Home बातम्या नांदेड : निराधारांना १ अब्ज ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप

नांदेड : निराधारांना १ अब्ज ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप

0

नांदेड :निराधारांना १ अब्ज ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप

महाराष्ट्र शासन पुरस्कृत सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा योजना लाभार्थ्यांना नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त एक अब्ज २२ कोटी १३ लक्ष रु अनुदानापैकी डिसेंबर २०२४ अखेर एक अब्ज ७ कोटी ६३ लक्ष ३२ हजार रूपये इतके अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील संगायो/इंगायो तहसीलदार श्रीमती प्रगती चौंडेकर यांनी नुकतीच दिली.

मंडल अधिकारी स्तरावर लाभार्थ्यांना डिबीटी आधार प्रमाणिकरण कार्यवाही करण्यात येत असून यासंबंधी लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी असे सर्व तालुका तहसीलदार यांनी आवाहन केले आहे. पात्र लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा जाणीवपुर्वक प्रकर्षाने लाभ दिला जात असून लाभार्थ्यांचे डिबीटी आधार सिडिंग करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात सरळ अनुदान जमा होण्यासाठी आधार सिडिंग आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी संबंधित बॅंकेत आधार लिंक केले तर अनुदान वर्षभर मिळेल, अशीही माहिती श्रीमती प्रगती चौंडेकर यांनी दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग, सिकलसेल, एड्स, कर्करोग सारख्या दुर्धर आजार असलेल्यांसाठी शोध मोहीम राबविण्यात येवून १३१२ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. या दुर्धर आजारग्रस्त लाभार्थ्यांना जानेवारी २०२५ पासून अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

या राष्ट्रीय विशेष सहाय्य योजनेंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत अनुदान एकत्रित दिले जाते. राज्यशासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १२,३१४ तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ६५,४३८ लाभार्थी आहेत. या दोन्ही योजनेत राज्य हिस्सा १०० टक्के असतो. केंद्र व राज्य शासन हिस्सा असलेल्या
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना (६५ ते ७९ वयोगट)
२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना (८० वर्षांवरील)
३) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (६५ खालील)
४) इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना (६५ वर्षांखालील)

या सहा योजनेत सर्व लाभार्थ्यांना मासिक १५०० रूपये अनुदान दिले जाते.

इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेचे जिल्ह्यात २९,४४७ लाभार्थी आहेत तर इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजनेत २७१ लाभार्थी आहेत. दिव्यांग योजनेचे ३८ लाभार्थी आहेत.

कुटूंबातील कमावती व्यक्तीचा ६० वर्षाआधी आकस्मिक मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून कुटुंबास एकदाच २० हजार रुपये अनुदान दिले जाते. या चालू आर्थिक वर्षात अशा ४१७ कुटुंबांना दिले जाणार असून ८० लक्ष रुपये तालुकानिहाय वितरित करण्यात आले आहेत, असेही तहसीलदार श्रीमती प्रगती चौंडेकर यांनी सांगितले.

— लेखन : रामचंद्र देठे.
निवृत जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version