Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं ( ८१ )

ओठावरलं गाणं ( ८१ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. पूर्वी रेडिओवर ऐकलेली जुनी गाणी आजही कोणी नुसतं गुणगुणलं तरी आपलं मन ३०-४० वर्ष मागे जातं ज्या काळात फक्त रेडिओ हे मनोरंजनाचं एकमेव साधन आपल्या कानाशी होतं. त्यामुळे कानातून मनात उतरलेली गाणी इतकी वर्ष झाली तरीही ह्रदयातलं आपलं स्थान सोडायला तयार नाहीत. “असा मी काय गुन्हा केला”, “ते गीत कोकिळे गा पुन्हा पुन्हा”, “मुकुंदा रूसू नको इतुका”, “पत्र तुझे ते येता अवचित” अशी छान छान गाणी देणाऱ्या कविवर्य रमेश अणावकर यांनी लिहिलेलं आणखी एक सुंदर गाणं आज आपण पाहू या ज्याचे शब्द आहेत –

“मी मनात हसता प्रीत हसे
हे गुपित कुणाला सांगू कसे

प्रेम ही अशी गोष्ट आहे कि जे आपल्या आयुष्यात कधी प्रवेश करतं ते आपलं आपल्यालाच कळत नाही आणि जेंव्हा प्रेमाची ही भावना आपल्या लक्षात येते तेंव्हा देखील कुठल्या विश्वासातल्या मैत्रिणीकडे आपल्या प्रेमाची वाच्यता करावी या बाबतीत मनाचा गोंधळ उडतो. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली ही तरूणी स्वतःशीच हसली कि त्या सोबत तिच्या ह्रदयातलं प्रेम देखील तिच्या सोबत हसायला लागतं. या गुपिताची तिला खूप गंमत वाटत होती त्यामुळे ती पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेत होती पण त्याचबरोबर हे गुपित कुणाला तरी सांगायला हवं असंही राहून राहून वाटत होतं पण तिथेच नेमका मनाचा गोंधळ उडाला होता.

चाहूल येता ओळखीची ती
बावरल्यापरी मी एकांती
धुंद जिवाला डोळ्यापुढती
नव्या नवतीचे स्वप्न दिसे

प्रेमाच्या राज्यात मी कितीही रंगून गेले तरी माझ्या प्रियकराच्या पदरवाची चाहूल माझ्या कानांना बरोब्बर ऐकू येते. त्याच्या चालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्याच्या आवाजाच्या चाहुलीचा भास जरी झाला तरी मी कावरीबावरी होते आणि मग स्वतःशीच लाजते. तो कोणत्याही क्षणी समोर येऊन उभा राहिल असं वाटून मनावर जी धुंदी चढते त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर आमच्या संसाराची नवनवीन स्वप्नं तरळत रहातात आणि माझ्या ह्रदयातलं प्रेम मात्र माझ्याकडे बघून हसत असतं.

किंचित ढळता पदर सावरी
येताजाता माझी मला मी
एकसारखे पाही दर्पणी
वेड म्हणू तर वेड नसे

आईने मला पहिल्यांदा साडी नेसायला शिकवलं तेंव्हा “स्त्रीनं नेहमी पदराचं भान ठेवावं” एवढं एकच वाक्य सांगितलं खरं पण तेंव्हापासून आरशासमोर उभं राहून “सांग दर्पणा कशी मी दिसते” असं सारखं सारखं त्या आरशाला विचारत असते मी ! कधी तो माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतो तर कधी दिलखुलासपणे दाद देतो. मग मी सारखी सारखी आरशाकडे पहात असते आणि आरसा माझ्याकडे पहात असतो. आपली लेक साडी नेसली कि आरशासमोरून हलत नाही, स्वतःशीच हसत असते, काहीतरी स्वतःशीच गुणगुणत असते ही गोष्ट आईच्या नजरेतून काही सुटली नाही बरं का ! एक दोनदा माझ्यावर रागावूनही पाहिलं तिने. पण मला मात्र आरशात पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. खांद्यावरचा पदर पुन्हा पुन्हा सारखा करत रहायचं नाहीतर उगाचच पदराशी चाळा करत रहायचं वेडच लागलंय! पण याला वेड तरी कसं म्हणावं ? कारण खांद्यावरचा पदर सारखा करणं हे काही वेड होऊ शकत नाही….. हं, चाळा म्हणा हवं तर !

काही सुचे ना काय लिहावे
पत्र लिहू तर शब्द ना ठावे
नाव काढीता रूप आठवे
उगा मनाला भास असे

माझ्या प्रियकराच्या भेटीची ओढ काही मला स्वस्थ बसू देत नाही. पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या सगळ्याच माणसांचं हे असंच होत असेल का? काही कळायला मार्ग नाही. एकदा मनात येतं कि त्याला बोटभर चिठ्ठी लिहावी किंवा प्रेमाच्या शब्दांनी भरलेलं सुंदर असं प्रेमपत्र लिहावं. मनाशी जरी असं कितीही ठरवलं तरी़ मायना काय लिहावा…. प्रिय लिहावं कि लिहू नये? या विचारातच मन अडकून रहातं आणि मग पुढे काही शब्दच सुचत नाहीत. त्याच्या नावाचा मनातल्या मनात उच्चार जरी केला तरी मग मन पुन्हा त्याच्या सहवासात घालवलेल्या क्षणांमध्ये गुंतून पडतं. भास-आभासाचे मनाचे खेळ पुन्हा सुरू होतात आणि पत्र वा चिठ्ठी काहीच लिहिलं जात नाही.

संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांनी इतकं समरसून गायलं आहे कि नंतरही हे गाणं बराच वेळ आपल्या मनात रूंजी घालत रहातं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments