Home बातम्या एक प्रसन्न संध्याकाळ…

एक प्रसन्न संध्याकाळ…

0

शनिवारची संध्याकाळ, एक प्रसन्न संध्याकाळ ठरली. निमित्त होते एकपात्री कलाकार, अभिनेत्री, लेखिका सौ मेघना साने यांच्या “कोवळी उन्हे” या एकपात्री प्रयोगाच्या ३०० व्या कार्यक्रमाचे तसेच त्यांच्याच “एडजस्टमेंट” आणि “गुणीजनांचा कलाविष्कार” या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचे.

प्रारंभी सौ मेघना साने यांनी “कोवळी उन्हे” या एकपात्री प्रयोगातूनच त्यांची कलाक्षेत्रातील वाटचाल काही घटना, प्रसंग सुरेख मुद्राभिनयासह सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या बरोबरच गायक हेमंत साने आणि गायिका आकांक्षा पालकर यांनी काही द्वंद गीते तर काही एकल गीते गाऊन कार्यक्रमात सांगीतिक बहार आणली.

कोवळी उन्हे

या नंतर मान्यवरांच्या हस्ते “एडजस्टमेंट” आणि “गुणीजनांचा कलाविष्कार” या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचे करण्यात आले.

समिक्षिका डॉ अरुंधती भालेराव यांनी “एडजस्टमेंट” या कथा संग्रहातील कथा आपल्या हृदयाला भिडणाऱ्या असून त्यातील काही कथा या कादंबरीत रुपांतरीत होण्याच्या क्षमतेच्या आहेत असे सांगितले.

अभिनेते प्रमोद पवार यांनी सांगितले की, मेघना बरोबर अनेकदा अभिनय केला आहे पण तिच्यातील लेखन गुण कसे विकसित होत गेले, हे कधी कळलेच नाही. बऱ्याचदा आपण एकत्र असतो, एकत्र काम करीत असतो, तरी एकमेकांना नीट ओळखतोच असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूरदर्शन वृत्त निवेदिका, साहित्यिका वासंती वर्तक यांनी “गुणीजनांचा कलाविष्कार” या पुस्तकातील सौंदर्यस्थळे या वर मार्मिक भाष्य करून मेघना ने सतत लिहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन चे पदाधिकारी राजीव भालेराव यांनी त्यांच्या आटोपशीर मनोगतात, अमेरिकेतील मराठी माणसाचा सुरुवातीचा संघर्ष सांगून तो स्थिरावल्यानंतर त्याला आपल्या परंपरा, संस्कृती, मुळे आठवू लागतात आणि मग तो सांस्कृतिक दृष्टया प्रगल्भ होत जातो, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात मेघना साने यांच्या लेखन वाटचालीत मदत केलेल्या लेखक रामदास खरे, कवी विकास भावे आणि न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांचा गौरव करण्यात आला.

प्रारंभी उद्वेली प्रकाशनाचे विवेक मेहत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ प्रतिक्षा बोर्डे यांनी केले.

या कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशन चे कौस्तुभ मुळे, विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उस्फुर्त भेटीगाठी : या कार्यक्रमांनंतर झालेल्या उस्फुर्त भेटीगाठीनी ही संध्याकाळ आणखीनच प्रसन्न आणि अविस्मरणीय ठरली. कार्यक्रमासाठी आलेली दूरदर्शन मधील मंडळी सर्वश्री निर्माते वंदन कुलकर्णी, राम खाकाळ, इंजिनियर रामराजे आणि देवेंद्र भुजबळ या मंडळींना पाहून वासंती वर्तक आणि प्रमोद पवार यांना खूप आनंद झाला.

तसाच आनंद या सर्वांना झाला. हे भेटणे, बोलणे संपूच नये, असे वाटत असताना, हॉल ची वेळ संपत आल्याची सूचना मिळाली आणि बोलणे आटोपते घ्यावे लागले.

यानंतर देवेंद्र भुजबळ यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊडेशन चे पदाधिकारी राजीव भालेराव यांना न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आणि पब्लिकेशन्स ची सविस्तर माहिती देऊन न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने नुकतीच प्रकाशित केलेली स्वलिखित “आम्ही अधिकारी झालो”, “करिअरच्या नव्या दिशा” ही पुस्तके तसेच दूरदर्शन चे निवृत्त संचालक चंद्रकांत बर्वे यांनी लिहिलेले आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेले “सत्तरीतील सेल्फी” अशी ही तीन पुस्तके त्यांना भेट दिली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version