“जाणले मी भोवताली,
मतलबी ही माणसे.. !!
वेळ आली सोबतीची,
प्रश्न त्यांनी मांडले..!”
अनिसा सिकंदर शेख यांच्या मला आवडलेल्या 👆वरील शेराचे रसग्रहण सादर करीत आहे..!!

परिवारातील एक अत्यंत शांत, सोज्वळ स्वभावाच्या व दर्जेदार गझल लेखन करणाऱ्या गझलकारा म्हणजे अनिसा सिकंदर होत. मातृभाषा मराठी नसतानाही मनाला भिडणारे खयाल संपन्न शेर त्या लिहितात. आजचा कालगंगा /देवप्रिया वृत्तात असलेला शेरात त्यांनी जगामध्ये आढळणाऱ्या स्वार्थी, मतलबी व्यक्तींवर नेम साधून शरसंधान केले आहे.. !!
जीवनभरच्या वाटचालीत आपला अनेकांशी संपर्क येतो, संबंध वाढतात. हे काही संबंध प्रेमाचे असतात तर काही लोक स्वार्थासाठी निभावतात..!!
“जाणले मी भोवताली मतलबी ही माणसे..!!”
ताईंनी उलामध्ये वापरलेला मतलबी हा शब्द खूप समर्पक असा शब्द आहे..!!
मतलबी या शब्दाच्या पाठीमागे अनेक दुर्गुण नजरेसमोर येतात..!! अहंकार, संपत्तीची लालसा, हावरटपणा, मी माझे अशी संकुचित भावना, असत्याशी मैत्री.., शब्द फिरवण्याचे कौशल्य, सत्तेची प्रचंड इच्छाशक्ती. स्वतःच्या सत्तेचा माज, पद मिळवण्यासाठी कोणत्याही कृत्य करण्याची तयारी.!! बरीच लांब लचक यादी आहे !!
खरोखरच ताईंनी म्हटल्याप्रमाणे जग हे रंगबिरंगी माणसांनी भरलेले आहे.. !! शेर लहान असल्यामुळे सर्व व्यक्त होणे शक्य नाही !! पण माझ्या डोळ्यासमोर विरुद्ध प्रवृत्तीची माणसे पण तरळून गेली !!
आपण म्हणाल याची काय गरज ?? पण जोपर्यंत लखलखीत प्रकाशाची बाजू समोर येत नाही, तोपर्यंत काळ्या बाजूची तीव्रता, भयानकता लक्षात येत नाही !!
अशी माणसे प्रत्यक्ष ही आपल्याला भेटतात पण प्रमाण कमी..!!सुशील, सज्जन, सात्विक, दयाळू , प्रेमळ, कष्टाळू, प्रसन्न वृत्तीची, परोपकारी, त्यागी, सेवाभाव जपणारी सद्वर्तनाची, धार्मिक प्रवृत्तीची, दुसऱ्यांच्या आनंदात सुख शोधणारी, दुसऱ्यांच्या दुःखाने घायाळ होणारी, संवेदनशील वृत्तीची, स्वतःच्या तत्त्वा साठी प्राणार्पण करणारी, देश हाच देव म्हणणारी, चारित्र्य रक्षणासाठी बलिदान करणारी, अशी गुणसंपन्न माणसे आपल्याला भेटत असतात !! काही उदाहरणे बघूया.. !!
१) स्वतःच्या बाळासाठी प्राण्यांची पर्वा न करता बुरुजावरून उतरणारी हिरकणी.. !!
२) स्वामीच्या रक्षणासाठी स्वदेश रक्षणासाठी, प्राण्यांची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे !!
३) राज्याच्या युवराजाला सांभाळण्यासाठी युवराजाला बाजूला करून त्या ठिकाणी मरणासाठी आपला पुत्र ठेवणारी पन्नादायी.. !!
४) राक्षसांचा नायनाट करण्यासाठी एक नवीन शस्त्र बनवणे आवश्यक होते. त्यासाठी प्राणत्याग करून हाडे देणारे दधीची ऋषी !!
५) दरवर्षी गरिबांसाठी आपली सर्व तिजोरी दान करणारा राजा हर्षवर्धन !!
६) शील रक्षणासाठी जोहार करणाऱ्या राजपूत स्त्रिया !!
७) वकिलीचा व्यवसाय सोडून कुष्ठ पीडितांचे दुःख दूर करण्यासाठी जंगल भागात आनंदवन स्थापन करणारे महामानव बाबा आमटे!!
८) भर उन्हात तडफडणारे गाढव पाहून स्वतः जवळचे गंगाजल (जे रामेश्वरला न्यावयाचे होते.. यात्रा पूर्ण होणार होती) त्याला पाजून शांत करणारे संत एकनाथ.. !!
९) तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण.. ही देशाप्रती भावना ठेवून अनन्वित छळाची काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे… स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर..
ही सारी हिमालयातील उत्तुंग शिखरे !!
या पार्श्वभूमीवर अवतीभवती अधिक संख्येने दिसणारी. स्वार्थाने लडबडलेली माणसे.. !! यांना माणसे कसे म्हणावे ?? ही तर निव्वळ पशू जातीची !! क्रूर हिंस्र जनावरे !!
अगदी वैदिक काळापासून ते आजच्या काळापर्यंत ही माणसे ठळक चेहऱ्याने जाणवतात !!
स्वार्थीपणा ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. पण शिक्षणाने, संस्काराने, ज्ञानाने, धर्मग्रंथ वाचनाने तिच्यावर मात करता येते !!
१) रामायण काळातली कैकयी… मुलाच्या प्रेमाने अंध होऊन स्वार्थासाठी सर्वनाश ओढवून घेते.
२) महाभारतात अशा अनेक व्यक्ती आढळतात, ज्यांच्या स्वार्थ वृत्तीमुळे युद्ध, कलह आणि विनाश घडून आला..!! दुर्योधन, शकुनी, कर्ण, धृतराष्ट्र.
३) भागवतात कंस, हिरण्यकश्यपु या दोघांनीही अनुक्रमे बालकाची हत्या आणि प्रल्हादाचा छळ केला. अहंकार व सत्ता टिकवण्यासाठी!
४) छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबच्या ताब्यात देणारा गणोजी शिर्के आप्त होता.. !!
५) पेशवाईतील आनंदीबाई सत्तेसाठी प्रत्यक्ष पुतण्याच्या हत्येला कारणीभूत ठरली… !!
६) आजची राजकीय परिस्थिती तर स्वार्थाची अगदी बजबजपुरी आहे !! अगदी आपल्या सर्वांच्या पाहण्यातले एक मंत्री काँग्रेसमध्ये आयुष्य गेलं पण आता बीजेपी मध्ये प्रवेश झाला आहे !!
७) दूरदर्शनवर एक बातमी पाहिली होती. उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यामध्ये एका जन्मदात्या मुलाने पत्नीच्या मदतीने .. शेतीच्या वादातून आईची हत्या केली !
अशा रीतीने प्रत्येक जण संपर्कात येतो, तो काही ना काहीतरी लाभ होईल या आशेने !! बोटावर मोजण्याइतके लोक प्रेमाने संबंध निभावत असतात !!
पशुंचे जग पहा ! एकदा एक सभ्य लांडगा भोळ्या मेंढीला म्हणाला.. “बाईसाहेब माझ्यासारख्या गरिबाच्या घरी आपण केव्हाच पायधूळ झाडणार नाहीत का..?”
मेंढेने चतुराईने उत्तर दिले, “लांडगोबा, तुमचे घर तुमच्या पोटात नसते तर तुम्हाला भेटायला येण्यात मला आनंद झाला असता..!!”
एकदा एक लहान मुलगा एका अरुंद अशा नालीत पडला. त्याला चिंचोळ्या जागेतून काढता येत नव्हते. शेवटी एका हुशार माणसाने चमचमणारे एक नाणे वरच्या दगडावर ठेवले. त्यानंतर ते नाणे घेण्यासाठी लहान मुलगा वाकडेतिकडे अंग करून वर आला.. सर्वांचा जीव भांड्यात पडला..!!
गझलकारा ताईने स्वार्थीपणा, कोडगेपणा.. दाखविला आहे ! अशी मतलबी माणसे एखाद्या माणसाकडून मदत घेण्यासाठी नम्र बनतात, काकुळतीला येतात. गयावया करतात. पाया पडतात. जन्मभर आपल्या ऋणात राहीन म्हणतात.
पण दुर्दैवाने जेव्हा उपकार कर्त्यावर संकटमय परिस्थिती ओढवली असता, तो मदतीची अपेक्षा करतो. तेव्हा हा कृतघ्न माणूस त्याच्यापुढे आपल्याच दुर्दैवाचा, असहायतेचा, हतबलतेचा पाढा वाचतो. पुन्हा गोड बोलून म्हणणार मला जाणीव आहे, आपण मला संकटातून बाहेर काढले. पण खरे सांगू..? खरोखर मला मला मनापासून आपल्याला मदत करण्याची इच्छा आहे. पण सॉरी… मी नाही मदत करू शकत. अशी माणसे म्हणजे नाक कापले तरी दोन भोके आहेत अशा जातीतली असतात ..!!
खालील संस्कृत श्लोकात हेच दिसते..!!
“वृक्ष क्षीणफलं त्यजन्ति विहगा: शुष्कं सर:सारसा:
निर्द्रव्यं पुरुषं त्यजन्ति गणिका:भ्रष्टं नृपं मन्त्रिण;..
पुष्पं पर्युषितं त्यजन्ति मधुपा:दग्धं वनान्तं मृगा:.
सर्व:कार्यवशात जनोsभिरमते
तत् कस्य को वल्लभ: !!”
पक्षी फळे नसलेल्या वृक्षाचा त्याग करतात. सारस पक्षी कोरड्या सरोवराचा, गणिका द्रव्यहीन पुरुषांचा, हरीण जळत्या वनाचा, भ्रमर रसहीन पुष्पांचा त्याग करतात…!!
संत तुकाराम म्हणतात…
“माझिया मी पणावर
पडो पाषाण..!!
जळो हे भूषण
नाम माझे !!”
अशाप्रकारे गझलकारा ताईंनी शेराच्या सानीमध्ये हेच सांगितले की सोबतीची, मदतीची वेळ येताच वेगळी कारणे दिली जातात. तोंडाला पाने पुसली जातात. सोबतीबरोबरच मदत, सहकार्य हे अपेक्षित असते…!!
स्वार्थी पणाने न जगता खरा माणूस म्हणून जगावे हेच त्यांनी सुचवले आहे !!
शेवटी एकंदर शेराचे सार म्हणून एक श्लोक सांगून मी थांबते !!
“नौकां वै भजते तावत् यावत्
पारं न गच्छाति..!!
उत्तीर्णे तु नदीपारे नौकाया:
किं प्रयोजनम्..!!”
खूप खूप अभिनंदन, अनिसाताई अतिशय सुंदर शेर !!

— रस ग्रहण : सुधा नरवाडकर. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800