केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाणे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील मॅक्सी मैदान, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे काल दुपारी ४ वाजता झाली.
यावेळी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण ४ सायरन एकाच वेळी वाजले. हवाई हल्ला/ बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना देण्यात आली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले गेले.
यावेळी परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात आली.

कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड जवळील जय गणेश सोसायटी या इमारतीवर हवाई हल्ला झाल्यानंतर, त्या ठिकाणी तालुक्यातील २६ यंत्रणांच्या टीम पोहोचल्या. यामध्ये प्रामुख्याने नागरी संरक्षण दल, महसूल विभाग, पोलीस विभाग, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्नीशमन दल, होमगार्ड, राष्ट्रीय सेवा योजना यांचा समावेश होता.
या घटनेमध्ये एकूण १४ लोक जखमी झाले होते व एक व्यक्ती मृत झाला होता.
यावेळी एनसीसीचे १४ कॅडेट, २५ आपदा मित्र, शंभर पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी, टीडीआरएफचे १५ जवान सहभागी झाले होते.

या मोहिमेमध्ये जखमींची सुटका करण्यासाठी एक अग्नीशमन दलाचे वाहन, दोन रुग्णवाहिका यांचा वापर करण्यात आला.
यावेळी पद्मश्री डॉ.गजानन माने, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रांताधिकारी विश्वास गुजर, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.हर्षल गायकवाड, उपायुक्त संजय जाधव, नागरी संरक्षण दल, ठाणेचे उपनियंत्रक विजय जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
— लेखन : जि.मा.का. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800