नमस्कार 🙏
ओठावरलं गाणं या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. आनंद हा आपल्या मनात असतो आणि रेडिओवर लागणाऱ्या एखाद्या गाण्यातून एक वेगळंच रूप घेऊन हाच आनंद आपल्यासमोर व्यक्त होतो. काही काही गाण्यांमधून व्यक्त होणारा हा आनंद मिळवून देणारं ते गाणं संपलं तरी दिवसभर आपल्या मनात रेंगाळत रहातं. आज आपण पहाणार आहोत ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत….
“कशी करू स्वागता
एकांताचा आरंभ कैसा
असते कशी सांगता”
नवीन लग्न होऊन मुंबईच्या चाळीत राहायला आलेल्या नववधूच्या मनातल्या संमिश्र भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत. दोन खोल्यांच्या घरात त्या दोघांचं आयुष्य सुरु होतं खरं, पण घरातल्या अनेक माणसांसमोर त्या दोघांना एकमेकांशी धड बोलताही येत नाही. नवविवाहीत जोडप्याला ही संधी मिळावी (ज्याला अलिकडच्या काळात privacy म्हणतात) म्हणून घरातले सर्व सभासद ठरवून बाहेर जातात जेणेकरून दोघांनाही एकांत मिळेल. ही चालून आलेली संधी पाहून या नववधूला झालेला आनंद जसा ती व्यक्त करते आहे तेवढ्याच सहजतेने मनाचा उडालेला गोंधळही ती प्रकट करते आहे. त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ जराही न लपवता ती सांगते आहे “मी आल्यापासून ह्या घरात सतत माणसांची वर्दळ बघते आहे, प्रत्येक व्यक्तीचं आदरातिथ्य करण्यात दिवस कसा संपतो ते कळत देखील नाही. रात्री अंथरूणाला पाठ टेकली कि “निद्रा देवी प्रसन्न” ! लग्न झाल्यापासून नवऱ्याशी धड बोलताही आलं नाही मला, त्यामुळे आज मी घरात एकटी असले आणि एकांत सोबतीला असला तरी त्याचा आरंभ आणि शेवट कसा असावा तेच माहीत नसल्यामुळे, नट्टापट्टा करून घरी येणाऱ्या नवऱ्याचं स्वागत करावं की फक्त गोड हसून चहाचा कप त्याच्या समोर धरावा…. यापैकी काय केलं म्हणजे तो खूष होईल याबद्दल माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे.
कशी हसू मी ? कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालू की कवळू तुज नाथा
लग्न झाल्यापासून मला माझ्या नवऱ्याच्या जवळदेखील जायला मिळालेलं नाही त्यामुळे आता त्याच्यासमोर जाताना काय केलं म्हणजे तो खूष होईल याबद्दल माझ्या मनात नाना प्रश्न उभे राहतायत. तो घरात आला की गोड हसून त्याचं स्वागत करू की नुसतीच खाली मान घालून लाजल्याचा अभिनय करून तो मला मिठीत कधी घेतोय याची वाट पाहू ? की थोडासा धीटपणा दाखवून त्याला घट्ट मिठी मारू? पण त्याला जर तो माझा आगाऊपणा वाटला आणि तो चिडून निघून गेला तर ? तसं करण्यापेक्षा काहीही न बोलता मी त्याच्या मिठीत शिरले तर तो जास्त खूष होईल ? शी बाबा ! त्याची घरी यायची वेळ झाली तरी माझी गाडी अजून विचारांच्या ट्रॅकवरच अडकून पडली आहे.
फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हासवी की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर येईना सांगता
या घडीला घरात कोणीच नसल्यामुळे बागेतल्या झाडांवर फुललेल्या फुलांकडे आज माझं लक्ष गेलं. बागेतली ती टपोरी फुलं पाहून मन अधिकच प्रसन्न झालं खरं पण मग पुन्हा मनात आलं कळी रात्री कधीतरी वारा फुलवतो आणि मग तिचं फुलात रुपांतर होतं की या कळीचं आपोआप फुलात रूपांतर होतं ? की या कळीला आकाशातल्या चंद्र आणि चांदण्या हसवतात आणि आपण सकाळी उठून पाहिलं की प्रसन्नपणे हसणारं हे फूल आपल्याला दिसतं ? पण पतीराजांचं स्वागत कसं करावं याचा विचार करत असताना हे विचार मध्येच कुठे माझ्या मनात आले ?
कुणी न पुढती कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथमदर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता
एकीकडे मनाला प्रसन्न वाटतंय याचं कारण म्हणजे इतके दिवसांनी आज पहिल्यांदाच असं घडलं असेल की नेहमी माणसांनी भरलेल्या या घरात आज मी एकटीच आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला एकमेकांची जान पहचान होणार आहे, एकमेकांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. आज कोणीही आमच्या मीलनाच्या मध्ये येणार नाहीये. माझ्या सासरची माणसं इतकी समंजस आहेत कि नवविवाहीत जोडप्याला ही संधी मिळावी म्हणून आज सगळे अगदी ठरवून बाहेर गेले आहेत पण आव मात्र असा आणला होता की आम्ही सगळे अगदी सहज तिकिटं मिळाली म्हणून आम्ही सगळे आत्ता सिनेमाला जातोय आणि रात्री बाहेर जेवून उशिराने घरी येऊ. सगळ्या गोष्टी किती छान जमून आल्यात पण हे घरी आल्यावर यांच्याशी कसं बोलायचं….लाजत लाजत कि हसत हसत… अजूनही माझ्या मनाला या गोष्टीचा निर्णय काही घेता येत नाहीये.
ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीतसाजाने नटलेल्या या गाण्यातील नायिकेच्या मनातले भाव सुमन कल्याणपूरकर यांनी आपल्या आवाजातून सुंदररित्या व्यक्त केले आहेत.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर 💐
धन्यवाद अजितजी 🙏
छानच
धन्यवाद गौरव 🙏
सुंदर रसग्रहण👌👌👌
धन्यवाद अजितजी 🙏
छान रसग्रहण.
धन्यवाद विराग 🙏