“कृतार्थ”
नमस्कार मंडळी.
आज आपण, आपले मोरोक्को देशातील लेखक श्री प्रकाश फासाटे यांची “कृतार्थ” ही कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांचे अभिनंदन करू या, ते अशासाठी की नुकतेच त्यांचे “आयुष्याच्या वाटेवर” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. श्री प्रकाश फासाटे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक.

नाशिकच्या आगारातून नाशिक श्रीरामपूर एसटी निघाली. मी थेट श्रीरामपूर पर्यंत तिकीट काढले होते.
प्रवास मग तो कोणताही असो, तुम्हाला खूप काही शिकवतो, अनुभव देतो, विचार करायला लावतो.
बाहेर जोरदार पाऊस चालू होता, त्याही परिस्थितीत एसटी अगदी वेळेवर सुटली, तिला शहरातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला कारण एक तर पावसाचे दिवस आणि त्यात रस्त्यावर भयंकर वाहने…..!!
एसटी शहरातून बाहेर पडली. थोड्याच वेळात वेगाने सिन्नरच्या बाजूला निघेल असे सर्वांना वाटले. त्या एसटीने मात्र अतिशय संथ गतीमध्ये सिन्नर गाठले.
एसटीमध्ये बसलेले बहुतेक प्रवासी हे संगमनेर, प्रवरानगर आणि श्रीरामपूरचे होते, तिचा अतिशय हळू असलेला वेग पाहून आता प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. एसटीमध्ये बसलेलं काही तरुण मुलांच टोळक होत, इतरही काही लोक बसलेले होते. पण सगळ्यांचा सूर एकच, एसटी खूप हळू चाललीय. प्रत्येक जण एसटीच्या चालणाऱ्या संथ वेगामुळे थोडा नाराज झाला होता. अगदी मलाही जाणवत होतं की एसटीचा वेग खूपच हळू आहे, पण मला अशी काही घाई नव्हती. माझ्यासाठी तो वेग योग्य होता इतकाही काही कमी नव्हता.

लोकांचा चाललेला चर्चेचा विषय बघून मी एक उत्सुकता म्हणून ड्रायव्हरकडे बघितले. ड्रायव्हरची ती पाठमोरी आकृती मला दिसली. साधारण 55 ते 60 च्या आसपास वय असलेली ती व्यक्ती होती. डोक्याला पूर्ण टक्कल पडलेले होते. बिचारा गाडी चालवताना वाकला होता. त्याच्या खाकी शर्ट मधून दिसणाऱ्या दोन हातांवरून मला त्याच्या बारीक शरीरयष्टीची कल्पना आली.
जशी एसटी पुढे चालली होती, लोक ड्रायव्हर बद्दल एकमेकांत बोलत होते, मी सगळ्यांच्या चर्चा ऐकत होतो, प्रत्येकाचे वैयक्तिक मत मला ऐकू येत होते. गाडीचा वेग मात्र अगदी तसाच होता. काही गाडीतील लोक वैतागले सुद्धा….!!!
तेवढ्यात त्या टोळक्यातील एक जण उठला आणि ड्रायव्हरच्या कॅबिनकडे गेला.
“अहो काका, गाडीला थोडा वेग द्या ना.या वेगाने गेलो तर आपण खूप उशिरा पोहचू.” तो मुलगा ड्रायव्हरला जाऊन भिडला. ड्रायव्हरने त्या मुलाकडे बघितले आणि मान हलवली. त्यावेळी मला ड्रायव्हरचा चेहरा दिसला. त्याचा चेहरा मला थकलेला वाटला.
पुढे दोन तासाने गाडी चहा नाश्त्यासाठी थांबली. आम्ही सगळेजण उतरलो होतो.
ते दोघेही वाहक आणि चालक आमच्यापासून दूर बसून चहा नाश्ता घेत होते, इकडे मात्र त्या तरुण टोळक्यांची ड्रायव्हर बद्दल टीका आणि त्यांची चेष्टा करण्याचे काम चालूच होते.
मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. आता मात्र त्यांच्या टीकेने मर्यादा सोडली. एक जण त्यांना म्हातारा ड्रायव्हर म्हणत होता, तर दुसरा टकल्या म्हणत होता. हे ऐकून मला मनातून खूप वाईट वाटले. काही का असेना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाचा आदर हा राखलाच पाहिजे. आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलतो का ?
आपण पैसे देऊन तिकीट घेतले म्हणजे आपल्याला वैयक्तिक टीकेचे अधिकार मिळतात असं नाही.
पण त्या तरुण पिढीला कोण समजावून सांगणार होतं ? त्यांच्या चर्चेमध्ये आपण नाक खुपसणे म्हणजे वादाला तोंड फुटणार, तेव्हा शांत राहणेच उत्तम…
पुढे गाडीचा वेग काही वाढला नाही. त्याच वेगात भर पावसामध्ये गाडी श्रीरामपूर कडे निघाली होती.
एसटी बाभळेश्वर स्थानक सोडून श्रीरामपूर जवळ आली. एसटीमध्ये आता मोजकेच आठ-दहा लोक उरले होते. ड्रायव्हरला नाव ठेवणारी त्या तरुण मुलांची टोळी काही संगमनेरला उतरली आणि काही प्रवरानगरला…..
मी आणि काही प्रवासी आम्ही नाशिकपासून सोबत होतो. संध्याकाळचे पाच वाजले, पाऊस जवळपास उघडला होता. मावळतीच किंचित ऊन पडलं होतं. रस्त्यावर आणि एसटी स्टँडवर लोकांची गजबज दिसत होती. समोर जागा असल्यामुळे मी बाभळेश्वरला पुढे येऊन बसलो.
एसटीने श्रीरामपूर स्थानकात प्रवेश केला. माझं सहज लक्ष ड्रायव्हर कडे गेलं, ड्रायव्हर हुंदके देऊन रडत होता. सुरुवातीला मला त्यांच्या रडण्याचे कारण समजलेच नाही.
त्याचं लक्ष समोर होत आणि समोर जे दृश्य होतं ते पाहून मी गहिवरून गेलो.
बँड पथकाच्या 20 लोकांनी गाडीच्या दुतर्फा दोन रांगा केल्या होत्या. गाडी ज्या ठिकाणी उभी राहणार होती त्या ठिकाणी हे सगळे उभे होते. तेवढ्यात तीस वर्षाचा अगदी नवीन कपडे घातलेला एक युवक बाहेरून ड्रायव्हरच्या केबिनच्या दरवाजापाशी आला. हे मी सगळं आतून बघत होतो. त्यांनी हळूहळू गाडी थांबवली आणि बंद केली, गाडीतच आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि स्टेरिंगला हात जोडून नमस्कार केला, संपूर्ण गाडीला हात जोडले, वरच्या बाजूला असलेल्या देवांच्या दोन फोटोना त्यांनी हात जोडले आणि स्टेरिंगवर डोकं ठेवून ढसढसा रडायला लागले, त्यांच्या दोन्ही डोळ्यात पाणी होते.
बाहेर एका स्वरात सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.
त्यांच्या मुलाने कॅबिनचा दरवाजा उघडला, वडिलांना खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण गाडीला एक फेरी मारली.
गाडीच्या समोर त्यांची पत्नी, दोन सुना, मुलगा, मुलगी, जावई सगळा परिवार त्यांच्या स्वागतासाठी नवीन कपडे घालून उभा होता.
बँड पथकाने त्यांचं अतिशय भव्य स्वागत केल. गाडीच्या समोर उभे असलेल्या प्रत्येक नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी होत. मुलाने वडिलांना खांद्यावर घेऊन पूर्ण गाडीला फेरी मारल्यानंतर गाडीच्या समोर ठेवलेल्या एका पाटावर उभे केले. हा क्षण बघून माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं मला कळलेच नाही, तो एक भावनिक क्षण होता.
काका आज निवृत्त झाले होते. आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता. पाटावर उभ्या असलेल्या काकांचे पाय त्यांच्या बायकोने धुतले. सर्वांनी त्यांना ओवाळले, प्रत्येक जण त्यांच्या गळ्यात एक हार टाकत होता, त्यांना शाल आणि श्रीफळ भेट देत होता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नव्हते, त्यांना आता गहिवरून आलं.
तेवढ्यात स्थानकाचे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते त्या काकांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबातील सर्वजण अभिमानाने त्यांच्याकडे बघत होते. स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्याने सांगितले, “सोनवणे काकाकडून त्यांच्या संपूर्ण नोकरीच्या काळात एकही अपघात झाला नाही, ही त्यांच्यासाठीच नाही तर स्थानकासाठी सुद्धा अतिशय गौरवाची बाब आहे”. काकांनी मात्र अतिशय नम्रपणे हात जोडले.
कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते. त्या कामा वरची निष्ठाच तुम्हाला छोटे किंवा मोठे बनवते.
तो क्षण बघून मलाही राहवले नाही. समोरच्याच दुकानातून एक चांगले भिंतीवरचे घड्याळ गिफ्ट म्हणून मी पॅक करून घेतले आणि त्या गर्दीत काकांच्या हातात ठेवले, त्यांचे दर्शन घेतले. ही व्यक्ती मला परत कधीच भेटणार नव्हती, परंतु त्यांच्या कामावरच्या निष्ठेतून मात्र मी खूप काही शिकणार होतो. चालक, खरोखर एक देवाचाच अवतार असतो मग तो कोणताही का असेना, त्याच्या भरवशावर आपण निश्चिंत प्रवास करतो, अगदी बिनधास्त झोपतो, हा आपण त्यांच्यावर ठेवलेला विश्वास असतो आणि ते सुद्धा विश्वासाला पात्र ठरतात आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारे सोनवणे काका सारखे कित्येक लोक असतात.
ते सगळे निघून जोपर्यंत मी तिथेच थांबलो. त्यांच्या जीवनाचा एक टप्पा संपला होता, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार होती.

— लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800