Thursday, December 25, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं ( ६५ )

ओठावरलं गाणं ( ६५ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत ! भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने, ढोल ताशांच्या गजरात, तर काही ठिकाणी मिरवणूक काढून, आपल्या लाडक्या गणरायाचं वाजतगाजत आगमन होऊन आज आठ दिवस झाले.

काही घरांमधून साश्रुनयनांनी “गजवदना तव रूप मनोहर” असं म्हणत, तेच रूप डोळ्यात साठवून, पुढील वर्षी लवकर येण्याचं गणपतीबाप्पा कडून आश्वासन घेऊन गणपतीबाप्पाचं विसर्जन देखील झालं आहे. तरीही समाजमनाचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मित्रहो, उत्साहाने भारलेल्या गणेशोत्सवाच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण पहाणार आहोत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं एक गणेश गीत ज्याचे शब्द आहेत –

गणराज रंगी नाचतो नाचतो
पायि घागऱ्या करिती रूणझुण
नाद स्वर्गी पोचतो

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणेशजींनाही पृथ्वीवर यायला आवडतं. आपल्या मातापित्यांच्या म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वतीदेवी या़ची परवानगी घेऊन कुठे बालस्वरूपात तर कुठे अवाढव्य स्वरूपात तर काही ठिकाणी भक्तांना भावेल अशा स्वरूपात गणेशजींचं पृथ्वीवर आगमन झालेलं आपल्याला दिसतं. मात्र “जे न देखे रवी ते देखे कवी” या उक्तीला अनुसरून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अंत:चक्षूंना, पृथ्वीतलावर जायला मिळणार या आनंदाप्रित्यर्थ गणराय नृत्य सादर करताना दिसतायत आणि नर्तन करताना पायातल्या पैंजणांचा होणारा कर्णमधुर नाद स्वर्गलोकात सर्वत्र ऐकू जातोय.

कटि पितांबर कसून भरजरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनू परि चपल साजिरी
लावण्ये साजतो

बाल गजाननाच्या मूर्तीची अनेक रूपं या दिवसात पहायला मिळतात. कुठे तो फेटा बांधून बसलेला असतो, कुठे चक्क उंदीर मामांच्या पाठीवर स्वार होऊन आपल्याला दर्शन देतो. कुठे एका हातात मोदक घेऊन दुसऱ्या हाताने आपल्या लाडक्या भक्तांना आशिर्वाद देत असतो, तर कुठे चक्क स्कूटर वरून तुमच्या भेटीला येतो. बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवातून गणरायाच्या विशालकाय रूपाचं दर्शन होत असलं तरी शांताबाईंच्या अंत:चक्षूंना दिसणाऱ्या या रूपाचं वर्णन करताना त्या म्हणतात कि भरजरी पितांबर नेसलेले बालगजानन शास्त्रोक्त पद्धतीने नृत्य सादर करतायत. त्यामुळे त्यांचे पदन्यास पहाताना देखील आपल्या मनाला होणाऱ्या आनंदाबरोबर एक सुंदर नृत्य पहात असल्याचं समाधानही माझ्या मनाला मिळतं आहे. कारण नृत्य सादर करताना आपल्या गुटगुटीत शरिराची नृत्याला बाधा येणार नाही याचं पूर्ण भान ठेवून, वीजेच्या चपळाईने नृत्याचे पदन्यास करणाऱ्या गजाननाची बालमुर्ती अधिकच शोभून दिसते आहे.

नारद तुंबरू करीती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रह्मा धरितो तालही रंगून
मृदंगही वाजतो

बालगजाननाच्या या नृत्यामुळे प्रेरित होऊन नारदमुनींनी देखील आपल्या वीणेच्या साथीने गायनाला सुरूवात केली आहे आणि देवगणांची अभूतपूर्व अशी साथ मिळाल्याने बालगजानन करत असलेल्या नृत्याची लज्जत अधिकच वाढली आहे. शारदादेवींचं मनमोहक वीणावादन, ब्रह्मदेवाने मृदुंगावर धरलेला ताल यामुळे स्वर्गलोकात रंगलेल्या या अवीट गोडीची मैफल आपल्या अंत:चक्षुंनी पहाणाऱ्या शांताबाईंनी ती शब्दाशब्दातून आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे.

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षिली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशू कौतुक पाहतो

लयबद्ध पदन्यासाच्या हालचालींमुळे पहात रहावं असं बालगजाननाचं मनमोहक नृत्य, शारदादेवीचं वीणावादन, नारदमुनी आणि देवगणांनी सादर केलेलं कर्णमधुर गीतगायन, जोडीला ब्रह्मदेवाचं मृदुंग वादन अशी ही सुंदर मैफील याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी सर्व देव, यक्ष, किन्नर अप्सरा या सर्वांनीच देवसभेत प्रत्यक्ष हजेरी लावली होती. अवीट गोडीच्या अलौकिक अशा गीत गायनाने सर्वांच्याच मनाची अवस्था “आनंदाचे डोही आनंद तरंग” अशी झाली होती. शिवाय आपल्या लाडक्या पुत्राचं कौतुक करण्यासाठी शंकर पार्वती जातीने हजर होते आणि गणेशाविषयीचा सार्थ अभिमान व कौतुक त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होतं.

हृदयनाथ मंगेशकर यांनी हे सुंदर शब्द संगीताच्या अप्रतिम कोंदणात बसवून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजात आपल्यापर्यंत पोचवले आहेत जे ऐकताना स्वर्गलोकातलं हे दृष्य आपल्याला डोळ्यासमोर उभं रहातं.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. विकासजी,
    नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
    शांता शेळके किती चतुरस्र कवयित्री लेखिका आहेत! कोणता विषय त्यांच्या लेखणीतून राहिलाच नाही.गणेश ही केवळ विद्येची नाही तर कलेचीही देवता आहे हे समजून त्याचे असे आनंददायी रूप लोकांसमोर ठेवलंय.आपण त्या देवसभेत रममाण होतो.

    मेघना साने

  2. शांता शेळके यांचे काव्य व आपले रसग्रहण दोन्ही उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”