही.
ग्रिनीचमध्ये :
ग्रिनीच हे इंग्लंडमधील लंडन शहराजवळचे टुमदार गाव. या गावचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व मोठे आहे. इथे असलेल्या राॅयल ऑब्झरवेटरीजवळ एक काल्पनिक रेषा आहे, त्यानुसार जगातील वेळा ठरवल्या जातात.
त्यालाच ‘ ग्रिनीच मीन टाईम’ म्हणतात. राॅयल ऑब्झरवेटरी आणि त्यासंबंधीचे भव्य संग्रहालय सायंकाळी पाच वाजता बंद होते. आम्ही गेलो तेव्हा ते बंद झाले होते. बाहेरही ती काल्पनिक रेषा आखली असून तिथे आम्ही फोटो काढले.

चाळ माझ्या पायात :
इथल्या विस्तीर्ण मैदानावर एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. भारतीय वर्षातल्या अनेक मुली आणि काळ्या वेषातील मुलं तालबद्धपणे नाचत होते.
एक जागतिक सत्य :
जवळच मुलांसाठी एक छोटेसे गार्डन आहे. तिथे एक आखाड्यासारखा खोलगट भाग आहे. त्यात पांढरीशुभ्र वाळू पसरली असून लहान मुलं त्यात खेळत होती. काठावर बसून एक आई आपल्या मुलांचं खेळणं पहात होती. मुलं मधून मधून आईकडं येऊन ‘किती मज्जा केली’ हे सांगत होती. गार्डनमध्ये लाकडाची छोटी घरंही होती. काही लहान मुलं तिथं खेळत होती. एक लहान मुलगा पाय घसरून पडला आणि रडायला लागला. धावतपळत त्याची आई आली आणि त्याला थापटत राहिली. थोड्या वेळात मुलाचं रडणं थांबलं. आई ही लहान मुलांचं सर्वात श्रेष्ठ संरक्षण असतं हे जागतिक आणि सार्वकालिक सत्य मी पहात होतो.
परत प्रवास :
सायंकाळचे आठ वाजून गेले होते. मात्र सूर्य मावळतीवर अजून होता. त्याची सोनेरी किरणे वृक्षांची पाने उजळून निघाली होती. एका ठिकाणी जमिनीच्या उतरत्या भागात खुला रंगमंच बनवला होता. आपल्याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही अशाच स्वरूपाचा सुरेख खुला रंगमंच आहे.

ढिशुंम :
परत एका ट्रेनने आम्ही लंडनमधील ढिशुंम या अस्सल भारतीय हाॅटेलात जेवायला गेलो. आत जायला मोठी लाईन होती. जवळपास अर्धा तास वेटिंगला उभे होतो. उभे रहाणाऱ्यांसाठी वाईन किंवा चहा हाॅटेलातर्फे फुकट दिला जातो. एक मुलगी हसत हातात वाईन आणि चहाचा ट्रे घेऊन आली. हवेत गारठा होता. मात्र चहाने घसा गरम केला. रिकामे चहाचे कप आणि वाईनचे ग्लास न्यायला ती मुलगी परत आली. आम्ही मराठीत बोलत होतो. ते ऐकून उत्सुकतेने तिनं विचारलं, “आर यू फ्राॅम महाराष्ट्र इन इन्डिया ?” आम्ही पुण्याहून आलो म्हटल्यावर तिनंही सांगितलं की, ती मुळची नाशिकची. तिथल्या काॅलेजात ती पदवीपर्यंत शिकून पुढचं शिक्षण इथं करते. अर्थार्जनासाठी ती या हाॅटेलात काम करते. आम्हाला भेटून माहेरच्या माणसांना भेटल्याचा आनंद तिला झाला होता. तर आम्हालाही तिचा अभिमान वाटत होता.
परतताना विचार करत होतो. जगाच्या पाठीवर कुठेही जा… प्रेम, वात्सल्य अशा भावना सार्वत्रिक असतात.

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800